आपल्या आठवले फाउंडेशनच्या सांस्कृतिक मंचाद्वारे गणेशोत्सवाच्या दरम्यान गणपती अथर्वशीर्ष पठण स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा मुख्य उद्देश या निमित्ताने अथर्वशीर्षाचे स्पष्ट व शुद्ध उच्चारात पठण केले जावे हा होता . परीक्षक म्हणून डॉ. शुभदा नातू यांनी काम पाहिले. एकूण २३ स्पर्धकांनी यात भाग घेतला. चार वयोगट करण्यात आले होते व प्रत्येक वयोगटात पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यातआली. विजेत्यांची यादी सोबत दिली आहे.
चित्पावन आठवले फौंडेशन – प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा, २४ ऑगस्ट २०२२
चित्पावन आठवले फौंडेशनची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल श्रेयस, पुणे येथे २४ ऑगस्ट २०२२ रोजी संप्पन झाली. श्री अनिल महादेव हे अध्यक्षपदी होते. त्यावेळी १७ भागधारकांपैकी १४ भागधारक उपस्थित होते. तसेच कंज अँड अससोसिएट्स व प्रीतम आठवले अँड कंपनी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वसाधारण विषयांमध्ये, सभेने संस्थेच्या २०२१-२२ च्या आर्थिक ताळेबंदाला एकमताने संमती दिली. तसेच श्री प्रीतम आठवले अँड कंपनीची पुढील ५ वर्षासाठी लेखापाल म्हणून एकमताने नियुक्ती केली. विशेष विषयांमध्ये सभेने १० सभासदांची 'अतिरिक्त संचालक' पदावरून 'संचालक' या पदावर नियुक्ती केली. त्यांचं नावे खालीलप्रमाणे:- श्री विजय मुकुंद, श्री विनायक विष्णू, श्री आनंद गजानन, श्री श्रीनिवास गजानन, श्री अतुल अरविंद, डॉ मंदार अशोक, श्री सुमित अविनाश, डॉ निशिगंध अरविंद, सौ वर्षा अजित आणि सौ गौतमी अभिराम. त्यानंतर अध्यक्षांचे आभार मानून सभा समाप्त झाली. नंतर झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये अनेक महत्वाच्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली व त्यानंतर सर्वानी एकत्र भोजन केले. श्रीकांत आठवले


दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी “भारतातील व परदेशातील शैक्षणिक संधी” रविवार १७ जुलै रात्री ९ वाजता – ऑनलाईन मार्गदर्शन
खाली रजिस्टर करावे
डॉ प्रतिभा जयंत आठवले, रोटरी सर्वोत्कृष्ट सेवा पारितोषिक
डॉ प्रतिभा जयंत आठवले, रोटरी सर्वोत्कृष्ट सेवा पारितोषिक
कांकरिया, अहमदाबाद येथील रोटरी क्लबने 'व्होकेशनल सेवा गट' यातील 'सर्वोत्कृष्ट सेवा पारितोषिक' डॉ प्रतिभा जयंत आठवले यांना दि. २७ जून २०२२ रोजी प्रदान केले. डॉ प्रतिभा यांच्या निस्वार्थ व विशेष सेवाभावासाठी हे मानाचे परितोषिक 'कांकरिया' रोटरी क्लबच्या अध्यक्षांच्या हस्ते दिले गेले. डॉ प्रतिभा यांच्या सेवाभावी कार्याचा हा उचित गौरव आहे. समस्त आठवले परिवारातर्फे त्यांचे विशेष व हार्दिक अभिनंदन.

शाब्बास आठवले
ज्यांनी माहिती दिली त्या व्यक्तींच्या वंशावळीतील शाखा कंसात दर्शविल्या आहेत
* कृष्णाजी भास्कर आठवले हे साहेबराव मोदी यांचेबरोबर मूव्हीटोन पिक्चर्समध्ये कार्यरत होते. धोक्याची कामे करीत असत, अतिशय हुशार, निडर व्यक्तीमत्त्व होते. सिनेमाच्या शुटींगसाठी चालत्या रेल्वेगाडीतून वसईच्या खाडीत उडी मारली. त्यांनी ‘पुकार’ सिनेमात धोक्याचे काम केले आहे. ---प्रभाकर कृष्णाजी (नागाव - 20) * रामचंद्र भट हे पुण्यात धर्मशास्त्री होते. त्यांनी ग्वाल्हेरच्या महाराजांना पुण्याहून निघण्याकरिता दिशा दिली होती. त्यामुळे महाराजांनी 15 रु. चे चांदवाडी शिक्के (त्याला माफी म्हणत) दरमहा चालू केले. ते आजही चालू आहेत. ---प्रभाकर कृष्णराव (नाचणे-) * आमचे पूर्वजांपैकी रामचंद्र यशवंत हे पुण्यात शेवटचे बाजीराव पेशवे यांचेकडे सरदार होते. 1857 च्या ब्रिटिशांविरुध्दच्या युध्दात आपल्या सर्व कुटुंबियांना रत्नागिरी येथील टेंबे गावी पाठवून स्वत: व पत्नी यांनी इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून स्वत:च्या वाड्यासह जाळून घेतले. ---रामचंद्र दत्तात्रय (टेंबे-) * केशव नारायण यांचे सातारा येथे वास्तव्य होते. 1818 साली ब्रिटिशांविरुध्द उठावात भाग घेतलेमुळे त्यांना होळीचे दिवशी तोफेच्या तोंडी दिले. ---शारंगधर परशूराम (सोमेश्वर-) * आमचे पूर्वज थोरले माधवराव पेशवे यांचे पदरी सरदार होते. त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील शेळगाव (शेळ पिंपळगाव) हे गाव इनाम होते. आमच्या पूर्वजांनी पुणे येथील माती-गणपतीची स्थापना केली. ---मनोहर बाळकृष्ण (सोमेश्वर -5) * हैदरअली व टिपू सुलतान यांचा त्रास मराठी राज्याला होऊ नये म्हणून पेशव्यांनी पटवर्धन यांना सरदार नेमले. तेव्हा त्यांचेबरोबर भावे व आमचे पूर्वज आठवले हे आपले भावे-आडोम गाव सोडून नरगुंद येथे गेले. ---पांडुरंग हरी (भावे-आडोम) * महादजी शिंदे व नाना फडणीस यांच्या काळात (1782 ते 1789) विसाजी आप्पाजी आठवले या सरदारांनी उत्तर हिंदुस्तानात दिल्ली, आग्रा व अलीगड भागातील काही प्रदेश व खंडणी पेशव्यांना मिळवून दिली. ---सदाशिव नथू (नागाव) * आमच्या मातोश्री शकुंतला भालचंद्र आठवले उत्तम चित्रकार होत्या. त्यांनी 1934 सालच्या फ्रेंच राज्यक्रांतीवर आधारीत 105 व्यक्तिरेखा (पोट्रेटस्) येथील बालगंधर्व कलादालनात त्या चित्रांचे पुन: प्रदर्शन भरविले होते. ---केशव भालचंद्र (दापोली) * वसंत वासुदेव हे उत्तम चित्रकार होते. घोले रोड, पुणे येथील महात्मा फुले संग्रहालयात त्यांची 40 चित्रे आहेत. ---मधुकर नरहर (नागाव) * माझी आई मंदाकिनी ही दादासाहेब फाळके यांची कन्या. ती भारतीय चित्रपटातील पहिली बालनटी म्हणून प्रसिध्द. दादासाहेब फाळके यांच्या ‘कालियामर्दन’ या मूकपटात वयाच्या 5 व्या वर्षी प्रथम काम केले. ---विवेक विश्वनाथ (गुहागर - 2) * कै. हरी विष्णू आठवले ह्यांचे ‘आठवले बीजगणित’ ही पुस्तके 1992 पासून अंदाजे 1975 पर्यंत इयत्ता 8 वी 11 ला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके मान्यताप्राप्त होती. काही वर्षे हीच पुस्तके उत्तर प्रदेशादही शालेय शिक्षणात होती. * कै. रामचंद्र वामन आठवले ह्यांनी गुहागर येथील नारायणाच्या मंदिराच्या आवारात सन. 1940 मध्ये भाविकांसाठी एक धर्मशाळा बांधली. (फोटो पान नं. तखखख) * श्री. जयंत बाळाजी ह्यांनी ‘सनातन संस्था’ ही समाज सहाय्य, राष्ट्ररक्षण व धर्मजागृतीचे शिक्षण देणारी संस्था गोवा येथे स्थापन केली. * आशिश दिलीप याने 13/12/1996 मध्ये वयाच्या 12 व्या वर्षी धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 37 किमीचे अंतर 7 ता. 22 मि. पोहून विक्रम केला. --- दै. सकाळ दि. 13/12/2006
