नारायण विष्णु आठवले


विशेष व्यक्तिमत्त्व
नारायण विष्णु आठवले हे आठवले कुळातील एक विशेष उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व. त्यांनी सन 1939 मध्ये वयाच्या 78व्या वर्षी लिहिलेल्या सुमारे 100 पृष्ठांच्या आत्मचरित्राच्या हस्तलिखिताची प्रत अत्यंत निष्ठापूर्वक नि काळजीपूर्वक त्यांचे नातू, श्री. श्रीपाद यशवंत आठवले यांनी आजोबांचा अमोल ठेवा म्हणून जपून ठेविली आहे. त्यावरून त्याची थोडक्यात माहिती पुढे दिली आहे.
कै. ना. वि. आठवले यांचे मूळ गाव रत्नागिरी जवळील सोमेश्वर असून तेथील महादेवाचे प्रसिद्ध स्थान हे मुख्य कुलदैवत आहे. तसंच याच आवारातील रवळनाथ व विठलादेवी या कुलदेवता आहेत. शिवाय जोगाईची देवीदेखील कुलदैवत असून नवरात्रात नऊ दिवस नंदादीप व माळ आणि उठता-बसता ब्राह्मण व सवाष्ण, एक वर्षाआड बोडण व कार्य झाल्यास गोंधळ व बोडण हे सर्व कुळधर्म त्यांच्या घरी पाळले जातात.

सोमेश्वरच्या लेखावरून पेशव्यांच्या व शाहू महाराजांच्या वेळी आठवले मंडळी त्यांच्या पदरी असावीत असे दिसते. भीमेच्या काठी वसलेला शेल-पिंपळगाव आम्हाला इनाम मिळालेला असून तेथील महादेवाचे देऊळ व घाट आमच्या पूर्वजांनी बांधलेला आहे. पुण्यातही टकल्याच्या हवेलीजवळ ताई आठवले यांचा वाडा प्रसिद्ध आहे. पेशवाई गेल्यानंतर पणजोबांपासून गरिबी आली असं ना. वि. यांनी लिहिलं आहे. त्यांचे लक्ष्मण सदाशिव तथा बगाजीपंत हे आजोबा. त्यांना तीन मुलगे व दोन मुली. (विष्णु, कृष्णा, सदाशिव व मथूबाई नि कुसाबाई) विष्णु हे ना. विं. चे वडील होत. आजोबांनी पौड येथे महालकरी कचेरीत 12 रुपयांवर सराफ कारकून म्हणून नोकरी करून 5 मुलांची कार्ये करून प्रपंच केला. नारायणरावांचा जन्म वाईजवळ इंग या खेडेगावात झाला. त्यांचे काका सदाशिव ग्वाल्हेरला असत. त्यांनी संन्यास घेतला होता. त्यांची पौड येथे विष्णूच्या देवळाजवळ समाधी होती. पुढे ती कालौघात नष्ट झाली. तेथेच एक छोटे घरही होते ते देखील पुढे एका लफंग्याने बळकावले.
वडील पुण्यात मामलेदार कचेरीत बारा रुपये पगारावर कारकुनाच्या नोकरीत तर काका म्युनिसिपालटीत कारकून होते. आजोबा असतानाच नारायणरावांच्या वडिलांचे मामा पांडोबा भट यांच्यामार्फत मराठे यांचे घर खरेदी केले. या भागास काळे वावर म्हणत. हा अगदी ओसाड भाग. दिवसा सुद्धा शुकशुकाट. पण शेजारीच सार्वजनिक काका (गणेश वासुदेव जोशी) व पलीकडे तात्यासाहेब रास्ते, वि. मो. भिडे यांची घरे होती. त्यामुळे थोडी जाग असे.

