Kulsammelan

कुलसंमेलन

नागांव कुल संमेलन २०२३ इतिवृत्त

तारीख –  २५ व २६ फेब्रुवारी २०२३

स्थान – सिंधूसागर हॉलिडे होम,  कोठारभात लेन, नागांव, तालुका अलिबाग , जिल्हा रायगड

उपस्थिती …. एकूण ४०० व्यक्ती माहेरवाशीणींसह

बाहेरून आलेल्या लोकांची राहण्याची सोय नागाव येथील सर्व आठवले कुटुंबांनी त्यांच्या रिसॉर्ट मध्ये विनामुल्य अतिशय उत्कृष्ट केली होती. जवळजवळ २०० लोकांची राहण्याची सोय केली गेली.

कार्यक्रमासाठी सिंधुसागर येथे भव्य मांडव टाकण्यात आला होता व भोजनासाठी जवळच तसाच  दुसरा मांडव टाकण्यात आला होता. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात तीन वेळचे जेवण, नाश्ता, चहा इत्यादीचा समावेश होता.

दि. २५ रोजी सकाळी साडे साडेदहा वाजता गणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावेळी नागाव येथील व बाहेर गावांहून आलेली काही आठवले मंडळी उपस्थित होती. बारा वाजता, येणाऱ्या सहभागी व्यक्तींची नाव नोंदणी व त्यांच्या निवासाच्या व्यवस्थेची सुरुवात करण्यात आली.  तीन वाजेपर्यंत भोजन व विश्रांती आटोपल्यावर,  श्री केदार विनायक आठवले यांचा व्हॉइस कल्चर व संधी या विषयावर दृकश्राव्य कार्यक्रम झाला. साधारण सव्वा तास चाललेल्या या कार्यक्रमात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती श्री केदार यांनी दिली. खूप मनोरंजक असा हा कार्यक्रम झाला व सर्व श्रोत्यांना खूप आवडला.

या कार्यक्रमानंतर चहापान व सभासदांना नागांव समुद्रकिनारी जाण्याची मुभा होती. सायंकाळी साडेसहा वाजता विविध करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये नागाव येथील मंडळी तसेच बाहेर गावांहुन आलेल्या काही कलाकारांनी भाग घेतला. अतिशय रंजक असा हा कार्यक्रम होता.

रात्रीच्या भोजनानंतर श्री. सौरभ उदय आठवले यांनी खगोल शास्त्र व आकाशदर्शन यावर अतिशय माहितीपूर्ण व्याख्यान दिले व सर्वांना दुर्बिणीतून प्रत्यक्ष नक्षत्र बा तारे यांचे दर्शन घडविले. रात्र खूप झाली असून सुद्धा बहुतेक मंडळींनी ह्याचा लाभ घेतला. नंतर सर्व आपापल्या निवासस्थानी विश्रांतीसाठी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे दि. २६ रोजी नऊ वाजता मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.  त्याआधी सर्व सभासदांना नाश्ता देण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. अंजली आनंद आठवले एम. एस. सी., पी. एचडी. (न्यूक्लियर केमिस्ट्री) या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे,  फाउंडेशन अध्यक्ष व इतर पदाधिकारी, नागांव येथील कार्यकारणी चे पदाधिकारी यांच्या हस्ते श्री. परशुराम. श्री. व्याडेश्वर, श्री. योगेश्वरी व श्री गणपती यांच्या पूजनाने व दिपप्रज्वललाने झाली. याच दिवशी स्वा. वि. दा. सावरकर पुण्यतिथी असल्यामुळे त्यांच्याही प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सौ बापट व सौ.आठवले यांनी सरस्वती वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्व मान्यवर मंचावरती स्थानापन्न झाले व सर्वप्रथम,  गेल्या एक वर्षात जे माननीय सदस्य दिवंगत झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. त्यानंतर मागील कुल संमेलनानंतर म्हणजेच एक मार्च २०२० नंतर ज्यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केली अशा व्यक्तींचा पुष्पगुच्छ व नारळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच फेब्रुवारी महिन्यात ज्या सदस्यांचे वाढदिवस होते त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

आपल्या फाउंडेशनच्या वृद्धीमध्ये ज्या व्यक्तींनी योगदान दिले आणि तेही विनामूल्य , अशा श्री. महेश अनंत आठवले, कंपनी सेक्रेटरी,  श्री. प्रीतम आठवले, चार्टर्ड अकाउंटंट,  व सौ. मुग्धा वाड (यांनी पूर्वीच्या कुलवृत्तांतातील माहिती युनिकोड मध्ये करून दिली) यांचा पुष्पगुच्छ, नारळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या मान्यवरांची ओळख श्री विनायक विष्णू यांनी थोडक्यात करून दिली.