श्री. श्रीकृष्ण गंगाधर आठवले
पूल बांधणीतील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ

जन्म 1946 वंशावळ संदर्भ : सोमेश्वर 1/3अ आज वयाच्या 82व्या वर्षी देखील तरुणाच्या उत्साहाने दिवसातून आठ तास काम करणारे आणि अगदी वेगळ्याच क्षेत्रात म्हणजे पूलबांधणीच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा दैदिप्यमान ठसा उमटविणारे जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ म्हणून श्रीमान श्रीकृष्ण गंगाधर आठवले यांचा अत्यंत गौरवपूर्वक उल्लेख करावा लागेल. त्यांची स्वत:ची ‘आठवले - लिस्टॅड अॅण्ड असोसिएट’ नावाची पूलबांधणी क्षेत्रातील कन्सल्टिंग इंजिनिअरिंग फर्म सन 1985 पासून गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये स्वतंत्रपणे कार्यरत असून आज तिला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. या फर्मचे श्री. श्रीकृष्ण गंगाधर हे प्रमुख असून त्यांच्या हाताखाली विविध देशातील निष्णात वीस इंजिनिअर्सचा ताफा काम करीत आहे. त्यांनी आजवर अनेक पुरस्कार मिळविले आहेत. पूलबांधणी क्षेत्रातील उत्कृष्ट भारतीय फर्म म्हणून सन 2004चा पुरस्कार या कंपनीने अमेरिकेकडून पटकावला आहे याहून अधिक गौरव तो कोणता ? अर्थातच या श्रेयाचे नि यशाचे प्रमुख शिल्पकार श्रीकृष्ण गंगाधर आठवले हेच आहेत यात शंका नाही. असामान्य नि अद्वितीय यश संपादन करणार्या कर्तृत्ववान श्रीकृष्णाचा (श्रीकृष्ण गंगाधर आठवले) यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर गावी दि. 6 जून 1924ला झाला. त्यांचे वडील झ. थ. ऊ. खात्यात सरकारी नोकरीला होते. त्यामुळे त्यांच्या वारंवार बदल्या होत. परिणामी श्रीकृष्णाच्या शिक्षणाचा रितसर प्रारंभ न होता थोडी आबाळच झाली. परंतु उपजत हुषार असल्यामुळे पुढे ते शिक्षणात देखील अग्रेसरच राहिले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी शाळेचे तोंड पाहिले ते एकदम वरच्याच यत्तेत प्रवेश घेऊन आणि शालेय शिक्षण पूर्ण केले ते वयाच्या 15व्या वर्षी तेव्हाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊनच. कोपरगाव व नाशिक येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. पुढे पुण्यात येऊन त्यांनी फर्ग्यूसन कॉलेजात प्रवेश मिळवला. महाविद्यालयात ते सर्व मुलांमध्ये लहान दिसत असल्यामुळे शिक्षकांना ते शालेय विद्यार्थीच भासत. श्रीकृष्णाचा इंजिनिअरिंगच्या क्षेत्राकडे ओढा असल्यामुळे बी. एस्सी. झाल्यावर इंजिनिअरिंग मधील ऑनर्स पदवी सन 1948 मध्ये मुंबई विद्यापीठातून वयाच्या 24व्या वर्षी संपादन केली. याच वर्षी श्रीकृष्णाचा विवाह (दि. 3/4/1948) पुण्याच्या वासंती माधव सहस्त्रबुद्धे या सुविद्य नि संगीत तज्ज्ञ मुलीबरोबर झाला. वयाच्या अठराव्या वर्षी वासंती सहस्त्रबुद्धे विवाहबद्ध होऊन सौ. वासंती श्रीकृष्ण आठवले बनल्या. नाट्य नि संगीत प्रेमी वासंतीबाई अमेरिकेत गेली कित्येक वर्षे मराठी-हिंदी नाटकांचे दिग्दर्शन करीत आहेत, सुगम संगीत कार्यक्रमांतून भाग घेत आहेत, हार्मोनियम वरही साथ देत आहेत इतकेच नव्हे तर वॉशिंग्टनमध्ये मुलांना व मोठ्या व्यक्तींनादेखील संगीत शिक्षणाचे धडे देत आहेत. संगीताप्रमाणे त्यांना वाचनाचीही आवड आहे. गेली 55 वर्षे श्रीकृष्ण-वासंती यांचा संसाररथ उत्साहाने नि दमदारपणे मार्गक्रमण करीत आहे ही खरोखरच अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. श्रीकृष्ण-वासंती यांच्या संसारवेलीला चार कन्यारत्नांच्या रूपाने सुरेख फुले आली. अंजली-हेमा-ज्योती नि सीमा ही त्यांची नावं असून या चारही कन्या उच्च शिक्षित असून आपापल्या संसारात रमलेल्या आहेत. थोरली अंजली ही आर्किटेक्ट असून ती आता अंजली अनिल गुलाटी झाली आहे. दुसर्या क्रमांकाची कन्या हेमा ही अमेरिकेत एम्. एस्. होऊन कॉम्प्यूटरमधील तज्ज्ञ बनून आता हेमा मन्सूर अहमद झाली आहे. क्रमांक तीनची ज्योती चार्टर्ड अकाऊंटंड असून सासरची ज्योती मिर्को झाली आहे. तर चौथ्या क्रमांकाची सर्वात धाकटी कन्या सीमा ही देखील चार्टर्ड अकाऊंटंड असून सासरची सीमा रॉबर्ट ओवेन बनली आहे. सीमा ही आठवले यांच्या कंपनीचे हिशेब तपासण्याचे काम सांभाळते आहे. श्रीकृष्ण-वासंती यांचे गेल्या तीस वर्षांहूनही अधिक काळापासून अमेरिकेत मेरी लँड येथे कायमचे वास्तव्य असून आश्चर्याची नि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांच्या चारही विवाहित कन्यांचे वास्तव्य त्यांच्यापासून जवळच्याच म्हणजे 20-25 मैलांच्या परिसरात असून प्रत्येकीचे स्वतंत्र बंगले आहेत. अर्थात श्रीकृष्ण-वासंती यांचे कायमचे वास्तव्य जरी अमेरिकेत असले तरी ते आपल्या मातृभूमीला मूळ गावाला नि वंशाला विसरलेले नाहीत. त्यांची पुण्यातही स्वत:ची जागा (प्रशस्त ब्लॉक) असून ते दरवर्षी न चुकता डिसेंबर-जानेवारी दोन महिने येऊन राहतात. आप्त स्वकीयांना भेटतात. अनेक संस्थांना, देवस्थानांना देणग्या देऊन सामाजिक कार्याला हातभार लावतात. संगीत-नाट्य नि सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. श्रीकृष्ण गंगाधर आठवले यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधील पदवी संपादन केल्यावर त्यांना पूलबांधणी क्षेत्राचे आकर्षण नि ओढ असल्यामुळे त्यांनी त्याच क्षेत्रात नोकरीच्या निमित्ताने पदार्पण केले आणि आपल्या अथक् परिश्रमाने त्याच क्षेत्रात वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. लंडनच्या रेडेल पोमर अॅन्ड ट्रिटन (ठशपवशश्र, झरश्राशी । ढीळीींेंप) नावाच्या कलकत्त्याच्या हावरा पूल व भारतातील अनेक रेल्वे पूल बांधणार्या कंपनीत मोठ्या अधिकार पदावर काम केले. खास निमंत्रणावरून नंतर काही काळ दिल्लीच्या उत्तमसिंग दुगल कंपनीत काम केले. त्यानंतर काही वर्षे त्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील डेव्हिड व्होल्कार्ट अॅन्ड असोसिएट या पूल बांधणीतील अग्रेसर कंपनीत अधिकार पदावर काम केले. पँन्चो ट्रेन लेक ब्रिज हा 29 मैल लांबीच्या प्रचंड पुलाचे बांधकाम याच कंपनीमार्फत झाले आहे. पुढे त्यांनी ठरवलं की आपण स्वत:चीच पूलबांधणीतील सल्लागार कंपनी स्थापन करून या क्षेत्रात