ना. वि. लिहितात - ‘‘वडील खडकाळ्यास अव्वल कारकून होते. खडकाळा हा तालुक्याचा गाव होता. पुढे वडिलांची बदली असिस्टंट कलेक्टरच्या ऑफीसात शिरस्तेदार म्हणून झाली. नाशिक जिल्हा नवा झाल्यावर वडिलांची पुण्याहून नाशिकला नेटीव अकौटंट म्हणून नेमणूक झाली. तेथे 7 वर्षे नोकरी झाल्यावर जामखेडे पेठा येथे महालकरी म्हणून नेमणूक झाली. त्यामुळे आम्ही सर्व नाशकास आलो. व काकांचा नि पुण्याचा आमचा संबंध सुटला. नाशकास आमची शिक्षणाची सुरवात झाली. तेथील शालेय शिक्षणक्रम म्हणजे सर्व उजळणी, तोंडचे हिशेब व मोडी आणि बाळबोध अक्षरे उत्तम. म्हणजे त्या वेळचा बी. ए. झाला. महिन्याची फी चार आणे व अवसेला फसकी म्हणजे पावशेर धान्य व एक पैसा. माझे धूळपाटीचे शिक्षण पुण्यात. नाशिकला मराठी चौथ्या यत्तेपर्यंत झाले. वडिलांची स्नान संध्या चार तासांची असे. रोज पहाटे गंगेवर स्नान करून पूजेकरिता पाणी व स्वत:ची धुतलेली धोतरे, सात वर्षे हा क्रम होता. ही स्नान संध्या मरेपर्यंत कायम होती. रोज पार्थिव पूजा, एकादशनी, गुरुचरित्र व देवपूजा हा सकाळचा कार्यक्रम व संध्याकाळी अहिल्याबाईच्या पटांगणावर ठरलेली सात-आठ मंडळी जमत व संध्या स्तोत्रे झाल्यावर गप्पा गोष्टी होऊन आठ वाजता घरी येत असत. सकाळी पूजा झाल्यावर सोवळ्याने काळा राम व गोरा राम यांचे दर्शन नित्य नेमाने घेऊन नंतर जेवून कचेरीला जात. हा दिनक्रम सात वर्षे सतत कायम होता. कीर्तन व पुराण श्रवणही होत असे. ते जेवण झाल्यावर एक वेळ तंबाखू खात. ती पेन्शन घेतल्यावर सोडली. आमची दोन वेळची शाळा असल्यामुळे आदितवारी त्यांची आमची पंगत होत असे. रोज सकाळी 10 वाजता शाळेतून आल्यावर मी गंगेवर स्नानास जाई. यथेच्छ पाण्यात डुंबून घरी आल्यावर जेवण होई. आई रोज कंटाळून जाई व स्वैपाक निवतो म्हणून ओरडत असे. माझा स्वभाव फार अचपळ. मारामारी करण्याची फार हौस. आम्ही घारपुर्‍यांच्या घरी राहात होतो. शेवटपर्यंत तेथेच होतो. त्यांच्या कुटुंबाचे माझ्यावर पुत्रवत प्रेम होते.
वडिलांची जायखेड्यास बदली झाल्यापासून उर्जित काळास सुरवात झाली. नाशकास कपालेश्वराजवळ घोलप स्वामी होते. त्यांचे दर्शन वडील रोज घेत. ते प्रवीण ज्योतिषी होते. वडिलांचे भविष्य त्यांनी वर्तवून एका पाकिटात बंद करून दिले होते. त्यात अमूक दिवशी नाशिक सोडून बढतीवर जाल असे लिहिले होते. बरोबर त्या दिवशीच नाशिक सोडले. वडील घरचा जमाखर्च आपल्या हातांनी लिहित असत. ती मरेपर्यंत त्यांनी लिहिलेली वही अद्याप संग्रही आहे. धाकटी बहीण द्वारका हिचे पुण्याचे वासुदेव विष्णु गोडबोले यांच्याशी लग्न झाले.

