प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले


स्वाध्याय परिवाराचे प्रणेते

जीवनकाल: 1920 ते 2003
वंशावळ संदर्भ: सोमेश्वर 2/1

कोट्यवधी देशबांधवांसाठी स्वत:चा देह चंदनाप्रमाणे अहर्निश झिजविणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य पांडुरंगशास्त्री वैजनाथशास्त्री आठवले यांच्याविषयी आठवले कुळातील प्रत्येकालाच सार्थ अभिमान नि नितांत आदर वाटेल यात तिळमात्र शंका नाही. प. पू. पांडुरंगशास्त्रींनी स्वाध्याय परिवार उभा करून त्याद्वारे लक्षावधी बांधवांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या जीवनाला नवा अर्थ प्राप्त करून दिला. लक्षावधी स्वाध्यायींच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी, दुर्गुण, दुराचार, घातक व्यसने यांचा नायनाट केला आणि सदाचार संपन्न परिवार उभा केला. तत्त्वज्ञान विद्यापीठाची स्थापना करून प्राचीन गुरुकुल पद्धती आणि ऋषिमुनींच्या काळातील शिक्षण पद्धती पुनरुज्जीवित केली. तिला नवीन - आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाची जोड देऊन अभिजात स्वरूप दिलं. नवीन शैक्षणिक प्रयोग अंमलात आणले. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक प्रयोग करून नवीन परिवर्तन नि सुधारणा घडवून आणल्या. भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान, त्यातील विश्वकल्याणाचा अर्थ समजावून सांगत गीतेचा संदेश जगभर पोचविण्याचे महान कार्य केले. अनेक राष्ट्रीय नि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले. 

एक ऋषितुल्य जीवन जगून प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी अखिल मानवसमाजापुढे ज्ञानाचा - भक्तीचा - शक्तीचा - सेवेचा - श्रद्धेचा - समर्पण भावनेचा अभूतपूर्व सुंदर संगम साधून आपल्या कार्याद्वारे नवा आदर्श निर्माण केला. भक्ती ही प्रचंड सामाजिक शक्ती आहे हे जाणून त्यांनी भक्ती भावनेला कृतिभक्तीची जोड देऊन समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणलं. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांतीला त्यांनी भावनिक आणि आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक क्रांतीची जोड देऊन जणू ‘पंचरंगी क्रांती’ प्रत्यक्षात आणली. ते समाजाचे खर्‍या अर्थाने दीपस्तंभ बनले. प. पू. पांडुरंगशास्त्रींच्या अद्भुत जीवनावर ओझरता दृष्टिक्षेप टाकला तरी त्यातील तेजाने माणूस दिपून जाईल आणि त्या तेजाच्या अल्प अंश जरी त्याने आत्मसात केला, स्वत:च्या अंगी बाणवला तरी त्याचं अवघं जीवन उजळून जाईल, त्याच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल आणि स्वत:च्या जीवनाचं सार्थक झाल्याचं अभूतपूर्व समाधान त्याला प्राप्त होईल. त्यांच्या दिव्य जीवनाचं थोडक्यात दर्शन घडविण्याचा हा प्रयत्न आहे.

रायगड जिल्ह्यातील (पूर्वीचा कुलाबा जिल्हा) निसर्गसौंदर्याचं वरदान लाभलेल्या रोहे गावात पांडुरंगशास्त्रींचा दि. 19-10-1920ला जन्म झाला. रोहे गावातून वाहणारी पश्चिमवाहिनी कुंडलिका नदी जणू रोहे गावाची रखवालदारच. नदी ओलांडून गेल्यावर बाजारपेठ. तिच्या मागील बाजूस डोंगरांच्या रांगा. या डोंगरांच्या कुशीत, गर्द झाडीमध्ये वसलेलं रोहे गाव. ‘दहा वीर’ हे रोह्यातचं ग्रामदैवत. त्याचंच ‘धावीर’ हे अपभ्रष्ट रूप. धावीर देवीची नवरात्रात नऊ दिवस जत्रा भरते. धावीर देवीचा मंदिर परिसर माणसांनी या वेळी गजबजून जातो. दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी देवीची गावातून पालखी निघते. रोहे गाव हे कोकणातील एक प्रातिनिधिक गाव ठरेल. तीन - साडेतीन हजाराची वस्ती, मातीने बांधलेली घरं. त्यांना उतरती कौलारू छपरं. घरापुढे छोटंसं अंगण. गोमयानं सारवलेलं. घराला पडवी, ओटी वगैरे. बाजूला गोठे. त्यात हंबरणारी गुरे. रोहे गाव अन्य गावांप्रमाणेच पूर्वीपासून परंपरा जपणारं. सनातनी आचार विचारांचं श्रद्धेने पालन करणारं. परंपराप्रिय सनातनी वातावरणात आणि दशग्रंथी धर्मनिष्ठ आठवले घराण्यात पांडुरंगशास्त्रींचा जन्म झालेला. त्यामुळे लहानपणीच त्यांच्यावर हे संस्कार झालेले.

परंतु या पांडुरंगाची वृत्ती लहानपणापासूनच, विद्यार्थी दशेपासूनच अत्यंत चौकस. असंख्य प्रश्नांची ते घरी ज्येष्ठ मंडळींवर तर शाळेत शिक्षकांवर सतत सरबत्ती करीत असत. त्यांना भंडावून सोडत. अनेकदा त्यांच्या प्रश्नांनी शिक्षक नि घरची मंडळीसुद्धा निरुत्तर होत. पाच वर्षाचा पांडुरंग (सन 1925) पांढरे शुभ्र कपडे घालून शाळेत जाई, वर्गात पहिल्या बाकावर बसे, गौर कांती, निळसर डोळे, धाडशी वृत्ती, निर्भय पण निर्मळ मन लाभलेला हा पांडुरंग सर्वांमध्ये उठून दिसे. त्याला त्या वेळी मुलांनीच ‘झकास पांडुरंग’ ही उपाधी बहाल केली होती. शाळेत तो शिक्षक वर्गाप्रमाणे विद्यार्थीवर्गातही प्रिय होता. आपल्या अंगच्या अनेक उपजत गुणांमुळे तो सहकारी विद्यार्थीवर्गाच्या गळ्यातील ताईत बनला, त्यांचा नेता झाला.

