
जीवनकाल 1923 ते 2001 वंशावळ संदर्भ : नागाव 1/7 अलिबागजवळील सातघर या खेड्यात दि. 3 मार्च 1923ला जन्मलेल्या सदाशिव नथू आठवले यांना 79 वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं. पुण्यात वृद्धापकाळाने दि. 8 डिसेंबर 2001ला बेशुद्धावस्थेत त्यांचं निधन झालं. मुंबई विद्यापीठातून एम. ए. पदवी संपादन केल्यावर त्यांनी 1946 मध्ये पुण्याच्या स. प. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कामास प्रारंभ केला. कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातही त्यांनी इतिहास व राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. सोळा वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्यावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या आग्रहावरून एल्फिन्स्टन कॉलेजमधील नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला आणि सन 1963 मध्ये वाईच्या ‘मराठी विश्वकोश निर्मिती’ कार्यात ते सहभागी झाले. येथे त्यांनी प्रभारी विभाग संपादक म्हणून आठ वर्षे काम केले. तेथे मतभेद झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व सन 1971 मध्ये ते पुन्हा अध्यापनाकडे वळले. कुर्डुवाडी व अहमदनगर येथील महाविद्यालयात त्यांनी प्राचार्यपद भूषविले. अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयातून सन 1982 मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी पूर्णत: इतिहास संशोधनाच्या कार्याला स्वत:स वाहून घेतले. त्यानंतर अखेरपर्यंत ते पुण्यातच वास्तव्यास होते. विपुल लेखन व ग्रंथनिर्मिती :- प्रा. सदाशिव आठवले यांनी राज्यशास्त्र व इतिहास या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांनी मराठी व इंग्रजीतून अनेक ग्रंथ लिहिले. ‘लोकशाहीचा कारभार’ आणि ‘लोकमत’ ही त्यांची राज्यशास्त्रावरील पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे चार्वाक, इतिहासाचे तत्त्वज्ञान, शिवाजी आणि शिवयुग, मराठी सत्तेचा विकास आणि र्हास, नाना फडणीस आणि इंग्रज, रामशास्त्री प्रभुणे, सरदार बापू गोखले, उमाजी राजे - मुक्काम डोंगर, दारा शुकोव्ह, केमाल पाशा, आधुनिक जग, अर्वाचीन युरोप, हिंगणे दप्तर, शिंदेशाही इतिहासाची साधने, जॉर्ज वॉशिंग्टन, जगद्गुरु इब्राहिम आदिलशहा, रामायण, महाभारत, ऐका भाऊबंदांनो तुमची कहाणी, तुळशीबागवाले दप्तर, विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय, कृष्ण, बुंदेलखंडाचा महाराज छत्रसाल अशी इतिहासावरील तेवीस पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेल्या चार्वाक, इतिहासाचे तत्त्वज्ञान आणि सरदार बापू गोखले या तीन पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. सरदार गोखले यांच्यावरील त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला केसरी-मराठा संस्थेनेही पुरस्कार देऊन गौरविले आहे. प्रा. सदाशिव आठवले यांनी इंग्रजीतूनही सुमारे 25 शोध निबंध लिहिले आहेत. त्यांची ललित लेखनही भरपूर केले असून त्यांचे बारा कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. प्रा. सदाशिव आठवले यांची इतिहास लेखनविषयक अत्यंत वस्तुनिष्ठ अशी चिकित्सक दृष्टी होती. संस्कृत साहित्यकार कल्हण याच्या ‘ना मूलं लिख्यते किंचित्’ (पुराव्याशिवाय काहीही लिहिणार नाही) उक्तीप्रमाणे ते लेखन करीत. त्यामुळे स्पष्टवक्तेपणा नि परखडपणा हे त्यांच्या स्वभावाचे नि लेखनाचे विशेष पैलू होते. म्हणूनच नाना फडणीसांवर त्यांनी संशोधनपूर्वक लिहिलेल्या प्रबंधासंबंधात त्यांनी काढलेल्या अनुमानविषयक मतांमध्ये तत्कालीन परीक्षकांनी बदल करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी त्यास स्पष्टपणे नकार दिला व पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी नाकारली. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात साप्ताहिक - मासिक चर्चासत्रातून भाग घेऊन त्यांनी अनेक शोध निबंध वाचले. प्रा. ग. ह. खरे यांच्या निधनानंतर (1985) काही वर्षे त्यांनी मंडळाचे कार्याध्यक्षपद भूषविले. प्रा. आठवले यांना 1986 मध्ये हृदयविकाराचा त्रास सुरु झाला. पुढे त्यांची दृष्टी अधू झाली. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. तरीही जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांचे संशोधन - लेखनाचे कार्य धीमेपणाने का होईना पण अखंडपणे चालू होते. आठवले कुलाला भूषण ठरावे असं प्रा. सदाशिव नथू आठवले यांचं व्यक्तिमत्त्व नि कार्य कर्तृत्व होतं.