वडिलांची जायखेड्याहून कळवणास बदली झाली. पूर्वी जायखेडे व अभोणे हे दोन पेठे होते ते मोडून कळवण तालुका नवीन केला व त्याच तालुक्याला माझे वडील प्रथमच मामलेदारीच्या पदावर आरूढ झाले. मामलेदार कचेरीचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. त्याला नाशिकचे कलेक्टर आले होते. मोठी मिरवणूक निघाली. कलेक्टरने कचेरीचे दार उघडून राज्यारोहण समारंभ होतो त्याप्रमाणे साहेबाने वडिलांचा हात धरून गादीवर (मामलेदारपदाच्या) बसविले. त्या वेळी बंदुकीची फैर झडली. अत्तर गुलाब होऊन साहेब परत गेले. जुन्या काळी मामलेदार म्हणजे त्या तालुक्याचा राजा अशी प्रौढी असे. त्याच्या तैनातीला मशालजी व शिंगाड्या असे. माझे वडील कुलकर्ण करून मामलेदारीपर्यंत वाढले असल्यामुळे त्यांचे वागणे सर्वांशी मैत्रीच्या भावनेचे असे. मी मोठा अधिकारी व बाकी सर्व माझ्या हाताखालचे ही कल्पना त्यांना केव्हाही शिवली नाही. त्यामुळे खेळीमेळीने सर्वांचा काळ आनंदात जात असे.
कळवणहून पुढे वडिलांची खानदेशात धुळ्याजवळ शहादे येथे बदली झाली. तेथील मामलेदार विष्णु बापूजी सोमण वडिलांचे स्नेही होते. सारखेडे गावी वडील येताच केवढी सरबराई ! वडील गादीवर बसताच पाच-चार मंडळी पंख्याने वारा घालू लागली. हे वडिलांस न आवडून त्यांनी थांबविले. वार्‍याची आवश्यकता नाही म्हणून सांगितले. शहाद्यास मामलेदाराची राहण्याची जागा व कचेरी एकाच वाड्यात होती. सहा महिन्यांनी हिवतापाच्या साथीने सर्व मंडळी आजारी पडली. त्यामुळे तेथून जामनेरास वडिलांची बदली झाली. तेथे माझे मराठी सहाव्या यत्तेपर्यंत शिक्षण होऊन मी नाशकास परीक्षेस बसून पास झालो. वडिलांच्या धोरणाप्रमाणे माझे शिक्षण तेथेच संपले व त्याच कचेरीत बारनिशी कारकुनाच्या जागेवर माझी नेमणूक झाली. त्याच वेळी माझ्या लग्नाची खटपट होऊन सोमणांकडील मुलीबरोबर माझे लग्न झाले. लग्न सोहळा सावद्यास पार पडला. जामनेरास परत आलो. घरी लक्ष्मीपूजन झाले. पत्नीचे नाव रमा असे ठेवले. या वेळी लखीचंद शेठ याजकडून 15 रुपये तोळाप्रमाणे दोनशे तोळे सोने घेतल्याचे आठवते.
मी मामलेदाराचा मुलगा. जास्त शिकणे गरजेचे होते. इंग्रजी शिकल्याने दारू पितात, बाटतात ही वडिलांची समजूत. पण सोमणांनी माझ्या वडिलांची युक्तीने समजूत घातली व माझं पुढील शिक्षण सुरु झालं. नाशिकला इंग्रजी शिक्षण झालं. मला तालमीचा नाद. पोहण्यात पटाईत, घोड्यावरही रपेट करी. नाटकात काम केले. रामाची भूमिका केली. वडिलांचा धाक असल्यामुळे कोणतेही व्यसन लागले नाही.

विष्णुशास्त्री चिपळूणकर व लो. टिळकांनी पुण्यास न्यू इंग्लिश स्कूल काढल्याची वार्ता कळली तेव्हा मी माझ्या सहकारी मित्रांसह वडिलांची परवानगी काढून पुण्यास आलो. इतक्यात वडिलांची पंढरपुरास बदली झाल्याने तेही तेव्हा पुण्याला आले होते. त्यांनी अक्कलकोटच्या स्वामींची भेट घेतली. त्यांचा चमत्काराचा अनुभव घेतला.
पांडुआण्णा भट हे वडिलांचे सख्खे मामा. ते पुण्यात एक खोली घेऊन राहात. स्वत: स्वैपाक करून जेवत. हे भट पेशव्यांचे नातेवाईक. त्यांचं जीवन म्हणजे जणू कादंबरीच. ज्यांचा पाय कधी जमिनीस लागत नसे ते शेवटी आमच्या आश्रयाला येऊन राहिले व त्यांचे चिरंजीव माधुकरी मागून राहू लागले असा काळ महिमा !