स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करावं. हा निश्चय करून ते थांबले नाहीत. तर आपलं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं. मॅसॅच्युसेटस् विद्यापीठाची एम्. एस्सी. पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेली मेरी लिस्टँड नावाची या क्षेत्रातील निष्णात महिला त्यांना सहकारी म्हणून मिळाली. तसंच टेवोल्डी आयोब हा देखील कष्टाळू अन् प्रामाणिक तज्ज्ञ सहकारी त्यांना मिळाला. आणि त्यांनी या लेखारंभी वर उल्लेख केल्याप्रमाणे ‘आठवले लिस्टँड अॅन्ड असोसिएट’ या नावाची स्वत:ची कंपनी स्थापन केली. स्वत:च्या प्रामाणिक नि सचोटीच्या कार्यशैलीमुळे आणि पूर्वीचा लौकिक नि कीर्ती पाठीशी असल्यामुळे त्यांना नव्या-नव्या कामांचा कधीच तुटवडा भासला नाही - भासत नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेकडो पुलांची निर्मिती झालेली आहे. गेल्या तीस वर्षात अनेक पुरस्कार - पारितोषिके मिळाली आहेत. त्यांची यशस्वी घोडदौड आजही पुढे चालूच आहे. श्रीकृष्ण गंगाधर आठवले हे आज खर्या अर्थाने तृप्त - समाधानी जीवन जगताहेत. आजही ते दिवसातून आठ-आठ तास काम करताहेत. त्यांची प्रकृती सुदैवाने ठणठणीत आहे. कोणत्याही प्रकारच्या आजाराने ते त्रस्त नाहीत. ते एकदा सहज डॉ. विल्सन नावाच्या डॉक्टरांकडे आपली प्रकृती दाखविण्यास गेले, विविध चाचण्या केल्या. सर्व रिपोर्टस् नॉर्मल. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याचं आणि त्यांची प्रकृती उत्तम नि ठणठणीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या गोष्टीचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो. श्रीकृष्ण आठवले नि त्यांच्या पत्नीला संगीताची आवड असल्यामुळे पुण्यातील सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला ते आवर्जून आपली उपस्थिती लावतात. त्यांना ब्रिज, पोकर, रमी आदी पत्त्यातील खेळांची आवड आहे तशीच गोल्फ, रेस यांचीही आवड आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी 90 टक्के कठोर परिश्रमाची तयारी आणि 10 टक्के हुषारी यांची गरज आहे असं त्यांचं ठाम मत आहे. प्रमाणपत्रांपेक्षाही (कोणत्याही क्षेत्रातील) जिज्ञासू वृत्ती महत्त्वाची कारण तीच तुम्हाला यशाकडे नेते यावर त्यांचा विश्वास आहे. म्हणूनच जिज्ञासू वृत्ती नि कठोर परिश्रम यांना पर्याय नाही हाच त्यांचा पुढील पिढीला-तरुण वर्गाला संदेश आहे. श्रीकृष्ण आठवले यांच्याशी गप्पा मारीत असता त्यांनी 50 वर्षांपूर्वीची एक अविस्मरणीय आठवण सांगितली. ती आदरणीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याविषयीची आहे. अर्थात त्यावेळी दोघेही एकमेकांना ओळखत देखील नव्हते. मुंबई-पुणे असा तो रेल्वेचा प्रवास होता. गाडीला खूप गर्दी होती. आरक्षणही शक्य नव्हतं. श्रीकृष्णांना गाडीत जागा मिळेना. श्रीकृष्णांच त्यावेळी तरुण वय होतं. इंजिनिअर होऊन चांगल्या नोकरीत होते. त्यांच्या नोकराने पूर्ण गाडीची पाहणी करून श्रीकृष्णांना सांगितलं की गाडीची एक मोठी कुपी रिकामी आहे. तिच्याच एकच सद्गृहस्थ आहेत. (ते पांडुरंगशास्त्री होते व त्यांच्यासाठी संपूर्ण कुपी आरक्षित केली होती.) श्रीकृष्णांनी एक संधी (चान्स) घेण्याच्या उद्देशाने त्या डब्याजवळ येऊन दारावर टक् टक् केलं. आतील गृहस्थांनी दार उघडलं. श्रीकृष्णांनी त्यांना आपली अडचण सांगून डब्यात घेण्याविषयी विनंती केली. त्या गृहस्थांनी उदार मनाने त्यांना प्रवेश दिला. श्रीकृष्णांचा स्वभाव बोलका-थोडासा बडबड्याच. त्यामुळे श्रीकृष्णजी बोलत होते. अनेक प्रसंग - विषय बोलण्यात येत होते. श्रीकृष्णजी वक्ता आणि पांडुरंगशास्त्री श्रोता बनले होते. मध्येच श्रीकृष्णांनी त्या गृहस्थांना त्यांचं नाव विचारलं. त्यावर ते आठवले एवढंच म्हणाले. श्रीकृष्णजी म्हणाले की मी तुमचं नाव विचारलं. माझंच काय सांगता ? तेव्हाच दोघेही आठवलेच असल्याचं स्पष्ट झालं. वाटेत कर्जतला गाडी थांबली तेव्हा फलाटावर 35-40 जणांचा जमाव शास्त्रीबुवांच्या स्वागताला जमलेला होता. कुणी त्यांना पुष्पहार घातले, पुष्पगुच्छ दिले, मिठाई दिली. ते सर्व पाहून श्रीकृष्णजी मनात समजले की ही कोणीतरी बडी आसामी आहे. पुढे पुणे स्थानक आल्यावर तर शंभर-दीडशे लोकांचा - भक्तांचा जमाव पांडुरंगशास्त्रींच्या स्वागतार्थ नि सन्मानार्थ जमलेला होता. ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्णजींनी घरी आल्यावर आपल्या आईला सांगितली तेव्हा ती म्हणाली की, अरे श्रीकृष्णा ते थोर गृहस्थ म्हणजे आपले पांडुरंगशास्त्री आठवले होते. एवढ्या मोठ्या थोर व्यक्तीबरोबर तुला प्रवास करायला मिळाला, त्यांचं सान्निध्य लाभलं. तू खरोखरच भाग्यवान आहेस. पांडुरंगशास्त्रींसारखा स्वाध्याय परिवाराचा प्रणेता, उत्तम वक्ता, प्रवचनकार किती मोठा, उत्तम श्रोतादेखील असू शकतो त्याचा श्रीकृष्णांना प्रत्यय आला. ही त्यांची आठवण खरोखरच अविस्मरणीय आहे. शब्दांकन : क्रांतिसेन आठवले
श्री. विजय मुकुंद तथा दादासाहेब आठवले
‘शोगिनी’ यशाचे शिल्पकार

जन्म 01/01/1946 वंशावळ संदर्भ : जांभुळपाडा एका कर्तृत्ववान आणि असामान्य व्यक्तिमत्त्वाची आपण ओळख करून घेणार आहोत. पुणे-सातारा एक्स्प्रेस हायवेला लागूनच खेड-शिवापूर जवळील डोंगरांच्या छायेत ‘शोगिनी’चा एक विस्तारित भव्य प्रकल्प येणार्या-जाणार्या प्रवाशांचे, वाटसरूंचे लक्ष वेधून घेताना दिसतो. ‘शोगिनी टेक्नोआर्टस्’ ने केलेल्या उत्कर्षाचा, उन्नतीचा तो चालता - बोलता पुरावा आहे. या विशाल औद्योगिक प्रकल्पाचे शिल्पकार आहेत श्री. विजयराव आठवले. एक उमदे आणि कार्यमग्न व्यक्तिमत्त्व ! कोणतेही यश अथवा विजय आपण होऊन तुमच्या दाराशी येत नाही तर त्यासाठी पायांखाली कष्टांचे निखारे, हातात प्रयत्नांची मशाल आणि मनात उदात्त विचारांचे, वास्तव कल्पनांचे वारे वाहावे लागतात. ‘शोगिनी’ची विजयगाथा या प्रत्येक शब्दाच्या आशयाचे मूर्तिमंत स्वरूप आहे असे म्हणणेच योग्य ठरणार आहे. पुण्यातील एका मध्यमवर्ग कुटुंबात श्री. विजयराव यांचा जन्म झाला. मध्यमवर्ग म्हटला म्हणजे बेताचेच किंवा क्वचितप्रसंगी ओढग्रस्त असे अर्थोत्पादन ! त्यामुळे साहजिकच चैन, शौक, मौजमजा याची नेहमीच वानवा आढळते. अशा कुटुंबातील मुलाने उद्योगपती बनण्याचे स्वप्न बघणे म्हणजे औदुंबराला फूल गवसण्यासारखे