पांडुरंगशास्त्रींवर लहानपणापासूनच राष्ट्रीय विचारांचे संस्कार होत होते. त्यांचे आजोबा लक्ष्मणराव तथा आण्णा मूळ टिळकपंथीय जहाल विचारांचे. पण पुढे गांधीजींचं अनुयायित्व पत्करलेले. खादीचे प्रचारक व पुरस्कर्ते. अत्यंत प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ, सुधारक विचारांचे. त्या काळात अस्पृश्य वस्तीत जाऊन तेथील मुलांवर चांगले संस्कार करणारे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रचार करणारे होते. लक्ष्मणराव स्वत: सूत कातून त्यावर कापड विणायचे. दोन - अडीच वर्षांचा असल्यापासूनच पांडुरंगाच्या अंगावर खादीचे कपडे चढले होते. ‘या खादीला सोडू नको’ हा त्यांचा संदेश पांडुरंगशास्त्रींनी आजन्म पाळला होता.

रोहे गावाजवळच असलेलं भुवनेश्वर मंदिर हे पांडुरंगशास्त्रींचं प्रेरणास्थान होतं. त्या शिवमंदिराच्या बाजूलाच अण्णांचे (लक्ष्मणरावांचे) आजोबा म्हणजेच पांडुरंगशास्त्रींचे खापरपणजोबा - ज्यांचे नाव पांडुरंगपंत होते. आणि ज्यांनी संन्यास घेतला होता. त्यांची समाधी होती. त्यांनी एक भविष्य कथन केलं होतं. ते त्यांच्या मुलांपाशी म्हणत ‘माझ्यापासून पाचव्या पिढीत एक सत्पुरुष जन्माला येणार आहे. त्याला काहीही कमी पडू देऊ नका.’ पांडुरंगपंतांची ही भविष्यवाणी पांडुरंगशास्त्रींच्या अवताराने खरी ठरणार याविषयी लक्ष्मणरावांना (अण्णांना) मनातून खात्री पटली आणि त्या दृष्टीने त्यांनी पांडुरंगावर लहानपणापासून विशेष लक्ष ठेवून त्यानुसार संस्कार घडविले.

पांडुरंगशास्त्रींवर लहानपणापासूनच जे संस्कार झाले ते त्यांच्या आजोबांकडून - अण्णांकडून - लक्ष्मणशास्त्रींकडून. त्यांचे आजोबा सरस्वतीचे महान उपासक होते. भारतातल्या प्राचीन ऋषिपरंपरेबद्दल आणि वेदवाङ्मयाबद्दल त्यांना अभिमान नि आदर होता. ती परंपरा - तो उज्ज्वल वारसा आपण जपला पाहिजे याची त्यांना तळमळ होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलाला (म्हणजे पांडुरंगशास्त्रींचे वडील वैजनाथशास्त्रींना वैदिक शिक्षण दिलं. न्याय - व्याकरण या शास्त्रात त्यांना पारंगत केलं. त्याचप्रमाणे स्वदेशाविषयीचा जाज्ज्वल्य अभिमानही त्यांच्या रोमरोमात भिनविला. हाच वारसा पांडुरंगशास्त्रींनी देखील पुढे चालवावा आणि समाजात संपूर्ण परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांची क्षमता सर्वार्थाने वाढावी म्हणून प्रयत्न केले. अर्थात् त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षेहूनही यश आलं. पांडुरंगशास्त्रींनी सार्‍या जगाला हेवा वाटावा असं भव्य कार्य उभं केलं. अखिल मानवजातीच्या - विश्वाच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी दाखविला. गीतेचा संदेश त्यांनी नव्याने सार्‍या जगभर पोहोचविला. गीतेतील उदात्त तत्त्वज्ञानाचं त्यांनी जगाला नव्याने दर्शन घडविलं. गीतेची महत्ता व थोरवी पटवून दिली. पांडुरंगशास्त्रींचे खापर पणजोबा - पांडुरंगपंत - यांनी आठवले घराण्यात शिवोपासना आणली. कीर्तनाची परंपराही तेव्हापासूनची. अत्यंत तत्त्वनिष्ठ जीवन आणि परोपकारी वृत्ती यांचा वारसा पांडुरंगशास्त्रींच्या आधीच्या पाच पिढ्यांपासून चालत आला होता. लिखित स्वरूपात नव्हे तर तोंडी दिलेला शब्द देखील पाळण्याची आणि त्यासाठी सर्वस्वही गमावण्याची पाळी आली तरी मागे न हटण्याची त्यांची वृत्ती होती. हेच संस्कार पांडुरंगशास्त्रींवर त्यांच्या आजोबांनी - आण्णांनी जाणीवपूर्वक केले होते. पांडुरंगशास्त्रींच्या खापर पणजोबांनी ‘ॐ नम: शिवाय’ हा शिवाचा अखंड जप करीत शिवमंदिरात समाधी घेतली होती. त्याच ठिकाणी त्यांचं दफन करून समाधी बांधली गेली. अपार तत्त्वनिष्ठा, भावभावना, दारिद्रय, आश्रित, संन्यास, समाधी असा त्यांचा जगावेगळा जीवन प्रवास झाला.

पांडुरंगशास्त्रींच्या आजोबांच्या म्हणजे लक्ष्मणरावांच्या (आण्णा) सांगण्यावरून नि आदेशानुसार पांडुरंगशास्त्रींच्या वडिलांनी म्हणजे वैजनाथशास्त्रींनी (तात्या) मुंबईत गिरगांव - माधवबाग येथे संस्कृत पाठशाळा सुरु केली आणि संस्कृतिप्रसाराचं कार्य आरंभलं. संस्कृत पाठशाळेबरोबरच कीर्तनांच्या माध्यमातूनही त्यांचं लोकशिक्षण चालू होतं.