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मी पाचव्या यत्तेत बसलो. विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठीचे भाषांतर शिकवीत. वॉरन् हेस्टिंग हे पुस्तक होते. एका तासात एक वाक्य देखील पुरे होत नसे. सर्व टीका ब्रिटिश राजकारणावर चाले. गणित टिळक शिकवीत. त्यात जॉमेट्रीच्या आकृती कागदाच्या कापून फळ्यावर धरून शिकविण्याने ताबडतोब समजूत पडे. नामजोशी इंग्रजी व आगरकर इतिहास आणि नंदुर्गीकर संस्कृत असा विद्वानांचा संच असल्यामुळे आम्ही आपणास भाग्यवान समजत होतो. पहिल्याच दिवशी तीनशे मुले शाळेत आली ती केवळ शास्त्रीबुवा व टिळक यांच्या बाणेदार वृत्तीस पाहून आली. इंग्रजी अभ्यासाचा ताण पडल्याने संस्कृत कच्चे राहिले व पहिल्या वर्षी मॅट्रिकला नापास झालो. पुढे भावेस्कुलात जाऊन परीक्षा पास झालो. जो मी 19 वर्षांचा होईतो इंग्रजीचा गंध नव्हता तो मी परीक्षा पास झाल्यावर मला परमानंद झाला. माझी इच्छा डॉक्टर होण्याची होती पण घर सोडून बाहेर जावयाचे नाही व प्रेते फाडण्याचे शिक्षण नको या अटींमुळे सायन्स कॉलेजात गेलो.

वहिनी (सावत्र आई), कुसाआत्या व मथुआत्या वडील पेन्शन घेऊन पुण्यास आल्यावर वारल्या. मी घोड्यावर बसण्यात पटाईत. वयाच्या ऐशीव्या वर्षी सुद्धा घोड्यावर बसून रपेट करावीशी वाटे. वडिलांची पंढरपुरात तीन वर्षे मामलेदारी झाल्यावर त्यांची जळगावास खानदेशात बदली झाली. त्यांची जळगावची नोकरी शेवटची. तिथेच पेन्शन घेतले. एक वर्ष पाचोर्‍यास बदली व पुन्हा जळगाव. पेन्शन घेतल्यावर तीन वर्षे पुण्यात मावळचा व्यापार केला. उरशास जमीन खरेदी. व्यापारात खोट आली. फसवणूक झाली.

माझ्यावर सख्ख्या आईपेक्षा सावत्र आईचे प्रेम जास्त. सख्ख्या आईचा ओढा धाकट्या मुलीकडे असे.
वडील रामेश्वरास दक्षिण यात्रा करून आले. नंतर काशीयात्राही केली. काशीसच त्यांचे देहावसान झाले.
वडिलांचा मला उपदेश होता की ‘‘चोरी, चहाडी व छिनालकी यापासून अलिप्त राहून शक्य तितका परोपकार करून वाड-वडिलांच्या चालीरीतीने राहिलात तर जगदंबा तुम्हास काही कमी पडू देणार नाही.’’

त्रिस्थळी, अयोध्या इत्यादी यात्रा पूर्ण करून वडील पुन्हा सहस्त्रभोजन घालण्याच्या निमित्ताने काशीस आले. यात्रेत वेळच्या वेळी जेवण नाही. श्राद्धाकरिता रोज जेवणास चार वाजायचे. कर्मठ असल्यामुळे सर्व विधी उपाशीपोटी झाला पाहिजे. या सर्व कारणांमुळे काशीस आल्यावर दुसर्‍या दिवशी त्यांना कॉलरा झाला. त्यात हट्टी स्वभाव असल्यामुळे अनायासे काशीस मरण येत आहे त्याच आनंदात स्वारी असल्यामुळे गंगोदकाशिवाय काही घेतले नाही. काशीस सुखरूप आल्याबद्दलचे पत्र मला मिळाल्यावर मी त्यांच्या लिहिण्याप्रमाणे तीनशे रुपयांची हुंडी पाठविली. काशीस मुक्काम नाना फडणीस यांच्या वाड्यात होता. अंतकाळच्या दिवशीच दुपारी माझी हुंडी मिळाली. रात्री नऊ वाजता मंत्रजागर संपल्याबरोबर वडिलांनी आनंदात देह ठेवला. तीन मुलगे असून शेवटी त्यांना मंत्राग्नी बाळा ब्राह्मण बरोबर होता त्याच्या हातून झाला. याला म्हणावे योगायोग !