होय. अशा वातावरणात जन्मलेल्या विजयरावांनी नू. म. वि. मधून एकमार्गी अकरावीची परीक्षा उत्तीर्ण केली. लहानपणापासून वडिलांची शिस्त, काटेकोरपणा आणि व्यवहारिक रोखठोकपणा याचे संस्कार नकळतपणे विजयरावांवरही झाले. आपल्याला या आर्थिक परिस्थितीतून सही सलामत बाहेर पडायचे असेल आणि भव्य-दिव्य कल्पनांचे सुंदर, अपेक्षित रोपटे लावायचे असेल तर काही तरी व्यावसायिक शिक्षण घेतले पाहिजे असे त्यांनी मनाशी ठरविले. या शिक्षणामुळे अनुभवाचे व आर्थिक भांडवल उभे करता येईल अशी दोन्ही उद्दिष्टे साध्य व्हावीत असेच त्यांच्या मनाने निश्चित केले. अन् म्हणूनच अकरावी झाल्याबरोबर केवळ पदवी शिक्षणाचा आग्रह न धरता वाडिया कॉलेजमधून दोन वर्षांचा मेकॅनिकल ड्राफ्टस्मनचा अभ्यासक्रम निवडून तो यशस्वीपणे पूर्ण केला. पुण्याची वाडासंस्कृती पूर्णपणे उध्वस्त झाली नव्हती, कुठेतरी एकाद - दुसर्या वाड्यातून त्याचे जुनेपण घालवून फ्लॅट संस्कृतीचा उदय होत असताना विजयराव सदाशिव पेठेतील जोशी वाड्यात निवास करीत होते. त्या वाड्याच्या दर्शनी जागी त्यांचे वडील व काका टेलरिंगचा व्यवसाय करीत. कापडाची काटछाट करीत इतरांचे मापानुसार कपडे शिवण्याचा व्यवसाय करणार्या पित्याच्या पोटी शेकडो कुटुंबाचे उदरभरण व भवितव्य घडविणार्या अपत्याने जन्म घेतला आहे, अन् ते विजयराव आहेत असे जर कुणी सांगितले असते तर त्याची येरवड्यालाच रवानगी झाली असती. पण पुन्हा इथे नियतीने आपली मूठ उघडली... एक दिवस अचानकपणे वाड्याचे मालक आणि आठवले यांचे चित्रकलेचे शिक्षक श्री. जोशी यांनी, ‘पी. सी. बी. बनविणार्या कंपनीत पीसीबीचे ड्राँईंग करण्याचे अर्धवेळ काम करणार का ?’ असे विजयरावांना विचारले. क्षणभरच त्यांनी विचार केला आणि संध्याकाळी तरी नुसते का बसायचे, दिवसभर धडपडायचे हीच आपली ‘भाग्यरेषा’ असे समजून ‘होकार’ दिला. पीसीबी क्षेत्रातील आजच्या यशोगाथेचा येथूनच खर्या अर्थाने श्रीगणेशा सरू झाला. ‘एका कोळियाने एकदा आपुले। जाळे बांधियेले उंच जागी।’ या कवितेचे स्मरण व्हावे असाच हा प्रसंग होता. ‘आपण कोणीतरी व्हायचे’ हे स्वप्न व जिद्द असल्यामुळे कामातील रसिकता, तत्परता, नेटकेपणा, कालमर्यादा इत्यादी आवश्यक बाबींनी पीसीबीचे कार्य रात्रंदिवस चालू ठेवले. जागा अपुरी पडू लागल्यामुळे नव्या पेठेत भाड्याने जागा घेतली व कार्य विस्ताराच्या दिशेने पावले पडू लागली. तरीही दिवसा नोकरी करून उर्वरित वेळात आपला व्यवसाय करीत असता वडील नानासाहेब आणि पत्नी शोभा यांनी सर्वार्थाने योगदान देऊन व्यवसायाचा वेलू फुलविण्यास मदत केली. अथक परिश्रम व जागरण करून ग्राहकांचे समाधान व संतोष देण्याची परंपरा राखली. एकदा दिशा ठरविल्यानंतर त्यात सिद्धी व गुणवत्ता, तंत्रज्ञान मिळविण्याच्या उद्देशाने विजयरावांनी जे. एन्. मार्शलला ‘अलविदा’ करून 1978-79 साली पुण्यातील पीसीबी तयार करणार्या ‘इलेक्ट्रोटेक सर्किटस्’ कंपनीत ‘डिझायनिंग’, ‘ड्रॉईंग’ आणि ‘प्रॉडक्शन’ विभागाचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. येथेच विजयरावांचे खरा उद्योगपती बनण्याचे ध्येय दिसून येते. वस्तुत: त्यांना खासगीरित्या मिळणार्या ऑर्डर्सवरच लक्ष केंद्रित करून आपला व्यवसाय भराभर वाढविता आला असता. परंतु तसे न करता आपल्या व्यवसायातील विविध क्षेत्रातील बारकावे केवळ अनुभवातूनच नव्हे तर त्यात नैपुण्य संपादून टप्प्याटप्प्याने व्यवसाय वाढविला तर तो अधिक यशस्वी व चिरकाल टिकू शकतो या मंत्राची त्यांना जाण होती. म्हणूनच व्यवसायासाठी कोणतीही गोष्ट शिकताना अनुभवाबरोबरच व्यावसायिक पक्वतेची अनुभूती दिली. विजयरावांचा पीसीबी क्षेत्रातील अधिकार, अनुभव आणि आत्मीयता पाहून त्यांच्या मित्रांनादेखील त्यांच्यातील उद्योगपतीचे गुण दिसले अन् त्या सर्व मित्रांनी, ‘तुम्हीच स्वतंत्र व्यवसाय सुरू करा. आम्ही तुम्हाला भरपूर काम देऊ’ असे केवळ आश्वासन देऊन थांबले नाही तर तशी कृतीदेखील केली. ‘आलेल्या संधीचे सोने केले तर यशोदायिनी तुम्हाला विजयाची माला अर्पण करते’ या तत्त्वावर विश्वास ठेवून विजयरावांनी आपल्या नव्या पेठेतील जागेतच पत्नी व दोन कन्या (शोभा + गिता + नीता) यांच्या आद्याक्षरांनी युक्त असा ‘शोगिनी’ टेक्नोआर्टस् नामक व्यवसाय सुरू केला. मित्रांच्या शब्दांना कृतीचा किनारा लाभला. त्याच्यामागे महत्त्वाचे कारण होते विजयरावांचे नैपुण्य, प्रामाणिकपणा आणि तत्परता ! त्यामुळे आपोआपच व्यवसायात वृद्धी होऊ लागली. नव्या पेठेतील जागा अपुरी पडू लागली म्हणून पेशवाई हॉटेलमागील भावाच्या जागेत व्यवसाय सुरू केला. विजयरावांचे चुलतभाऊ श्री. सतीश आठवले यांचेही त्यांना सहकार्य लाभून वाढत्या व्यवसायामुळे मागणी आणि पुरवठा यांचा मेळ घालणे अल्प काळातच शक्य होऊ लागले. नारायण पेठेतील सिताफळबाग कॉलनीत बापट बंगल्यामध्ये पीसीबीचे उत्पादन सुरू केले तरीही ‘वाढता वाढता वाढे’ असे होऊ लागले. त्रि-स्थळी यात्रा यामुळे शक्ती अकारण व्यय होऊ लागल्याने जमलेल्या पैशांतून खेड-शिवापूर येथे 2 एकर जागा खरेदी केली. हाच खरा सोनियाचा क्षण ! त्या ओसाड अन् ओबडधोबड जागेची स्थानिक कामगारांकडून साफसफाई करून तेथे एक हजार चौरस फुटांची शेड बांधून 5-6 कामगार व महिला यांच्या मदतीने पीसीबी व्यवसायाचा शुभारंभ केला. श्री विजयरावांना घरच्यांनी प्रचंड साथ दिली त्याचप्रमाणे कोणतेही काम करताना ते अधिक सुंदर, चांगले करण्याचा प्रयत्न केला. कारखाना नावारूपाला आला. दरवर्षी नवनवीन यश व प्रगतीचे टप्पे पार करीत ‘शोगिनी टेक्नोआर्टस्’ने पीसीबी क्षेत्रात एक नवीन परिमाण, नवा मानदंड प्रस्थापित केला. आज 750 कामगार तीन पाळ्यांमध्ये काम करीत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जागतिक बाजारपेठेत दर्जेदार व गुणवत्तायुक्त उत्पादन करणारी, कालमर्यादेत पुरवठा करणारी कंपनी म्हणून नावलौकिक संपादन केला आहे. हे सर्व पंधरा एकर जमिनीवर वाढलेल्या व्यापातून चालविले. एकोणीस वर्षापूर्वी जो परिसर दगड-धोंडे, कपारी, रानटी वनश्रींनी ओबडधोबड असा दुर्लक्षित होता त्या परिसरात विजयराव आणि त्यांच्या कुटुंबियांचा परिस स्पर्श होऊन तेथे खरोखरीच आज नंदनवन फुलले आहे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. मराठी शुद्ध रत्नाकरात ‘उद्योग’ यासाठी प्रयत्न, काम, धंदा आणि ‘उद्योगी’ यासाठी नेहमी कामात गुंतणारी, मेहनती यासारखे अर्थ अभिप्रेत असले तरी आजच्या नव्या औद्योगिक परिभाषेला हा संदर्भ किती चपखल लागू पडतो पहा, ‘‘.....कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफल हेतुर्भु: मा ते संगोऽस्त्व कर्मणि॥’’ हा भगवद्गीतेतील श्लोक अत्यंत मार्गदर्शक ठरतो. आपले यथोचित कर्म मन लावून प्रामाणिकपणे करावे. चित्त स्थिर राखण्याचा अभ्यास करणे हीच ज्ञानमार्गाची पहिली पायरी आहे. काहीही कर्म न करता निष्क्रीय राहू नये. यथाशक्ती, यथामती काहीतरी उद्योग करीत रहावा. कोणताच उद्योग केला नाही तर कसलीच प्रगती होणे अशक्य! विजयरावांनी आपल्या कृतीने ‘उद्योगा’चे महत्त्व पटवून दिले आहे. तसेच जो उद्योग आपण करीत आहोत तो आपल्या बुद्धीप्रमाणे सर्वांगसुंदर करण्याचा आपला प्रयत्न आहे, तोपर्यंत तो ईश्वराच्या ठिकाणी रूजू होणारच ! हे सूत्र विजयरावांनी तंतोतंत आत्मसात केले आहे. कोणत्याही व्यवसायाच्या यशाची गुरुकिल्ली ही मालक आणि कामगार यांच्यातील संबंध, सहकार्य आणि सद्भावावर अवलंबून असते. श्री. विजयराव यांना आपल्या कारखान्यातील प्रत्येक व्यक्तीचे नाव, त्याचा स्वभाव आणि कौटुंबिक परिस्थिती याविषयी संपूर्ण माहिती असून त्यांच्या नाना, मामा, गंपा वगैरे टोपण नावानेच संबोधतात. दुखलं - भागलं विचारपूस करतात, त्यामुळेच शोगिनी हे एक कुटुंब बनले आहे. अन् त्या कुटुंबाचे प्रमुख ‘दादा’ असल्यामुळे व्यवसायाची यशोशिखराकडे वाटचाल चालू आहे. आपल्या व्यवसायाला लागणारे साहित्य निर्मिती आपल्याच कुटुंबातील सहकार्यांकडून व्हावी व त्यांचा उत्कर्ष व्हावा यासाठी विजयरावांनी काही कामगारांना मुद्दाम स्वतंत्र व्यवसाय उभे करून दिले. सामाजिक कार्य श्री. विजयराव आठवले सामाजिक बांधीलकीच्या भावनेन सातत्याने तन-मन-धनाने सामाजिक कार्य व इतरांच्या कार्याला मदत करीत असतात. त्यांच्या कार्याची खालील काही ठळक उदाहरणांवरुन वाचकांना कल्पना येईलच. 1. कामगारांना आपले घर बांधण्यासाठी सर्व परीने मदत करणे. 2. जवळपासच्या खेडेगावातील शाळेचे वर्ग, वस्त्या, पाण्याची सोय, गणेश मंडळ, हरिनाम सप्ताह, उरुस व स्नेहभोजन यासाठी शक्य तेवढे सहकार्य व मदत करणे. 3. शिवरे येथील जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळेस इमारतीची दुरुस्ती, वर्ग बांधणे, फरशी बसवणे याद्वारे मदत केली. 4. शिवभूमी विद्यालय, खेड येथील शाळेतील हुशार मुलांना बक्षीसे, पुस्तके व वह्या वाटणे. 5. रावडी ता. भोर येथील शाळेस मदत व वेल्हा तालुक्यातील वेल्हा वनवासी व विद्यार्थी वसतीगृहास आर्थिक व इतर मदत केली व देणगी दिली. 6. गाऊडदरा, कोंढणपूर व इतर गावातील शाळांना व जिल्हा परिषद शाळांना वह्या, पुस्तके, गणवेष, खुर्च्या, बाके, खाऊ व इतर आर्थिक मदत. 7. अभिनव ज्ञान मंदिर कडाव, कर्जत ता. जि. रायगड यांना वर्ग बांधून दिले. 8. शिवाजी मराठा प्रायमरी स्कूल, पुणे, समर्थ शिक्षण संस्था धनकवडी व अनेक शाळांना आर्थिक मदत व वह्या पुस्तके वाटप. 9. माळेगाव, नसरापूर येथील ज्ञानप्रकाश आदर्श विद्यालय यास जागा घेण्यास व शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यास मनुष्यबळ, बांधकाम, लोहकाम व इतर सर्व साहित्य पुरविण्याची व्यवस्था जवळ जवळ 7-8 लाखामध्ये आर्थिक मदत करीत आहेत. संपूर्ण शाळेचे नूतनीकरण व पूर्ण शाळा चालविण्यास घेण्याचा विचार असून त्यास ‘आठवले माध्यमिक विद्यालय’ असे नामकरण कार्यक्रम दि. 15/8/2002 रोजी जाहीर कार्यक्रमाद्वारे करण्यात आले आहे. पावणे दोन एकर जागा व 8 वर्ग बांधून दिले. 10. नसरापूर येथील बनेश्वर मंदिरासमोर पेशवेकालीन वाड्याजवळ श्री बुवासाहेब महाराजांची जुनी, जीर्ण अवस्थेतील समाधी आहे. त्याठिकाणी चांगल्या प्रकारे आर. सी. सी. बांधकामात मंदिर बांधले आहे. 11. वेगवेगळ्या शाळेत व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास व वसतीगृहास जमेल तेवढी मदत त्यातही जेवणाची व इतर आर्थिक मदत केली. शिवाय बर्याच वेळा सामाजिक, सार्वजनिक संस्था व आश्रमास, मंदिरास मदत केली आहे. इतर सामाजिक कार्ये - 1. क्रीडा भारती यांना आर्थिक मदत केली. 2. भोर तालुका वेल्हा आणि भोर येथील वनवासी विद्यार्थी वसतीगृहास जागा घेण्यासाठी मदत, गणवेष, अन्नधान्य, पुस्तके, वह्या व इतर प्रकारची मदत केली. 3. पुरंदर तालुक्यातील सिंधुताई सपकाळ यांच्या ममता सदन आश्रमाला अनेक प्रकारे वारंवार मदत केली जाते. त्यात वैद्यकीय तपासणी शिबिर, मुलांसाठी दिवाळी खाऊ, वह्या, पुस्तके व इतर मदत चालू आहे. 4. अनेक गावातील उरुस, हरिनाम सप्ताह, गणेशोत्सव, शिवजयंती, देवी देवतांची मंदिरे बांधण्यास मदत, रस्त्याचे काम, पाण्याची योजना यासाठी मदत केली जाते. 5. पूर्वी लातूर जिल्ह्यात झालेल्या भूकंपग्रस्त लोकांसाठी कपडे, अन्नधान्य व आर्थिक मदत केली. 6. संगम ब्रिजजवळील गुप्त शाखा विभागाच्या आवारापाशी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा पुतळा उभारण्यासाठी रु. 1,50,000/- अर्थ सहाय्य केले. 7. कारगिल युद्धात अमर झालेल्या जवानांसाठी रु. 75,000/- ची आर्थिक मदत केली. 8. गुजरात व सुनामीग्रस्तांना रु. 75,000/- ची आर्थिक मदत तसेच सकाळ व केसरी या वृत्तपत्रांनी जमविलेल्या निधीला अनुक्रम रु. 2,00,000/- आणि रु. 1,50,000/- अर्थसहाय्य केले. 10. वेगवेगळ्या संकटांच्या वेळी कारखान्यात रक्तदान शिबिर व तसेच कामगारांसाठी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले. 11. यशस्वी उद्योजक म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते इ. स. 1997 साली पुरस्कार मिळाला. मराठी तरुणांना अनेक परीने मदत व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचा ‘जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज’ तर्फे द्वितीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सदर पुरस्कार, श्री. विलासराव देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. 12. वारजे येथील श्री. घैसास गुरुजींच्या ‘वेदभवनास’ कायमस्वरुपी वार्षिक तांदूळाची मदत. 13. पुण्यातील अनेक गणेश उत्सवांना मदत, त्यातही नवी पेठेतील हत्ती गणपती मंडळास अनेक प्रकारची आर्थिक मदत केली. श्री. विजयराव तथा दादासाहेब आठवले यांच्या कर्तृत्वान मराठी उद्योजकास मानाचा मुजरा आणि उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा!