पांडुरंगशास्त्रींच्या आजोबांनी त्यांचा अंतकाल जवळ आल्याची जाणीव झाल्यावर आपल्या नातवाला - पांडुरंगशास्त्रींना जवळ बोलावून आपलं उपदेशपर हितगुज व्यक्त केलं. ते म्हणाले, “पांडुरंगा, आठवले घराण्यानं आजवर प्रखर व्रतनिष्ठा जपली आहे. व्रतनिष्ठा म्हणजे एखादी गोष्ट करायची ठरविल्यानंतर त्यापासून ढळायचं नाही. तुलाही असंच व्रतनिष्ठ राहावं लागेल. तुला मी संस्कृत शिकवतो ते भिक्षुकी करण्यासाठी नाही हे लक्षात ठेव. संस्कृत वाङ्मयातील मौलिक विचारच सुसंस्कृत समाज घडवू शकेल. दुसर्‍यांना शिकवण्यासाठी, घडविण्यासाठी संस्कृत ज्ञानाचा वापर झाला पाहिजे. आठवले घराण्याला वर आणण्यासाठी तुला व्रत घ्यायचं नसून सार्‍या समाजाला वर आणण्यासाठी तू झगडलं पाहिजेस. आणखी एक गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगतो ती लक्षात ठेव. कुणाकडून उसनं घ्यायचं नाही. उधार मागायचं नाही. कर्ज काढायचं नाही आणि जामीन राहायचं नाही. अन्यथा अंगी तेजस्विता येत नाही. माझं हे सांगणं आयुष्यभर लक्षात ठेव.” पांडुरंगशास्त्रींनी आपल्या आजोबांचा हा उपदेश स्वत:च्या आयुष्यात तंतोतंत पाळला. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी समाजासाठी चंदनाप्रमाणे झिजवत सार्थकी लावलं.

पांडुरंगशास्त्रींच्या मनात त्यांच्या आजोबांचे शब्द त्यांच्या निधनानंतर वरचेवर घुमत - “पांडुरंगा, कुणाचेही उपकार घ्यायचे नाहीत हे लक्षात ठेव. तुला मी संस्कृत शिकवतो ते भिक्षुकी करण्यासाठी नव्हे ! पुढे मोठा झाल्यावर तुला संस्कृतिप्रसाराचं कार्य करायचं आहे. त्या परमेश्वरावर विश्वास ठेव. तो परमेश्वर तुला कधीही काहीही कमी पडू देणार नाही”.... आणि पांडुरंगशास्त्रींचं कार्य निष्ठापूर्वक खंड न पडता चालू राहिलं. त्यांनी वेदोक्त शास्त्रांचा सखोल अभ्यास केला. त्यावर भरपूर मनन-चिंतन केलं. कालबाह्य रूढी नष्ट करण्याचा तसंच नव्या रूढी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. उदा. कोळी बांधवादी  ब्राह्मणेतर लोकांच्या मुंजी लावल्या.

पांडुरंगशास्त्रींचं जन्म गाव रोहे. तेथील ‘सरस्वती संस्कृत पाठशाळे’त त्यांनी शिक्षण घेतलं. त्या शाळेत संस्कृतप्रमाणेच इंग्रजी देखील शिकविण्याची सोय होती. त्यानंतर त्यांचं वास्तव्य गिरगावात प्रथम नवलकर बिल्डिंगमध्ये तर नंतर भट वाडीत होते. माधव बागेत त्यांची नियमित प्रवचने होत. त्यांच्या वडिलांनी-वैजनाथशास्त्रींनी सुरु केलेल्या पाठशाळेची धुरा पुढे पांडुरंगशास्त्रींनी सांभाळली. कालांतराने ठाण्याजवळ तत्त्वज्ञान विद्यापाठीची निर्मिती करून त्यांनी आपला कार्याचा व्याप खूपच वाढविला.
पांडुरंगशास्त्री रोह्याच्या ज्या ‘सरस्वती संस्कृत पाठशाळे’त शिकले तेथे संस्कृत बरोबरच इंग्रजी शिकवलं जाई, भारतीय नि पाश्चात्य तत्त्वज्ञान शिकवलं जाई. बलोपासना-108 सूर्यनमस्कार नियमित घातले जात, स्वयंपाक करण्याचे नि स्वावलंबनाचे धडे दिले जात, स्वत:चे विचार मांडण्याची - वक्तृत्वाची कला शिकविली जाई. अशा प्रकारे अनेक विषयात विद्यार्थी तरबेज होऊन त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधला जाई. पांडुरंगशास्त्री तर या सर्व विषयांप्रमाणे पोहोण्यातही प्रवीण होते. या पाठशाळेतील विद्यार्थ्यांचा दिवस पहाटे 4॥ ला सुरु होई व रात्री 10 ला संपत असे. तेथे संपूर्ण दिवसभर विद्यार्थी वेगवेगळ्या कार्यक्रमात वेळापत्रकानुसार मग्न असत. सर्वांगीण शिक्षणाप्रमाणे शिस्त व स्वावलंबनाचे धडे विद्यार्थ्यांना मिळत.