वडील साठाव्याच वर्षी गेले. आजपर्यंत मी एखाद्या राजपुत्रासारखा वागलो. हातात सलकडी, कानात चारशे रु.ची मोत्याची भिकबाळी, गळ्यात अठरा तोळ्यांचा गोफ व नेसण्यास व पांघरण्यास रेशीकाठी धोतरे. मला कॉलेजमध्ये स्नेही मामलेदार म्हणत असत. असा चंडोलाप्रमाणे वागलो. दिवसामागे रात्र इतक्या लौकर येईल ही कल्पनाच नाही. वडिलांचा स्वभाव इतकी मानी होता की त्यांनी आजन्मात आपला फोटो काढू दिला नाही. त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या रूपास मी अजिबात मुकलो. या अवाढव्य जगात कुटुंबातील आई, दोन भाऊ, धाकटी दहा वर्षांची बहीण विठाबाई, माझी व विनायकाची बायको इतक्या सर्व मंडळींचे प्रापंचिक ओझे माझ्या डोक्यावर आले. गृहस्थिती पार बिघडली. सात-आठ वर्षे फार त्रासाची गेली. वडिलांच्या पश्चात दोन वर्षात सर्व वाताहात झाली. घराच्या इस्टेटीच्या वाटण्या झाल्या. आम्ही नवरा बायको व दोन मुले एकत्र राहिलो. वडील म्हणून देव आमच्याकडे आले. आई, विनायक व बायको, हरी, विठाबाई एकत्र राहिली. त्यांचे कारभारी द्वारकाबाई, आमची बहीण. तेव्हापासून आमच्याशी भाषण वर्ज्य.

मी भाव्यांच्या शाळेत नोकरी धरली. दोन तास गणित शिकवण्याचे पत्करले. मी, गोपाळराव देशपांडे व विष्णुपंत गोखले तिघे जीवश्चकंठश्च स्नेही म्हणून शेवटपर्यंत राहिलो. आम्ही वकिलीचा अभ्यास सुरु केला. तिघांनी एकत्र व्यापार केला.
मी पुढे न्यू स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी धरली. इंग्रजी दुसर्‍या यत्तेवर नेमणूक झाली. पगार रु. 28. पुढे 40 रु. झाला. चौथ्या यत्तेच्या आठ डिव्हिजन्स होत्या. ए, ऋ, ॠ, क या चार वर्गांना गणित शिकवण्यावर माझी नेमणूक झाली. वर्षाला बोनसही मिळू लागला. घरी दोन मुले, बायको व मी आनंदात दिवस काढीत होतो.

पुढे शिक्षकाची नोकरी सांभाळून वासुदेव बापूजी कानिटकर उर्फ दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनिअरिंगचे ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव मिळाला. फर्ग्युसन कॉलेजच्या बांधकामावर ओव्हरसियर म्हणून माझी नेमणूक झाली. आयुष्याचा नवा अंक सुरु झाला. गणपतराव घोटवडेकरांचे उपकार होते.

