जीवनकाल 1923
वंशावळ संदर्भ : गुहागर 2/2
कै. नागेश रघुनाथ आठवले हे कट्टर हिंदुत्त्ववादी होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे परम भक्त होते.
त्यांचे बालपण आणि शिक्षण सांगली येथे झाले. सांगलीला ‘श्रीरामाश्रम’ हे वडिलार्जित घर होते.
इंटरपर्यंत शिकत असतानाच त्यांना देशासाठी काही करावे असे वाटू लागले, कारण स्वा. सावरकरांच्या चरित्राचा आणि विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन, इंटरनंतर शिक्षण सोडून त्यांनी हिंदुमहासभेच्या कामात स्वत:ला झोकून दिले.
हिंदुमहासभेचे अत्यंत निष्ठावान असे कार्यकर्ता ते बनले. पुणे हिंदुमहासभेचे सचिव म्हणूनही त्यांनी धडाडीने कार्य केले. या कामामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला.
देशाच्या दुर्दैवी फाळणीनंतर पंजाब, दिल्ली या राज्यात जाऊन त्यांनी निर्वासितांसाठी मदतकार्य केले.
केसरीचे माजी संपादक ग. वि. केतकर यांच्या केसरीतून प्रसिद्ध झालेल्या संपादकीय लेखांचा संग्रह ‘मर्मभेद’ या नांवाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला होता. त्याचे संपादन आणि प्रकाशन त्यांनी केले होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वा. सावरकरांनी त्यांना राजकारण सोडून वैयक्तिक विकास घडवून आणावा आणि आर्थिक रूपाने हिंदुत्त्वाच्या प्रचारास मदत करावी असा प्रेमळ सल्ला दिला होता. तो शिरोधार्य मानून त्यांनी स्वत:चे अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण केले आणि एम. ए. एल. एल. बी. अशी उपाधी मिळविली. पुणे विद्यापीठात 32 वर्षे त्यांनी प्रशासकीय विभागात नोकरी केली.
क्रांतिकारक सावरकर त्यांना जेवढे प्रिय होते तेवढेच बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ सावरकर त्यांना पूजनीय होते.
‘स्वत:च्या मृत्यूनंतर कोणतेही धार्मिक विधी, श्राद्ध इत्यादी न करता स्वत:च्या स्वकष्टार्जित कमाईचा बराच हिस्सा स्वा. सावरकरांच्या स्मारकासाठी तसेच त्यांच्या विचारांच्या प्रचारासाठी खर्च करावा’ असा मनोदय त्यांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केला होता. महर्षी कर्वे यांच्या कार्याबद्दलही त्यांना आदर होता आणि त्यांच्या संस्थेलाही देणगी द्यावी असा विचार त्यांनी व्यक्त केला होता.
त्यांच्या या इच्छेनुसार, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई. या संस्थेला एकूण रु. 5॥ लाखांची देणगी दिली.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला रु. 78,200/- ची देणगी दिली.
तसेच म. ए. सोसायटी, पुणे या शैक्षणिक संस्थेला रु. 1 लाख 5 हजारांची देणगी दिली. या देणगीतून म. ए. सोसायटीच्या मुलींच्या सैनिकी शाळेत आणि रेणुका स्वरूप मुलीच्या प्रशालेत दरवर्षी 26 फेब्रु. रोजी स्वा. सावरकर स्मृतीदिन सादर केला जाईल. तसेच गुणवंत विद्यार्थिनींना रोख पारितोषिके आणि सावरकर चरित्र पुरस्कार म्हणून दिले जाईल. अशाप्रकारे या देणगीच्या विनियोगातून स्वा. सावरकरांच्या चरित्राचा आणि कार्याचा परिचय नव्या पिढीला होत राहील आणि त्यामुळे कै. ना. र. आठवले यांच्या इच्छेची परिपूर्ती होईल. कै. ना. र. आठवले यांनी अशा तर्हेने स्वकष्टार्जित कमाईतून स्वातंत्र्यवीरांना आपली कृतज्ञ श्रद्धांजली वाहिली आहे.
शब्दांकन : श्रीमती मालती नागेश आठवले