पांडुरंगशास्त्रींचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं. रोह्याच्या पाठशाळेतील त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर वयाच्या 21व्या वर्षी ते मुंबईत आले. मुंबईच्या प्रसिद्ध रॉयल एशियाटिक सोसायटीच्या भव्य ग्रंथालयाचे आजीव सदस्यत्व त्यांनी मिळविले आणि जगातील सर्व श्रेष्ठ व समृद्ध वाङ्मय वाचून नि अभ्यासून चिंतनाद्वारे प्रगाढ विद्वत्ता प्राप्त केली. सर्व विचारधारांचा सूक्ष्म अभ्यास केला. जगातील सर्व वाङ्मयाचा नि विचारधारांचा, धर्म नि तत्त्वज्ञानांचा सखोल नि तौलनिक अभ्यास केल्यावर पांडुरंगशास्त्रींच्या कार्याची नि ध्येयमार्गाची दिशा स्पष्ट झाली आणि त्यांनी मनाशी दृढनिश्‍चय केला की ‘माझ्या माणसांच्या उत्कर्षासाठी, येथील समाजाच्या उत्कर्षासाठी मलाच ठामपणे उभं राहिलं पाहिजे. ते कार्य मी स्वत: करीन. त्यासाठीच माझा जन्म आहे. आजन्म मी त्याच कार्याला वाहून घेईन. समाजसेवा हा धर्म म्हणून मी पाळीन. आत्मविस्मृत समाजाला मी सन्मान प्राप्त करून देईन. आपल्या प्राचीनतम भव्य दिव्य वैदिक संस्कृतीवर आलेलं मळभ मी दूर करीन. वैदिक संस्कृतीचं मी पुनरुज्जीवन करीन. या ऊर्जस्वल संस्कृतीने दिलेलं विचारांचं सोनं उधळून मी नवा समाज उभा करीन. माझा बहाद्दुर कोळी सागरातील वादळवार्‍याशी यशस्वी झुंज देऊ शकतो तर संस्कृती रक्षणाच्या कार्यात तो नक्कीच झुंज देईल. परमेश्वरावर निष्ठा ठेवून वाटेल त्या प्रसंगाला सामोरा जाणारा धडाडीचा कार्यकर्ता - कार्यकर्त्यांची फौज मी उभी करीन. त्या द्वारे दु:खित, पीडित जनतेत मिसळून तेथील दैन्य - दारिद्रय - दु:ख मी दूर करीन. त्यांची अस्मिता जागी करीन. समाजाचं सारं चित्रच  मी बदलून टाकीन.’

पांडुरंगशास्त्रींच्या पुढील सर्व आयुष्याची वाटचाल मनाशी केलेला निश्चय प्रत्यक्षात उतरविण्याच्या दिशेनेच पद्धतशीरपणे झालेली दिसते. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी सौ. निर्मलाताई देखील सर्वस्व देत सातत्याने सहभागी होत्या. हे कार्य करीत असताना त्यांची देवावर - भगवंतावर - परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती. आपल्याला तेजस्वी व निस्पृह राहून कार्य करीत असताना यासाठी कुणाचाही आधार घ्यायचा नाही. फक्त भगवंताचाच आधार घ्यायचा. त्याच्याच प्रभावाने कार्यसिद्धी मिळेल यावर त्यांचा दृढ विश्वास होता.

पांडुरंगशास्त्रींनी लक्षावधी सदस्य कार्यकर्ते असलेला स्वाध्याय परिवार उभा केला. त्यांच्या मते वैदिकांची विचारधारा आणि ऋषींच्या परिश्रमांची परंपरा यामधून ‘स्वाध्याय’ची निर्मिती झाली आहे. ‘स्व’ला ओळखणं, ‘इच्छा’ आणि ‘अहं’चं निरीक्षण करणं आणि प्रभुसान्निध्याचं स्मरण करणं यात स्वाध्याय साधला जातो. गीतेचं आचरण करण्याची पद्धत तो स्वाध्याय. आपल्या वैदिक परंपरेने मानवाच्या उन्नतीसाठी ‘स्वाध्याय’चा मार्ग दाखविला आहे. स्वाध्यायचा मार्गच माणसाचा भौतिक आणि आध्यात्मिक उत्कर्ष घडवून आणील. स्वाध्याय परिवाराद्वारे पांडुरंगशास्त्रींनी अनेक उपक्रम - प्रयोग राबविले. कार्याचे डोंगर उभे केले. गभवद्गीता पाठशाळा, तत्त्वज्ञान विद्यापीठ यांची निर्मिती केली. पंचरंगी क्रांती, लोकनाथ अमृतालयम्, योगेश्वर भावकृषी, मत्स्यगंधा, त्रिकाल संध्या, सायंप्रार्थना, घरमंदिर, याज्ञवल्क्य उपवन, श्रीदर्शनम्, पतंजली चिकित्सालय, मानवप्रतिष्ठा केंद्र, गीतात्र्यह, भावफेरी - भक्तिफेरी असे अनेक अभिनव उपक्रम राबवून त्यांनी सारा समाज ढवळून काढला. त्यांच्या कार्याचा विस्तार भारताबाहेरही अनेक देशातून झाला. कारण त्यांच्या कार्याची व्याप्ती सर्व मानव समाजाचं कल्याण - विश्वकल्याण साधणारी होती, विश्वव्यापी होती.
पांडुरंगशास्त्रींना देशात जसे विविध सन्मान प्राप्त झाले तसे अनेक आंतरराष्ट्रीय - जागतिक कीर्तीचे सन्मानही मिळाले. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांतून प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून ते उपस्थित राहिले. त्यांचे जागतिक स्तरावर अनेक सन्मान झाले. जपान, जर्मनी, अरब राष्ट्रे, अमेरिका या देशातून व्याख्यानांप्रीत्यर्थ त्यांनाी दौरे केले.
 
इंदिरा प्रियदर्शिनी अ‍ॅवॉर्ड, लो. टिळक सन्मान पारितोषिक, राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, आनंदमयी पुरस्कार, रावसाहेब गोगटे पुरस्कार, लोकगौरव पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार, अनेक महापालिकांची सन्मानपत्रे, अनेक विद्यापीठांच्या डी. लिट. या सन्माननीय पदव्या, तसंच भारत सरकारचं 1999चं सर्वोच्च मानाचं ‘पद्मविभूषण’ अशा देशातील अनेक गौरव - पुरस्कारांनी पांडुरंगशास्त्री सन्मानित झाले.