नागांव कुल संमेलनानिमित्त फाउंडेशन तर्फे जे सुसंवाद हे त्रैमासिक काढण्यात येते , त्याची स्मरणिका काढण्यात आली. त्याचे प्रकाशन प्रमुख पाहुणे व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. हीच स्मरणिका हजर असलेल्या प्रत्येक सभासदास देण्यात आली.

त्यानंतर श्री विनायक विष्णू यांनी प्रमुख पाहुणे सौ अंजलीताई यांचा थोडक्यात परिचय करून दिला. सौ अंजलीताई यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार मांडले. एकंदर उच्च शिक्षणामध्ये असलेल्या संधी तसेच त्यासाठी करावयाची तयारी याबाबत त्यांनी विस्तृत विवेचन केले. अतिशय उत्तम असे मार्गदर्शनपर असे त्यांचे भाषण झाले

नंतर वेळ होती ती फाउंडेशन चे कार्य व फाउंडेशन तर्फे तयार करण्यात आलेली वेबसाईट आणि कुलवृत्तान्त याविषयी निवेदन करण्याची. श्री श्रीकांत आठवले, फाउंडेशनचे उपाध्यक्ष, यांनी दृकश्राव्य पद्धतीने सर्व माहिती सभासदांना दिली.  आपले एक सदस्य कैलासवासी विजय मुकुंद आठवले यांनी त्यांच्या हयातीत फाउंडेशनला वेळोवेळी जे मार्गदर्शन केले व आर्थिक मदतही केली त्याबद्दल त्यांना परशुराम मूर्ती व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार त्यांच्या सुविद्य  पत्नी श्रीमती विभावरी आठवले यांनी स्वीकारला. श्री वसंत गणेश आठवले यांनीही आपल्या फाउंडेशनला एक देणगी देऊन शैक्षणिक क्षेत्रात आठवले मंडळींना मदत करण्यासाठी त्या निधीचा वापर करावा असे सुचवले होते. त्यानिमित्त त्यांचाही परशुराम मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

श्री विद्याधर गणेश आठवले यांनी “माती विना शेती” या विषयावर इजराइल तंत्रज्ञानाने पडीक जमिनीत सुद्धा उत्तम शेती कशी करता येईल यावर सखोल , अभ्यासू भाषण केले. त्यांचा अनुभव व भाषणाची शैली यांचा उत्तम प्रभाव श्रोत्यांमध्ये  पडला.  या कार्यक्रमानंतर सर्वजण भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी गेले. अत्यंत आपुलकीने अत्यंत चविष्ट असे भोजन सर्वांना देण्यात आले

शेवटच्या सत्रात श्री अनिल महादेव, अध्यक्ष चित्पावन आठवले फाउंडेशन, यांनी सर्व कार्यकर्ते, कार्यकारिणीचे सदस्य, ज्यांनी ज्यांनी या कुलसंमेलनात सेवा प्रस्तुत केली अशा सर्व मंडळींचे आभार मानले.

संपूर्ण वंदेमातरम या राष्ट्रगीताने  कार्यक्रमाची सांगता झाली

नागावकर मंडळींनी हे संमेलन उत्कृष्ट व देखणे व्हावे यासाठी फार मेहनत घेतली होती. कुलसंमेलनाचे काटेकोर नियोजन व उत्तम सादरीकरणाचा एक मानदंड आठवले कुलसंमेलन समितीने घालून दिला. सर्व उपस्थित मंडळींनी त्यांचे आभार मानले व कौतुक केले. पुढील संमेलन 2025 साली घेण्याचे ठरले.