पंडित विनायक रामचंद्र आठवले
संगीत क्षेत्रातील दिग्गज

जन्म 1918 वंशावळ संदर्भ : गुहागर 10 शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आणि विविध अभ्यास शिबिरे, चर्चासत्रे, व्याख्याने, मैफिली, परिसंवाद याद्वारे अद्यापही संगीताची सेवा करण्यात मग्न असणारे एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून पंडित विनायक रामचंद्र आठवले आज विख्यात आहेत. पंडित वि. रा. आठवले यांचा जन्म दि. 20 डिसेंबर 1918 ला भोर येथे झाला. तर त्यांचे शिक्षण गुजराथमध्ये झाले. ते विज्ञान शाखेचे पदवीधर (बी. एस्सी.) असून त्यांनी संगीताचे शिक्षण स्व. पं. विनायकराव पटवर्धन (ग्वाल्हेर घराणे) व म. उस्ताद विलायत हुसेन खाँ (आग्रेवाले) यांच्याकडून प्राप्त केले. पंडितजींचे वडील उत्तम कीर्तनकार, संस्कृतचे प्रकांड पंडित, लेखक, वक्ते, प्राध्यापक, संशोधक आणि प्रखर राष्ट्रीय विचारांचे होते. वडिलांचा तोच वारसा पंडितजींनी समर्थपणे पुढे चालविला. ही गोष्ट जितकी दुर्मिळ तितकीच त्या उभयतांना अभिमानास्पद आहे. पंडित वि. रा. यांचा विवाह वयाच्या 26व्या वर्षी दि. 18 मे 1944 ला पुणे येथे संपन्न झाला. त्यांनी 42 च्या ‘चले जाव’ चळवळीत भाग घेतलेला असल्यामुळे त्यांच्यावर सरकारचं पकड वॉरंट होतं. ते तेव्हा भूमिगत होते. त्यामुळे त्यांच्या विवाहाची पत्रिका छापली नव्हती. अगदी खासगी रीतीने जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पुण्यात फडतरे चौक कानिटकर वाड्यात साधेपणाने त्यांचा विवाह साजरा करावा लागला. प्रारंभी काही काळ सन 1943 ते 1945 त्यांनी एका शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम केले. नंतर दोन वर्षे कलकत्त्याला व बडोद्यात संगीत महाविद्यालयात 1948 पर्यंत उपप्राचार्य पदावर ते कार्यरत होते. त्यानंतर मात्र 1949 ते 1970 तब्बल 22 वर्षे त्यांनी आकाशवाणीच्या अहमदाबाद, जयपूर, दिल्ली, मुंबई आदी केंद्रांवर विविध अधिकाराची पदे भूषवून तेथे आपला स्वतंत्र ठसा उमटविला. आकाशवाणीवर केवळ संगीताचे कार्यक्रम सादर करून ते थांबले नाहीत तर प्रात्यक्षिकांसह संगीताचे चर्चात्मक कार्यक्रम त्यांनी सादर केले. ही त्यांनी आकाशवाणीवर नव्याने सुरु केलेली प्रथा होती. आकाशवाणीतील सेवेतून निवृत्त झाल्यावर पंडितजींनी आपली संगीतसेवा अधिक जोमाने चालू ठेवली. एस. एन. डी. टी. विद्यापीठात त्यांनी 1970 ते 1979 या काळात रीडर बनून संगीत विभाग सांभाळला तर पुढे 1981 ते 1985 गोवा कला आकादमीमध्ये त्यांनी (र्चीीळल ऊळीशलीेीं) संगीत विभागाचे संचालक म्हणून मोलाचे कार्य केले. 1985 नंतर ते मुंबईत आले आणि विष्णु दिगंबरांची स्मृती म्हणून नव्या मुंबईत वाशी येथे त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची शाखा स्थापन करून तेथे 1994 पर्यंत त्यांनी स्वत:च्या पुढाकाराने संगीत शिक्षणाचे कार्य चालू ठेवले. त्या संस्थेमार्फत हे कार्य यापुढेही चालू राहीलच. पंडित वि. रा. यांनी देशभक्तीचा वारसादेखील आपल्या वडिलांकडून घेतला असल्यामुळे ते स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी झाले होते. 1942च्या महात्मा गांधींच्या ‘चले जाव’च्या आंदोलनात ते काही काळ भूमिगत झाले होते. पंडित वि. रा. हे पितृभक्त आहेत. त्यांचे वडील रा. ब. हे संस्कृतचे प्रकांड पंडित व संशोधक. त्यांच्या अनेक नियोजित ग्रंथांची हस्तलिखिते पंडितजींनी जपून ठेविली आहेत. त्यांना प्रसिद्धीचा प्रकाश मिळावा ही त्यांची उत्कट इच्छा आहे. त्यांनी स्वत: वडिलांची स्मृती म्हणून श्रीहर्ष रचित ‘नैषधीयचरित’ या महाकाव्याच्या पहिल्या सर्गाचा विवरणासहित त्यांच्या वडिलांनी केलेला मराठी अनुवाद प्रसिद्ध करून पितृऋणातून अल्पांशाने का होईना मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे. इतकंच नव्हे तर या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीच्या विक्रीतून होणारी प्राप्ती त्यांनी वडिलांच्या स्मृतीनिमित्त पुण्याच्या ‘आनंदाश्रम’ संस्थेला देणगी म्हणून दिल्याचं जाहीर करून सामाजिक जाणीवेचे दर्शन घडविले आहे. पंडित वि. रा. यांनी संगीत क्षेत्राला दिलेलं योगदान खूप मोलाचं आहे. ललित कला, ललित बिलास, भिन्न भैरव, पट काफी, मधुकल्याण कौसीबहार, मारु वसंत, चंद्रभैरव हे पंडितजींनी निर्माण केलेले नवीन राग ‘नाद सर्जन’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाद्वारे रसिकांना भेटतील. पंडितजींनी ‘तरंग नाद’ पुस्तकाद्वारे संगीतातील अनेक विषयांवर मोलाचे भाष्य केलेले आहे. ‘राग वैभव’ हे पंडितजींचं आणखी एक महत्त्वाचं दुर्मिळ पुस्तक. त्यामध्ये आजपर्यंत प्रसिद्ध न झालेल्या अनवट रागांच्या माहितीच्या चीजा नोटेशन्ससह दिलेल्या आहेत. पंडित वि. रा. आठवले गेल्या काही वर्षांपासून संगीत क्षेत्रातील मोठा प्रकल्प राबविण्याच्या कार्यात मग्न आहेत. रागदारी संगीताचा मार्मिक रसास्वाद घेण्यासाठी, कलेचा आनंद घेण्यासाठी, रसिकतेचा दर्जा उंचावून संगीतविषयक अभिरुची संपन्न करण्यासाठी विविध विषयांवरील प्रात्यक्षिकांसहित व्याख्यानमालेबरोबर त्यांनी स्वत: अभ्यास शिबिरे, चर्चासत्रे आयोजित करून या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान ते करीत आहेत. वयाच्या नव्वदीत पदार्पण केलेले पंडित वि. रा. आठवले आजही परमेश्वरी कृपेने ठणठणीत प्रकृतीचे वरदान प्राप्त केलेले भाग्यवान संगीत उपासक आहेत. अजूनही ते आपल्या कार्यात - व्यापात मग्न आहेत. या वयातही त्यांचा आवाज निकोप व खणखणीत असल्यामुळे आणि त्याला उत्साही स्वभावाची साथ लाभल्यामुळे त्यांची संगीत-साधना चालूच आहे. पंडित वि. रा. आठवले यांचे वास्तव्य गेल्या काही वर्षांपासून विलेपार्ले येथे त्यांचे सुपुत्र शिरीष यांच्याकडे असून त्यांची संगीत साधनेची परंपरा त्यांच्या सूनबाई सौ. अनीता स्वत:च्या संगीताच्या शिकवणी वर्गाद्वारे पुढे चालवीत आहेत तर त्यांच्या दोन नाती अश्विनी व ..... या देखील शास्त्रीय संगीतातील विशारद परीक्षा उत्तीर्ण आहेत. पंडितजींनी आपल्या वडिलांचा संगीत क्षेत्रातील वारसा पुढे चालविला आहे तो पुढील पिढ्यातही अव्याहत चालूच आहे याचं त्यांना विशेष समाधान वाटत असल्यास नवल नाही. पंडितजींना यापुढेही आरोग्यपूर्ण आणि समाधानी आयुष्य लाभो आणि त्यांचे मनोरथ पूर्ण होऊन रसिकांना त्यांची शताब्दी साजरी करण्याचं भाग्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. शब्दांकन : क्रांतिसेन आठवले