प. पू. पांडुरंगशास्त्रींचं संपूर्ण आयुष्य अनेक अद्भुत प्रसंगांनी भरलेलं आणि कृतार्थ जीवनाचा आदर्श ठरावं असंच आहे. त्यांनी या नश्वर जगाचा दि. 25 ऑक्टोबर 2003 ला निरोप घेतला. एका ऋषितुल्य जीवनाची समाप्ती झाली. प. पू. पांडुरंगशास्त्री - सर्व स्वाध्यायींचे आदरणीय दादा आज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याने ते अमर झाले आहेत आणि जगाच्या - मानवजातीच्या अंतापर्यंत त्यांनी उभं केलेलं हे विश्वकल्याणकारी कार्य चालूच राहणार आहे.
(वरील परिचयात्मक लेख प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील राजेन्द्र खेर लिखित ‘देह झाला चंदनाचा’ या सत्याधिष्ठित कादंबरीवर आधारित आहे, याची कृपया नोंद घ्यावी. जिज्ञासूंनी तो मूळ कादंबरी ग्रंथ वाचावा.)
शब्दांकन : क्रांतिसेन आठवले

पू. पांडुरंगशास्त्रींना प्राप्त झालेले काही निवडक मानसन्मान आणि पुरस्कार
1954 	:	टोकियो (जपान) जवळ शिमिझू शहरात भरलेल्या द्वितीय विश्व धर्म आणि तत्त्वज्ञान परिषदेमध्ये प्रमुख वक्ता म्हणून गौरव.
1982 	:	15 व्या शतकातील तत्त्वज्ञ-संत निकोलस ऑफ कुसा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ट्रियर विद्यापीठातील समारंभात प्रमुख अतिथी म्हणून जर्मन सरकारचं सन्मानाचं निमंत्रण.
1986 	:	‘व्हिजन ऑफ गॉड’ या लॅटिन ग्रंथाचं जर्मन भाषेतील संस्करण पू. दादांना देऊन जागतिक सन्मान-सत्कार करण्यात आला.
1987 	:	‘वैजनाथ भावदर्शन ट्रस्ट’ तर्फे निर्माण करण्यात आलेल्या ‘वृक्षमंदिर’  प्रयोगासाठी ‘नॅशनल वेस्टलॅन्ड डेव्हलपमेन्ट बोर्ड’ नवी दिल्ली, तर्फे ‘इंदिरा प्रियदर्शिनी अ‍ॅवॉर्ड’.
1992 	:	मानवाच्या कल्याणार्थ करण्यात आलेल्या स्वार्थरहित, समर्पित कार्यासाठी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे देण्यात येणारं ‘लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक’.
1993 	:	धर्माधर्मांमध्ये सामंजस्य निर्माण करणं आणि धर्माकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टीकोन वाढवणं या कार्यासाठी दिवालीबेन मेहता ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारं पहिलं ‘इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड फॉर प्रोग्रेस इन रिलिजन.’
1996 	:	‘कम्युनिटी लीडरशिप’ साठी रेमन मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड फाऊन्डेशन तर्फे दिला जाणारा जगमान्य ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्कार.
1997 	:	प्रशंसनीय मानवतावादी कार्यासाठी फाय फाऊन्डेशनचा ‘राष्ट्रभूषण पुरस्कार.’
1998 	:	सौराष्ट्र विद्यापीठा तर्फे सन्माननीय ‘डी. लिट.’
1999 	:	बिर्ला अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट अ‍ॅन्ड कल्चरचं ‘जी. डी. बिर्ला इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड’.
1999 	:	भारत सरकारतर्फे दिलं जाणारं सर्वोच्च मानाचं ‘पद्मविभूषण’.
1999 	:	आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातील असामान्य कार्याबद्दल ‘लोकगौरव पुरस्कार.’
2000 	:	सरदार वल्लभाई पटेल विद्यापीठाची सन्माननीय डी. लिट.
2001 	:	थोर राज्यकर्ती अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार.
2001 	:	समाजकार्यातील भरीव कामगिरीसाठी ‘जायंट्स इंटरनॅशनल’ मुंबई तर्फे गौरव पुरस्कार.
2001 	:	एस्. आय. इ. एस्. वतीनं समाजसुधारक आणि विचारवंत म्हणून देण्यात येणारं ‘नॅशनल एमिनन्स् अ‍ॅवॉर्ड’ कांची कामकोटी पीठम्चे शंकराचार्य यांच्या शुभहस्ते प्रदान.
2001 	:	आ. दीदींना ‘लोकशिक्षक पुरस्कार’.
2002 	:	समाजाच्या आध्यात्मिक उत्थानासाठी कार्यरत असलेल्या ‘अखिल भारतीय कीर्तनकुल’ संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘समाजभूषण पुरस्कार’.

सौ. अनुराधा अरविंद आठवले


ऑल इंडिया गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा

जन्म: 1934
वंशावळ संदर्भ: गुहागर 1/7

मी सुधा चावरे, बारामती तालुक्यातील माळेगांव या पूर्वीच्या संस्थानातून माध्यमिक शालांत परीक्षा पास होऊन सेवाभावी असा हा नर्सिंग म्हणजे परिचर्या व्यवसाय स्वीकारुन 1955 साली पुण्यात आले. 1959 साली माझे परिचर्याचे शिक्षण पूर्ण झाले आणि व्यावसायिक सेवा सुरु केली. 1961 मध्ये श्री. अरविन्द आठवले या उमद्या तरुणाशी ओळख होऊन आमचा ऐतिहासिक प्रेमविवाह झाला, आठवले कुटुंब हे गुहागरचे पण पुण्यातच स्थायीक. 1963 मध्ये पुण्यातील शासकीय रुग्णालयांत म्हणजे ससून हॉस्पिटलमध्ये माझी स्टाफ नर्स म्हणून नेमणूक झाली.

त्यावेळी या रुग्णालयात कामाचा ताण आताच्या कितीतरी पटीने अधिक होता. अधिकारी उर्मटपणाने वागत. पगार बेताचाच आणि विवाहित स्त्रीने हा पेशा पत्करावा अशी स्थिती नव्हती. मला दोन मुली आणि एक मुलगा अशी अपत्ये झाली आणि मातृत्व सांभाळून ही नोकरी करणे कठीण झाले. त्यातून माझ्यामध्ये संघटनेचे बीज कै. उषाताई चौधरी यांनी पेरले, मी धडाडीने विचारपूर्वक कार्य केले आणि देशातील या परिचर्या व्यावसायिक चळवळीची मी ‘संस्थापक’ ठरली गेले आहे.