गणपती पूजन १
गणपती पूजन २
पार्श्वभूमी
दीप प्रज्वलन

केदार विनायक सत्कार 

प्रवेशद्वार
सुसंवाद प्रकाशन
आभार प्रदर्शन

नागाव येथे चित्तपावन आठवले फौंडेशन कुलसंमेलन – २५ व २६ फेब्रुवारी २०२३ – भाग १: २५ फेब्रुवारी २०२३

आपले कुलसंमेलन अत्यंत काटेकोर नियिजनामुळे व आपल्या सर्वांच्या सहभागामुळे उत्कृष्टपणे संपन्न झाले. सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद. संमेलनाचे विडिओ रेकॉर्डिंग केले होते व ते आता ४ भागात सादर करीत आहोत.

नागाव येथे चित्तपावन आठवले फौंडेशन कुलसंमेलन – २५ व २६ फेब्रुवारी २०२३ – भाग २

भाग २: २५ फेब्रुवारी २०२३ – सांस्कृतिक कार्यक्रम, आपल्या आठवले परिवारातील उत्साही कलाकारांनी भरतनाट्यम नृत्य , कत्थक नृत्य, सुरेल गाणी, बासरी व तबला वादन अश्या माध्यमातून विविध कलाकृती सादर केल्या आणि उपस्थितांनी मनापासून दाद दिली.

नागाव येथे चित्तपावन आठवले फौंडेशन कुलसंमेलन – २५ व २६ फेब्रुवारी २०२३: भाग ३: २६ फेब्रुवारी २०२३

भाग ३: २६ फेब्रुवारी २०२३ – श्री गणपती मंदिरात पूजा व परशुरामनगरीत सर्वांचे एकत्रीकरण. संमेलनस्थळी श्री परशुराम, श्री गणपती, व श्रीदेवी सरस्वती यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन, दिवंगत आठवले सदस्यांना श्रद्धांजली, पठण स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार, ७५ वर्षे पूर्ण झालेल्यांचा सत्कार, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार, सैन्यदलातील आठवले परिवारातील आजी व माजी सैनिकांचा तसेच इतर मान्यवरांचा सत्कार, सुसंवाद या संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन, प्रमुख पाहुण्यांचे भाषण,

नागाव येथे चित्तपावन आठवले फौंडेशन कुलसंमेलन – २५ व २६ फेब्रुवारी २०२३ – भाग ४: २६ फेब्रुवारी २०२३

भाग ४: २६ फेब्रुवारी २०२३ – फौंडेशनच्या कार्याची सविस्तर माहिती तसेच वेब साईट व U Tube चॅनेलची माहिती, ‘माती विना शेती’ हे श्री विद्याधर आठवले यांचे व्याख्यान, फौंडेशनच्या अध्यक्षांचे मनोगत, कर्नाटक येथील आठवले परिवाराची ओळख व स्वागत, नगावमधील सर्व स्वयंसेवकांचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार. प्रश्नोत्तरे, संपूर्ण वंदेमातरम व संमेलन समाप्ती.


Kulsammelan 2020

कुलसंमेलन २०२0


प्रथम कुलसंमेलन मार्च २०२०: एक साठवण

चित्पावन आठवले कुळाचे कुलसंमेलन १ मार्च ला पुणे येथे प्रतिज्ञा मंगल कार्यालय, कर्वेनगर येथे संपन्न झाले. महाराष्ट्र चित्पावन संघाचे श्री. जयंत नातू, श्री. अशोक वझे, तसेच श्री. अनिल गानू हे खास निमंत्रित म्हणुन हजर होते.

सकाळी ८ वाजता सभासद नाव नोंदणीस आरंभ झाला व २८० जणांनी नाव नोंदणी केली. इतका अभूतपूर्व प्रतिसाद खचीतच एखाद्या कुलसंमेलनास मिळाला असेल. बरोबर १०.१५ ला सौ. शैलाताई मुकुंद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून मंच सभाळला. जेष्ठ सदस्य श्री. माधवराव आठवले व सौ, सुमतीबाई यांचे शुभहस्ते परशुराम पूजनाने संमेलनाची सुरवात झाली. यानंतर खास निमंत्रित श्री. विजय मुकुंद, श्री. मिलिंद पुरुषोत्तम, श्री. अनिल महादेव, श्री.सतीश गजानन व श्री. विनायक विष्णू यांचे शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सौ. वृषाली आठवले मावळंकर यांनी सरस्वती वंदन सादर केले. खास निमंत्रितांचा सत्कार व स्वागत आमचे जेष्ठ सदस्य श्री. विजयदादा मुकुंद यांनी केले.