प्राध्यापक रामचंद्र बळवंत आठवले
संस्कृतचे प्रकांडपंडित, प्रभावी वक्ते, कीर्तनकार, संगीताचे षौकिन, आणि प्रखर राष्ट्रीय वृत्तीचे

जीवनकाल 1894-1987 वंशावळ संदर्भ : गुहागर 10 ज्यांचा जन्म आणि पदवीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्रात झाले आणि नोकरी निमित्त वयाच्या 25व्या वर्षापासून पुढे तब्बल 50 वर्षे (म्हणजे वयाच्या 75व्या वर्षापर्यंत) ज्यांचं कार्यकर्तृत्व गुजराथ राज्यात अहमदाबाद येथे बहरले आणि त्यानंतर वयाच्या 75व्या वर्षापासून 93व्या वर्षापर्यंत जीवनाची अखेरची 18 वर्षे ज्यांनी महाराष्ट्रात घालविली आणि शेवटपर्यंत जे सतत कार्यरत राहिले असे जुन्या पिढीतील अष्टपैलू प्रकांड पंडित प्राध्यापक रामचंद्र बळवंत आठवले हे आठवले कुळातील उपेक्षित पण अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्त्व. त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा हा त्रोटक परिचय आहे. कै. रा. ब. आठवले यांचा जन्म भोर-वाई मार्गावरील अंबारखिंड येथे दि. 17/11/1894 ला झाला. त्यांचे वडील बळवंत बाजी भोर संस्थानच्या अंबार खिंडीवरील अन्न छत्राचे व्यवस्थापक-कारभारी होते. त्यांचं कोकणात वास्तव्य होतं. त्यांच्या आईचे नाव सरस्वती व पत्नीचे नाव जानकी होते. रा. ब. हे एकुलते एक भाऊ व त्यांना सात बहिणी. रामचंद्र बळवंतांच बालपण कोकणात गेलं तर शिक्षण पुण्यात झालं. 1916 साली ते संस्कृत घेऊन बी. ए. ही पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि या परीक्षेत त्यांना भाऊ दाजी शिष्यवृत्ती थोडक्यात हुकली. पुढे व्यवसाय सांभाळून त्यांनी 1928 साली एम. ए. परीक्षेत भांडारकर पारितोषिक मिळविले. दरम्यान वयाच्या 24व्या वर्षी सन 1918 मध्येच ते अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालयात संस्कृतचे व्याख्याता (लेक्चरर) म्हणून दाखल झाले. तीन वर्षे त्यांनी तेथे लेक्चरर म्हणून नोकरी केली. आणि पुढे सन 1936 ते 1965 अशी सलग तीस वर्षे एल. डी. आर्टस् महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा केली. 65व्या वर्षी निवृत्त झाल्यावर ते गुजरात विद्यासभेत ‘रिसर्च गाईड’ पदावर दोन वर्षे कार्यरत होते. सन 1918 ते 1968 म्हणजे अर्धशतकाचा प्रदीर्घ काळ गुजरातमध्ये शिक्षणक्षेत्रात त्यांनी सलग कार्य केले. आदरणीय रा. ब. यांचा मूळ पिंड जरी संस्कृत अध्ययन - अध्यापन नि संशोधकाचा असला तरी ते शास्त्रीय संगीताचे उत्तम जाणकार होते. प्रखर राष्ट्रीय वृत्ती त्यांच्या अंगी लहानपणापासूनच बाणलेली असल्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीत विविध आंदोलनातून त्यांनी भाग घेणे अपरिहार्यच होते. म्हणूनच महात्मा गांधींच्या 1921च्या असहकार आंदोलनात त्यांनी उडी घेतली आणि सरकारी नोकरी सोडून महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून सहा वर्षे काम केले. परंतु महात्मा गांधींबरोबर शैक्षणिक धोरणावरून स्वतंत्र विचारांची बैठक असलेल्या रा. ब. यांचे मतभेद होऊन ते त्या विद्यापीठातून बाहेर पडले. अर्थात सन 1932 मध्ये महात्मा गांधींनी पुकारलेल्या दांडी सत्याग्रहात त्यांनी पुन्हा हिरिरीने भाग घेतला आणि परिणामी त्यांनी 6 महिने सश्रम कारावासही भोगला. स्वतंत्र अभ्यासू वृत्ती आणि जाज्ज्वल्य राष्ट्रभक्ती अंगात भिनलेली असल्यामुळे रा. ब. हे महात्मा गांधींच्या सर्वच राजकारणात मनापासून पूर्णांशाने फार काळ रमले नाहीत - समरस झाले नाहीत. म्हणूनच ते गांधीजींच्या बालेकिल्ल्यात राहूनही प्रसंगी त्यांच्यावर कीर्तन-प्रवचन नि भाषणातून ते जाहीर सडेतोड टीका करीत. प्राध्यापक रा. ब. हे नि:स्सीम टिळकभक्त होते. टिळकांच्या खालोखाल स्वातंत्र्यवीर सावरकर, रा. स्व. संघ प्रणीत हिंदुत्ववादाचे त्यांना आकर्षण होते. गांधीवधानंतर कांही आठवडे त्यांना खूपच मानसिक ताण सहन करावा लागला. त्यांच्या वाट्याला समाजाचा रोष अन् अप्रियताच अधिक आली असल्यास नवल नाही. इंदिरा गांधींच्या लढाऊ राजकारणाचेही ते काही काळ चाहते बनले होते. सन 1968 मध्ये वयाच्या 75व्या वर्षी प्रा. रा. ब. आठवले यांनी गुजरात कायमचे सोडले आणि मुंबईला विलेपार्ले येथे आपल्या चिरंजीवांकडे ते राहावयास आले. मुंबईत राहून त्यांचं लेखन-वाचन-संशोधन कार्य अखंडपणे चालूच होतं. जीवनाच्या अंतापर्यंत म्हणजे वयाच्या 93व्या वर्षापर्यंत ते एखाद्या महान् योग्याला शोभेल असंच तपस्वी जीवन जगले. योगी अरविंदांच्या पाँडिचरी आश्रमात, कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात तसंच ठाण्याच्या पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या तत्त्वज्ञान विद्यापीठात कार्यरत राहून त्यांनी आपल्या उत्तरायुष्यातील काही काळ घालविला. रा. ब. यांचे चिरंजीव पंडित वि. रा. आठवले हे संगीत क्षेत्रातले दिग्गज तर सर्वात धाकटे चिरंजीव अनंतराव हे मुंबईतील नामवंत वकील. त्यांना सावलीप्रमाणे साथ देणारी त्यांची पत्नी जानकीबाई म्हणजे विख्यात इतिहास संशोधक न. र. फाटक यांची बहीण. आदरणीय रा. ब. यांनी केलेली साहित्यसेवा देखील विशेष उल्लेखनीय आहे. श्री रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘प्राचीन साहित्य’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी केला. तसेच कवीन्द्राचार्य सरस्वती यांचे ‘कवींद्रकल्पद्रुम’ हे पुस्तक त्यांनी संपादित केले. पंडितराज जगन्नाथ यांच्या ‘रसगंगाधर’ या संस्कृत ग्रंथाचा मराठीमध्ये दोन विस्तृत खंडात रा. ब. यांनी केलेला सुबोध अनुवाद (सविस्तर स्पष्टीकरणात्मक टीपांसह) प्रसिद्ध आहे. तसेच ‘प्रस्तावना खंड’ हा तिसरा भाग त्यांनी सतत वीस वर्षे परिश्रम घेऊन सिद्ध केला. यामध्ये त्यांनी पंडितराज जगन्नाथ यांच्या चरित्रावर व साहित्य कृतींवर संशोधनात्मक प्रकाश पाडला असून संस्कृत साहित्यशास्त्राचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. त्यांचे त्रिखंडात्मक