1968 ते 1975 या काळात हे कार्य फक्त पुण्यापुरते म्हणजे ससून पुरतेच मर्यादित होते. 1975 साली मी राज्यव्यापी संघटना स्थापन केली. सर्व जिल्ह्यातील सहकारी भगिनींनी सहकार्य चांगले दिले. 1988 साठी राष्ट्रीय पातळीवरही संघटना बांधण्यात महाराष्ट्राच्या वतीने आम्ही सिंहाचा वाटा उचलला. 1975 पासून सातत्याने 30 वर्षे महाराष्ट्राचे अध्यक्षपद आणि नेतृत्व माझ्याकडे होतेे. 1996 साली तिसर्‍या परिषदेत ऑल इंडिया गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे अध्यक्षपद माझ्याकडे आले ते आज म्हणजे 2005 मध्येही माझ्याकडेच आहे.

या काळात राज्यव्यापी कार्यात निरनिराळ्या ठिकाणी 13 द्वैवार्षिक परिषदा झाल्या आहेत. परिषद, चर्चा, निवेदने त्याच्या जोडीला धरणा मोर्चा, उपोषणे आणि वेळ पडली तर लाक्षणिक संपाद्वारे प्रयत्न करून परिचारिकांचे प्रश्‍न सोडविले आहेत. परिचारिकेला व्यवस्थापनात किंवा समाजात कोठेही अस्तित्वच नव्हते. तेथे शासन दरबारी परिचारिका चळवळ शासनावर एकजुटीचा दबाब ठेवून आहे. अधिकार्‍यांच्या विचारसरणीत बदल घडविणे हे कार्य चालू आहे. याच चळवळीद्वारे सोडविलेल्या काही ठळक मागण्या.

विरक्तीतून कुटुंबवत्सल हीच मोठी घटना घडली आणि त्यातून
1) कामाचे अमर्याद तास होते. किती तास काम करावे याला नियम हिशेब नव्हता. ते कामाचे आठवड्याचे 40 तास मर्यादित झाले.
2) कामाच्या पाळ्या चार तासाचे ब्रेक धरून दिले जात. त्याऐवजी सलग तीन पाळ्यात विभागून कामाचे तास नियमित झाले. साडेपाच दिवसाचा आठवडा मिळू लागला.
3) सार्वजनिक सुट्ट्या अगदी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी पण मिळत नव्हत्या. त्या सर्व सार्वजनिक सुट्ट्या, पर्यायी सुट्ट्या म्हणून मिळू लागल्या.
4) वेतन श्रेणी अगदी निकृष्ट दर्जाची होती. त्यात फार मोठ्या प्रयत्नानंतर चौथ्या वेतन आयोगात थोडा न्याय मिळाला. पण अद्यापि या व्यवसायाच्या कामाचे मूल्यमापन कोणीच केलेले नाही, ते करून घ्यायचे आहे.
5) रात्रपाळी सलग एक महिना असे. ती 15 दिवस, आठवडा, पाच दिवस, तीन दिवस करता आता आळीपाळीने एक दिवसाची चालू आहे. ही आमची सर्वात मोठी संघटित कमाई आहे.
6) किरकोळ रजा मिळू लागल्या आणि आता ऐरणीवर प्रश्‍न आहे, तो गणवेशाचा. पांढरा गणवेश हा ब्रिटिश अमदानीची साक्ष आहे. शिवाय त्यामुळे अनेक अडचणी या नव्या कुटुंबवत्सल परिचारिकेला येतात. म्हणून अंगभर वस्त्र असणारा सलवार कुर्ता बदामी रंगाचा आणि त्यावर पांढरा एप्रन यासाठी लढा चालू आहे. 80 % काम झाले असून लौकरच पूर्णपणे प्रश्‍न सुटेल. गणवेशाचे भारतीयीकरण होत आहे. आणि पांढर्‍या ऐवजी बदामी रंगाच्या गणवेशात रूपांतर होत आहे.
7) पूर्वी या व्यवसायात फक्त विधवा, परित्यक्ता अशा विरक्त महिला येत. आता कुटुंबवत्सल शिकलेल्या महिला आल्याने व्यवसायाचे स्वरुप पूर्णपणे बदलले आहे. हा व्यवसाय पूर्णपणे त्यागावर आधारित आहे. अजून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा हव्यात आणि आपले कर्तृत्व दाखवायला आणि वैशिष्टय (करीअर) करायला या क्षेत्रात खूप वाव आहे. होतकरु तरुण विद्यार्थिनींनी याकडे वळावे असा प्रयत्न संघटना करते. उच्च शिक्षणाची क्षेत्रे खुली आहेत. बी. एस.सी. नर्सिंग, एम. एस.सी. नर्सिंग हे अभ्यासक्रम आहेत. पालकांचे प्रबोधन गरजेचे आहे.

1992 साली वयाच्या 58व्या वर्षी शासकीय सेवा 28 वर्षे करुन मी निवृत्त झाले. ‘परिचर्या संशोधन आणि विकास संस्था’ 1994 साली स्थापन करुन आद्य परिचारिका प्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्यप्रणालीचे स्वतंत्र कार्य सरकारी मदतीशिवाय सुरु केले आहे. ही संस्था विश्‍वस्त व्यवस्थापन संस्था आहे. त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन चालू आहे. या द्वारे पाळणाघरात काम करणे, पाळणाघर चालविणे, बालसेवा, वृद्धसेवा यांचे प्राथमिक अभ्यासक्रम सुरु करणार आहोत, तूर्त जागेची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. देणग्या स्वीकारतो, 80 जी खाली आयकरात लाभ देणगीदारांना मिळतो. संस्थेचे अध्यक्षपद गेली 10 वर्षे मी सांभाळत आहे.

या संघटनेच्या कार्याचा लाभ जनतेला नक्कीच झाला आहे. तरी समाज धुरीणांचे लक्ष वेधावे लागेल. या व्यवसायाच्या शिक्षण, उच्च शिक्षण, सेवा, विकास आणि उत्कर्ष यासाठी खूप प्रयत्न करायला हवेत. या क्षेत्रात महिला स्वावलंबी होतात. या केलेल्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 3 मे 2004 रोजी वयाच्या एकाहत्तराव्या वर्षाच्या पदार्पणानिमित्त पुण्यात संघटनेतर्फे सन्मान चिन्ह देऊन माझा गौरव करण्यात आला. केलेले कार्य आणि त्याला मिळालेला प्रतिसाद यांचा विचार करता मी पूर्ण समाधानी आहे, आनंदी आहे.