श्री. सतीश गजानन यांनी या संमेलनाचे मुख संयोजक म्हणून प्रास्ताविक केले. त्यांनी या संमेलन आयोजनामागील पार्श्वभूमी विदित केली. हे संमेलन यशस्वी व्हावे म्हणून ज्या कार्यकर्त्यांचा हातभार लागला त्या सर्वांचा त्यांनी नामोल्लेख केला. यावेळी सर्वच सभासदांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. श्री. अशोक वझे यांनी चित्पावन संघाच्या विविध उपक्रमांची माहीती देत नवीन उभारण्यात येणाऱ्या  इमारतीला भरघोस देणगी देण्याविषयी विनंती केली. बरोबर ११ वाजता आमच्यातील वैशिष्ठ्यपुर्ण कामिगरी करत असलेले  श्री. विजय मुकुंद (शोगिनी उद्योग समूहाचे संस्थापक), श्री. मिलिंद पुरुषोत्तम (आठवले फूडस चे संचालक), सौ. प्रतिभा जयंत (अहमदाबाद येथील दंत वैद्यक व समाज सेविका), सौ. सरोज जयंत (मुंबई येथील आर्टिफिशीयल ज्वेलरी निर्माती), सौ. स्वप्ना नचीकेत (पुणे येथील एकमेव महीला प्लास्टीक सर्जन), व सौ. क्रांती पाटणकर (वकील व समाजसेवक) यांची प्रकट मुलाखत सौ शैला मुकुंद यांनी घेतली. सर्वच सभासदाना हा कार्यक्रम अतिशय आवडला.  नंतर सभासदांनी ‘श्रीखंड पुरी’ भोजनाचा आनंद घेतला व त्याचवेळी एकमेकांशी परिचय करुन घेतला.

भोजना नंतर सर्व सभासद परत २.३० वाजता पुढील कार्यक्रमासाठी एकत्र जमले. आता श्री. श्रीकांत गोपाळ यांनी सूत्र संचालनाची जबाबदारी घेतली. आठवले कुळातील अतिशय पूजनीय अशा कै. प. पु. पडुरंगशास्त्री आठवले व कै. पु. अनंत दामोदर उफ स्वामी वरदानंद भारती यांचे हे जन्म शताब्धी वर्षं असल्याने त्यांच्या प्रतिमेस हार घालून त्यांना आदरांजली वाहिली.  कै. अनंतरावांचे चिरंजिव श्री. महेश अनंत व कै. पांडुरंगशास्त्री यांच्या चुलत भगिनी सौ केळकर त्यांनी थोडक्यात या दोघांविषयी माहिती सांगितली

श्री. सतीश गजानन यांनी ८० वर्षावरील जेष्ठ सभासदांचा सत्कार केला तर श्री. विनायक विष्णु यांनी ७५ वर्षावरील सदस्यांचा सत्कार केला. सौ. अंजली हरीश याना याच दिवशी ६० वर्षे पूर्ण झाली म्हणून सौ.यशश्री सुयोग यांचे हस्ते त्यांचा सत्कार करुन त्याना शुभेछा दिल्या. श्री. विनायक विष्णू यांनी पुढील कुलसम्मेलन कुठे व का भरवावे, कुलवृत्तांताचे पुढील काम कसे करावे, आठवले कुळाचा  ट्रस्ट असावा का नाही व शिल्लक रकमेचा विनियोग कसा करावा याविषयी उपस्थितांबरोबर चर्चा केली. बऱ्याच सदस्यानी खूप सूचना केल्या. तसेच शंकांना श्री. विनायक विष्णू व श्री. सतीश गजानन यांनी उत्तरे दिली. श्री.अनिल महादेव यांनी आभार मानले. सौ. सीमा दत्तात्रय यांच्या पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Vyaspeeth
Managing Committee
Audience