मराठी रसगंगाधर मराठी साहित्यातील तेजस्वी अलंकार गणला जात असून त्यास विद्वन्मान्यता लाभली आहे. श्रीहर्षाचे ‘नैषधीयचरित्र’ आणि माघाचे ‘शिशुपालवध’ या संस्कृत महाकाव्यांचा मराठी अनुवाद करून त्यावर रसग्रहणात्मक व संशोधनात्मक चिकित्सक प्रबंध लिहावयाचा त्यांचा मानस होता; पण हे त्यांचं कार्य पूर्ण होऊ शकलं नाही. तसेच जगन्नाथ पंडितांची काव्यप्रकाशावरील टीका, रत्नाकराचा हरिविजय, पेशवेकालीन एक अप्रसिद्ध नाटक यावर त्यांनी संशोधनपर लेखन करावयाचे ठरविले होते. पण तेही काम अपुरंच राहिलं. अर्थात् हे मराठी रसिकांचं व साहित्यप्रेमींचं दुर्दैव होय. या ठिकाणी एका गोष्टीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावयास पाहिजे की रा. ब. यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संकल्पित ग्रंथांपैकी ‘‘श्रीहर्षरचित् नैषधीयचरितम्’’ या महाकाव्याच्या पहिल्या भागाच्या विवरणासहित केलेल्या मराठी अनुवादाचा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांचे चिरंजीव संगीततज्ज्ञ पंडित वि. रा. आठवले यांच्या खटपटीने सन 1992 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यामुळे आपल्या वडिलांच्या ऋणातून अंशत: मुक्त झाल्याचं समाधान त्यांना मिळालं. आदरणीय रा. ब. यांच्या अन्य अप्रकाशित साहित्याचा प्रकाशनाची नि प्रसिध्दीची जबाबदारी पुढील पिढ्यांची आहे. तीच त्यांना उचित श्रध्दांजली ठरेल. रा. ब. यांची पाठांतर शक्ती खरोखर कोणालाही हेवा वाटावा अशीच होती. संस्कृतमधील हजारो सुभाषिते नि श्लोक त्यांना मुखोद्गत होतेच पण भवभूतीचे ‘मालती माधव’ हे संपूर्ण नाटक त्यांना तोंडपाठ होते. रा. ब. यांच्या जीवन चरित्राकडे दृष्टिक्षेप टाकला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्यांची गुजराथने तसेच महाराष्ट्राने देखील उपेक्षाच केली. त्यांचा जीवनातील बहुतेक काळ गुजराथेत गेला म्हणून महाराष्ट्राने तर ते जन्माने महाराष्ट्रीय व शेवटी महाराष्ट्रातच स्थायिक झाले म्हणून गुजराथने त्यांची उपेक्षा केली असा तर प्रकार नसेल ? मात्र त्यांच्या कार्याची योग्य ती दखल कोणत्याच राज्याने शासकीय पातळीवर घेतली नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. अर्थातच उत्तम वक्ते, प्रभावी कीर्तनकार, शास्त्रीय संगीताचे जाणकार, संस्कृतचे प्रकांड पंडित, प्रखर राष्ट्रीय वृत्तीचे देशभक्त, विद्वान प्राध्यापक, संशोधक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले आदरणीय रामचंद्र बळवंत आठवले यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा कालपटलावर उमटविला आहे. त्यांचं कार्य पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. शब्दांकन : क्रांतिसेन आठवले
कै. नागेश रघुनाथ आठवले
विशेष व्यक्तिमत्त्व

जीवनकाल 1923 वंशावळ संदर्भ : गुहागर 2/2 कै. नागेश रघुनाथ आठवले हे कट्टर हिंदुत्त्ववादी होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे परम भक्त होते. त्यांचे बालपण आणि शिक्षण सांगली येथे झाले. सांगलीला ‘श्रीरामाश्रम’ हे वडिलार्जित घर होते. इंटरपर्यंत शिकत असतानाच त्यांना देशासाठी काही करावे असे वाटू लागले, कारण स्वा. सावरकरांच्या चरित्राचा आणि विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन, इंटरनंतर शिक्षण सोडून त्यांनी हिंदुमहासभेच्या कामात स्वत:ला झोकून दिले. हिंदुमहासभेचे अत्यंत निष्ठावान असे कार्यकर्ता ते बनले. पुणे हिंदुमहासभेचे सचिव म्हणूनही त्यांनी धडाडीने कार्य केले. या कामामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला. देशाच्या दुर्दैवी फाळणीनंतर पंजाब, दिल्ली या राज्यात जाऊन त्यांनी निर्वासितांसाठी मदतकार्य केले. केसरीचे माजी संपादक ग. वि. केतकर यांच्या केसरीतून प्रसिद्ध झालेल्या संपादकीय लेखांचा संग्रह ‘मर्मभेद’ या नांवाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला होता. त्याचे संपादन आणि प्रकाशन त्यांनी केले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वा. सावरकरांनी त्यांना राजकारण सोडून वैयक्तिक विकास घडवून आणावा आणि आर्थिक रूपाने हिंदुत्त्वाच्या प्रचारास मदत करावी असा प्रेमळ सल्ला दिला होता. तो शिरोधार्य मानून त्यांनी स्वत:चे अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण केले आणि एम. ए. एल. एल. बी. अशी उपाधी मिळविली. पुणे विद्यापीठात 32 वर्षे त्यांनी प्रशासकीय विभागात नोकरी केली. क्रांतिकारक सावरकर त्यांना जेवढे प्रिय होते तेवढेच बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ सावरकर त्यांना पूजनीय होते. ‘स्वत:च्या मृत्यूनंतर कोणतेही धार्मिक विधी, श्राद्ध इत्यादी न करता स्वत:च्या स्वकष्टार्जित कमाईचा बराच हिस्सा स्वा. सावरकरांच्या स्मारकासाठी तसेच त्यांच्या विचारांच्या प्रचारासाठी खर्च करावा’ असा मनोदय त्यांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केला होता. महर्षी कर्वे यांच्या कार्याबद्दलही त्यांना आदर होता आणि त्यांच्या संस्थेलाही देणगी द्यावी असा विचार त्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या या इच्छेनुसार, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई. या संस्थेला एकूण रु. 5॥ लाखांची देणगी दिली. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला रु. 78,200/- ची देणगी दिली. तसेच म. ए. सोसायटी, पुणे या शैक्षणिक संस्थेला रु. 1 लाख 5 हजारांची देणगी दिली. या देणगीतून म. ए. सोसायटीच्या मुलींच्या सैनिकी शाळेत आणि रेणुका स्वरूप मुलीच्या प्रशालेत दरवर्षी 26 फेब्रु. रोजी स्वा. सावरकर स्मृतीदिन सादर केला जाईल. तसेच गुणवंत विद्यार्थिनींना रोख पारितोषिके आणि सावरकर चरित्र पुरस्कार म्हणून दिले जाईल. अशाप्रकारे या देणगीच्या विनियोगातून स्वा. सावरकरांच्या चरित्राचा आणि कार्याचा परिचय नव्या पिढीला होत राहील आणि त्यामुळे कै. ना. र. आठवले यांच्या इच्छेची परिपूर्ती होईल. कै. ना. र. आठवले यांनी अशा तर्हेने स्वकष्टार्जित कमाईतून स्वातंत्र्यवीरांना आपली कृतज्ञ श्रद्धांजली वाहिली आहे. शब्दांकन : श्रीमती मालती नागेश आठवले