परिचर्या व्यवसाय सर्वांना उपयोगी पडणारा आदर्श व्यवसाय असून वैद्यकीय व्यवसायाचा पूरक भाग असूनही सर्वत्र कमी दर्जाचा लेखला जातो आहे. त्याचे कारण शोधणे हाच संशोधनाचा विषय ठरतो आहे.

याशिवाय मी स्त्री मुक्ती आंदोलन, राज्य सरकारी कर्मचारी चळवळ, जन आंदोलने यात महिला कार्यकर्ती म्हणून पुढे होऊन कार्य करते. यशस्वी कौटुंबिक सल्ले पण दिले आहेत. परिचारिकांची कुटुंबे सावरली आहेत.

आठवले कुलवृत्तांन्ताला माझे हे कार्य भूषणास्पद ठरावे अशी अपेक्षा, संयोजकांना धन्यवाद !
सौ. अनुराधा अरविंद आठवले  (आत्मकथन)

Dr Nishigandh Arvind Athavale – Raigad Bhooshan Puraskar

Dr Nishigandh Arvind Athavale – Raigad Bhooshan Puraskar


डॉ निशिगंध अरविंद आठवले ह्यांनी  आयुर्वेद शाखेतील वैद्यकीय पदवी  घेतल्यानंतर फेलोशिप  इन पंचकर्म थेरपी व योग वेलनेस इंस्ट्रक्टर  यात प्राविण्य मिळविले. ते रायगड मेडिकल असोसिएशनचे निर्वाचित अध्यक्ष, आयुर्वेद व्यासपीठ रायगड जिल्हा पातळीवरचे कार्यवाह, मुरूड  मेडिकल असोसिएशनचे अलिबाग येथील मेंटॉर आहेत. 

ते एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते असून अलिबाग, रायगड परिसरात वैद्यकीय कार्य करीत आहेत. गेली अनेक वर्षे सामान्य जनांसाठी वैद्यकीय विषयांवर मोफत व्याख्याने देत असतात व रक्तदान शिबिरे भरवीत असतात.  

गेली २१-२२ वर्षे अलिबाग व बामणगाव येथे स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय चालवीत आहेत. ते चित्पावन आठवले फौंडेशनचे संचालक आहेत. 

त्यांना नुकताच 'रायगड गौरव भूषण हा पुरस्कार मिळाला. त्यांचे विशेष अभिनंदन. त्या पुरस्कार वितरणाचे हे क्षणचित्र.

कु. मृण्मयी किशोर आठवले

कु. मृण्मयी किशोर आठवले


अलिबागच्या कु. मृण्मयी किशोर आठवले हिने इयत्ता १० वीच्या  परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर CA व्हायचे ठरवले.  

त्याप्रमाणे 12 वी झाल्यानंतर प्रथम CPT ची परिक्षा दिली. त्यात पहिल्या प्रयत्नात यश आले. पुढे खूप मेहनत करून IPCC परिक्षा दिली पण तेथे पहिल्या प्रयत्नात अपयश आले. परंतु अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रचंड मेहनत करून ती उत्तीर्ण झाली. नंतर तीन वर्ष आर्टिकलशिप करून CA ची  फायनल ची परीक्षा दिली व उत्तम यश प्राप्त केले.  

आज तिच्या  कठोर परिश्रमाचे चीज होऊन ती CA झालेली आहे.विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत करून आपले करिअर घडवायचे असते हे तिने सिद्ध करून दाखविले. ती सध्या Grant Thornton ह्या आस्थापनेत नोकरी करत आहे.

चित्पावन आठवले फौंडेशनचे संचालक श्री विनायक विष्णू आठवले यांच्या हस्ते २२ फेब्रुवारी २०२२ ला नागाव येथे तिचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचे हे क्षणचित्र.

सौ. शैला मुकुंद यांच्या पुस्तकाचे प्रकाशन: १७ एप्रिल २२


आपल्या आठवले परिवाराच्या सदस्या सौ. शैला मुकुंद आठवले यांनी भारत गायन समाज, पुणे या संस्थेला एकशे दहा वर्ष पूर्ण झालेल्या निमित्ताने लिहिलेल्या - 'एक सुरेल स्वरयात्रा ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास' या पुस्तकाचे प्रकाशन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते १७ एप्रिल २०२२ रोजी झाले.

रामरक्षा पठण स्पर्धा – १० एप्रिल २०२२


रविवार दि . १० एप्रिल २०२२ रोजी रामनवमी होती. त्यानिमित्ताने  आठवले सांस्कृतिक मंचातर्फे रामरक्षा पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाच वयोगटातील चित्पावन आठवले कुटुंबातील २६ स्पर्धकांनी  रामरक्षेची ऑडियो क्लिप पाठवली होती. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ह. भ. प. चारुदत्त आफळे गुरुजी यांनी प्रत्येक गटातील तीन विजेत्यांची निवड केली. सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक दिले गेले व विजेत्यांना रोख बक्षीस देण्यात आले. ६ वर्षाखालील मुलांचे विशेष कौतुक करण्यात आले. हा उपक्रम स्पर्धा म्हणून नव्हे तर जास्तीत जास्त लोकांनी शुध्द रामरक्षा पठण करावे अशी ही इच्छा साध्य झाली. विजेत्यांची यादी सोबत दिली आहे.

बडोदा स्नेहसंमेलन


दिनांक 03.04.2022 रोजी वडोदरा येथे झालेल्या आठवले परिवार गुजरातच्या स्नेहसंमेलनाचा अहवाल

दिनांक 03.04.2022 रोजी, चित्पावन आठवले फाउंडेशनचा पहिला वर्धापनदिन आणि हिन्दू नव वर्ष “गुढ़ी पाडवा” आठवले परिवार गुजरातच्या वरिष्ठ सदस्य श्री विजय आठवले यांच्या अध्यक्षते खाली हॉटेल व्हाईट पोटेटो अकोटा वडोदरा येथे साजरा केला. बडोदा आणि आसपासच्या भागातील एकूब ३९ सदस्य उपस्थित होते.

