चित्पावन - आठवले
आपल्या आठवले कुलाचा ‘चित्पावन’ या शब्दाशी अतूट संबंध आहे. तसेच सर्व आठवले कुलाचे गोत्र ‘अत्रि’ असून मूळ पुरुष अत्रि ऋषी असल्याने आपण सर्व धार्मिक विधींतून ‘अत्रि गोत्रोत्पन्नोऽहं’ असा पुनरुच्चार करतो. चित्रकूट पर्वतावरील आश्रम सोडून श्रीराम हे लक्षण व सीतेसह अत्रीच्या आश्रमात आले होते असा उल्लेख रामायणात आला आहे. तसेच अयोध्येत परत आल्यावर अत्रि ऋषींनी श्रीरामांचे अभिनंदन केल्याचा उल्लेख आहे.
डॉ. प.वि .वर्तक या विद्वान आणि ज्येष्ठ विचारवंतांच्या मते चित्पावन हे बाहेरून आलेले नसून ते मूळ भारतीयच आहेत त्यांनी परशुरामाबरोबर कोकणात येऊन वस्ती केली. डॉ. मधुकर अष्टीकर यांच्यामते देखील चित्पावन हे मूळचे भारतीय ब्राह्मणच आहेत.
सुप्रसिद्ध इतिहास संशोधक वा.वि .भिडे यांनी साधक-बाधक सखोल अभ्यासानंतर स्पष्ट प्रतिपादन केले आहे की चित्पावन हे वैदिक धर्मीय आर्य आहेत. ‘चित्पावन’ या विषयावर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी सखोल संशोधन करून ‘चित्पावनांची मूळपीठिका’ हा शोधनिबंध लिहून त्यात सन १२२० पासूनचा चित्पावनांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांच्या मते इसवी सन पूर्व ११७४ मध्ये चौदा माणसांना बरोबर घेऊन भगवान परशुरामाने पहिल्यांदा कोकणात वस्ती केली. (डॉ. प. वि. वर्तक यांच्या संशोधनानुसार ज्योतिर्गणिताच्या आधारे परशुरामाचा काळ इ. स. पूर्व ८ ते ९ हजार वर्षे आहे. परशुराम हा विष्णूचा सहावा अवतार तर श्रीराम ७ वा व श्रीकृष्ण ८ वा)
भगवान परशुरामांनी महेंद्र पर्वताच्या (म्हणजेच आताचे परशुराम क्षेत्र) आसपास वस्ती केली. हे अग्नीचे उपासक होते. उपासनेसाठी त्यांना पाच प्रकारच्या चितींची आवश्यकता होती. चिती म्हणजे विविध पक्ष्यांच्या आकारात रसलेल्या विटा. त्यांचं यज्ञकुंड बनवत. तेथे प्रज्वलित केलेला अग्नी म्हणजे चित्याग्नी किंवा चित्य. या चित्य उपासनेमुळे जे ब्राह्मण पावन झाले त्यांना कोकणातील मूळ रहिवासी ‘चित्यपावन’ म्हणू लागले. त्याचाच पुढे ‘चित्पावन’ हा अपभ्रंश झाला.
चित्पावनांच्या स्वभावविशेषांविषयी आपटे कुलवृत्तांतात म्हटले आहे की, “चित्पावनांनी स्थलांतर करून कोकणात वस्ती केली. त्यामुळे स्थलांतरितात सामान्यपणे आढळणारे गूण त्यांच्यात आढळतात. चित्पावन कष्टाळू, परिस्थितीशी झुंज देणारे, काटकसरीने वागणारे, बोलण्यात व वागण्यात अघळपघळपणा न ठेवणारे, सावध व शिस्तबद्ध असतात. चित्पावन काटकसर जरूर करतील, पण उधारी सहसा करणार नाहीत. उधारी केलीच तर बुडवणार नाहीत. चित्पावन पैशाचा अतिरेकी मोह ठेवत नाहीत. अंथरुण पाहून हातपाय पसरतात. डोळस धर्मपरायणता आणि पापभीरुता हे चित्पावनांच्या स्वभावाचे विशेष आहेत. त्यामुळे धर्माचा अतिरेक न करता आधुनिक विज्ञाननिष्ठ जीवनाशी चित्पावनांना पटकन जुळवून घेता आले. चित्पावन समाजातील व्यक्तींनी स्वातंत्र्यलढा,राजकारण,समाजकारण,धर्मकारण,साहित्य,संगीत,चित्रपट, नाटक अशा अनेक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचे ठसे उमटविले आहेत.”
चित्पावन म्हणजे जे चितेतून पावन झाले ते चित्पावन अशीही कथा आहे. अनेक जणांनी आपापल्या संशॊधनानुसार आपण भारतामध्ये कुठून व कसे आलो याचेबद्दल लिहीले आहे. परंतु आपला इतिहास बघितला तर चित्त्पावनांनी आपल्या भारत देशासाठी जे योगदान दिले आहे त्यावरून आपले राष्ट्रप्रेम व भारतीयत्वाची आत्मीयता हे आपण भारतातीलच आहोत हेच सिद्ध होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेले बलिदान किंवा प्रयत्न असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेले संशॊधन किंवा सुधारणा असतील त्यात चित्पावन अग्रेसरच आहेत. चित्तपावनांमध्ये एकूण २७४ आडनावे आहेत त्यापैकी १३९ आडनावे प्रचलित आहेत
चित्पावनात चौदा गोत्रे आहेत - अत्रि, कपि, कश्यप, कौंडिण्य, कौशिक, गार्ग्य, जमदग्न्य, नित्युंदन, बाभ्रव्य , भारद्वाज, वत्स, वसिष्ठ, विष्णुवृद्ध, आणि शांडिल्य.