श्री राजेंद्र आठवले ह्यांनी, उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमची सुरवात “वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ” ह्या श्लोकाने केली. श्री राजेंद्र आठवले ह्यांनी थोडक्यात आठवले कुलवृतांताविषयी, 2020 ला झालेल्या आठवले संमेलना विषयी सुतोवाच करून, 16 मार्च 2021 रोजी चित्तपावन आठवले फाउंडेशन ह्या संस्थेच्या स्थापने विषयी सगळ्यांना माहिती दिली.

त्या नंतर पुण्याहून चित्पावन आठवले फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री श्रीकांतजी नी गूगल मीटने उपस्थितांशी संवाद साधला. श्री श्रीकांतजी नी फाउंडेशनची उद्दीष्टे, आणि फाउंडेशन च्या आता पर्यंत झालेल्या कामाविषयी तसेच पुढील वाटचाली बद्दल थोडक्यात माहिती दिली. आठवले परिवार गुजरात कुटुंबातील सदस्यांनी लवकरात लवकर मेंबर व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी आठवले परिवार गुजरात वतीने डॉ सौ प्रतिभाताईचा आणि त्यांच्या कार्याचा औपचारिक परिचय सौ सीमंतीनी अतुल ह्यांनी केला. गुजरात आठवले परिवाराच्या वरिष्ठ सौ सुधाताई अशोक आणि सौ तनुजा राजेन्द्रच्या यांच्या हस्ते डौ सौ प्रतिभाताईचा यांचा पुष्पगुछ आणि मानचिन्ह म्हणून छोटी गुढी देऊन सत्कार करण्यात आला.

त्यानंतर सर्व उपस्थित आठवले मंडळींनी आपापला परिचय इतरांना करून दिला. त्यानंतर उपस्थित महिलाना चैत्री हळदी कुंकू दिले. श्री सुनील आठवले ह्यांनी उपस्थित आठवले मंडळींनी पुन्हा एकदा लवकरात लवकर मेंबर व्हावे असे आवाहन केले.

श्री राजेंद्र आठवले ह्यांनी आभार प्रदर्शन केले आणि श्रीमती सुलक्षणा गोविंद ह्यांनी पसायदान म्हटले आणि प्रीतिभोजनचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.

एकंदरीत जमलेल्या सगळ्यांना आजचा हा कार्यक्रम अतिशय आवडला आणि आपण पुढे असेच कार्यक्रम करत राहू अशी सर्वांनी ग्वाही दिली.

इनकॉर्पोरेशनचा पहिला वर्धापन दिन – २७ मार्च २०२२


आपली "चित्पावन आठवले फाउंडेशन" ही संस्था १६ मार्च २०२१ रोजी अस्तित्वात आली. १६ मार्च २०२२ ला संस्थेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आठवले पररवारातील सर्व सभासदांचे ठिकठिकाणी मेळावे घेऊन संस्थेच्या गेल्या वर्षातील कार्याचा आढावा घेणे व भविष्यातील योजनांची माहिती द्यावी असे ठरले व त्याप्रमाणे नागाव, बडोदा व नाशिक येथे मेळावे घेतले गेले. विडिओ खाली पाहावा.

रिपोर्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिक स्नेहसंमेलन


संस्थेचा प्रथम वर्धापन दिवस नाशिक येथे दि १९ मार्च २०२२ रोजी साजरा करण्यात आला. सात कुटुंबातील १३ व्यक्तीनी एकमेकांचे ओळख करून घेतली. त्या सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

सुरुवातीला, पुण्यातील श्री श्रीकांत गोपाळ यांनी गुगल मिट च्या माध्यमातून सर्वांचे स्वागत केले व संस्थेच्या उद्देशांची, कामाची व विविध योजनांची माहिती दिली.
 
त्यानंतर श्री श्रीनिवास गजानन यांनी सर्वांशी संवाद साधला व सर्वप्रथम संस्थेचे सभासद होण्यासाठी आग्रह केला. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

नागाव स्नेहसंमेलन


२२ फेब्रुवारी २०२२ रोजी नागाव आणि  अलिबाग येथील आठवले कुटुंबातील सदस्य तसंच चित्पावन आठवले फाऊंडेशनचे पुण्यातील संचालक श्री विनायक विष्णू यांनी नागाव खालची आळी इथल्या गणपती मंदिर  सभा मंडपात संवाद साधला. 

आठवले फाउंडेशनतर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमाबद्दल  त्यांनी सर्वाना माहिती दिली. यावेळी नागवकरांच्या वतीने श्री  रमेश प्रभाकर यांच्या हस्ते  श्री विनायक यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तसंच नुकतीच सीए ची उत्तीर्ण  झालेल्या कु मृण्मयी किशोर हिचा  सत्कार श्री विनायक यांच्या हस्ते  करण्यात आला. सर्व उपस्थित आठवले यांनी आपल्या फौंडेशनच्या कामाबद्दल  आणि एकंदर कार्यशैलीबद्दल खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. फौंडेशनच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवला जाईल याची सर्वानी ग्वाही दिली. 

या कार्यक्रमाला श्री रमेश प्रभाकर, श्री  श्रीविजय श्रीपाद, श्री विजय काशिनाथ, श्री श्रीकांत जयंत, श्री संतोष राम, डॉ मकरंद अरविंद, श्री संदेश शशिकांत, श्री पुष्कर प्रसाद, श्री किशोर परशुराम, श्री उदय जनार्दन, श्री अभय जनार्दन, श्री राजाराम विष्णू, श्री अनिरुद्ध विष्णू, श्री रोहन श्रीकांत, श्री अनिकेत सुहास, श्री मिलिंद चंद्रकांत, श्री अजित श्रीपाद, श्री प्रदीप राजाराम, डॉ. निशिगंध अरविंद, श्री विनायक विष्णू आणि महिला वर्गात भाग्यश्री  प्रसाद, मृणाल अजित, शिल्पा मंगेश, प्रीती प्रदीप, मृण्मयी किशोर, अलका श्रीविजय, , स्नेहा  किशोर आदी उपस्थित होते.