फर्ग्युसनचे काम संपल्यावर सोलापूर म्युनिसिपालटीत ओव्हरसियरची नोकरी पत्करली.
फर्ग्युसनचे प्रिन्सिपॉल आगरकर होते. त्यांच्यासारखा सरळ, स्वभावाने गरीब, आनंदी व विद्वान असा मनुष्य मला माझ्या आयुष्यात भेटला नाही. त्यांचा बंगला तयार झाल्यावर ते तेथे राहावयास आले. त्यांचे कुटुंबही स्वभावाने फार थोर. यजमान कट्टे सुधारक होते तरी बाई पूजा, देवधर्म करीत असे. त्यांच्या आड यजमान आले नाहीत.
फर्ग्युसन कॉलेजच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. पुण्यात टिळक-आगरकरांनी काढलेले हे पहिले कॉलेज. हे गरीबांचं कॉलेज. डेक्कन कॉलेजात श्रीमंत वर्ग असे. उद्घाटन समारंभात मला शंभर रुपयांचं इनाम मिळालं.
फर्ग्युसनचे काम संपल्यावर सोलापूर म्युनिसिपालटीत ओव्हरसियरची नोकरी पत्करली.
सोलापूरला चक्रदेवांचा फार आधार होता. तेथे रिपन हॉलचे काम पार पाडले. म्युनिसिपल बागेत माझ्या देखरेखीखाली काम झाले. लोधीपुर्‍यात रिर्झरवॉयरचे काम पार पाडले.
सोलापूरहून माझी जत येथे बदली झाली. दरम्यान मुंबई व सोलापूरलाही प्लेगची साथ सुरु झाली होती. त्यापासून मी सुदैवाने बचावलो. तीन सडका व जतच्या मल्याळ तळ्याचे दुष्काळी काम सुरु केले. तेथे जॅक्सन साहेब होता. पुढे त्याची नाशिकला कलेक्टर म्हणून नेमणूक झाली.
संस्थानाच्या तपासणीकरिता साहेब, महाराज लोक येत ते शिकारीत वेळ घालवीत. हजारो रुपये खर्च होत. त्यांची सरबराई करावी लागे.
जतहून माझी सांगलीस बदली झाली. तेथून पुन्हा जतला आलो. पुण्यास आई प्लेगने वारली. धाकटा भाऊ हरीसुद्धा प्लेगने गेला. द्वारकी व तिच्या घरची चार माणसेही प्लेगने वारली.
मुंबईस आल्यावर लिमयांकडे उतरत असे. (सन 1898 पासून 1940 पर्यंत.) शेवटपर्यंत परकेपणा वाटला नाही. मी पुण्याचा. मुलीच्या लग्नाकरिता जतहून कोकणात (दाभोळ) जाऊन आलो.
सांगलीतील माझे नोकरीचे दिवस आनंदात गेले. घोडीवाले पुणेकर आठवले म्हणून मी तेथे ओळखला जाई. थोरला मुलगा बापू प्लेगने गेला.
मिरज मळ्यात ओव्हरसिअर म्हणून काम केले. पुन्हा जतला बदली झाली.
अक्कलकोटला माझी बदली आकसाने करून माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी नोकरीचा राजीनामा देऊन पुण्यास परत आलो.
मुंबईत सप्रे यांच्या भागीदारीत रेल्वे व झ. थ. ऊ. ची काही कामे केली. ठाण्यास राहिलो. पार्शिकचे स्टेशन, मुंब्रा, घाटकोपर, डोंबिवलीचेही साइडिंगची कामे केली.
नांदूर मधमेश्वर येथे कीर्तने यांच्या सल्ल्याने किरकोळ कामे केली.
एक विशेष प्रसंग : आमच्या घराची झडती - निफाडजवळ कोठुरे येथील बर्वे हे माझे साडू असल्यामुळे व करंज गावच्या वाटेवर असल्यामुळे माझे तेथे वारंवार येणे-जाणे असे. त्या बर्व्यांचे सावरकर हे सख्खे मामा. सावरकरांनी तेलगू भाषेत छापलेली पुस्तके इंग्लंडहून टपालमार्गे बर्व्यांकडे धाडली व बर्व्यांनी ती जिकडे-तिकडे रवाना केली. ती राजद्रोहाची पुस्तके असल्यामुळे बर्वे यास अटक झाली व पत्त्यावर लिहिलेले अक्षर त्यांचेच असल्याचा पुरावा मिळावा म्हणून त्यांचे नातेवाईक एक मी व ठाण्याच्या कलेक्टरचे चिटणीस आप्पा म्हसकर (हे बर्व्यांचे मेव्हणे) त्यांच्याशी पत्रव्यवहार सापडावा म्हणून आदल्या दिवशी म्हसकरांची ठाण्यास व दुसर्‍या दिवशी आमची ओझरास घराची झडती झाली. त्या दिवशी वडिलांचे श्राद्ध होते, त्या तयारीत मी होतो. या सर्वांचा माझ्या मनावर एवढा परिणाम झाला की एका दिवसात माझे केस पांढरे झाले व वजन 15 पौंडानी कमी झाले. माझे नाव ब्लॅक लिस्टमध्ये पडले व गुप्त पोलिसांचा ससेमिरा दोन-तीन वर्षे मागे राहिला.
ओढ्याचे चुन्याचे काम केले. त्यात नुकसान सोसावे लागले. हर्द्याचे रेल्वेचे काम (खांडवा इटारसी रेल्वे) गंजाळ येथे केले.
पुढे पुण्यास राहूनच स्वतंत्र कामे करण्याचे ठरविले. मी ज्योतिषाचाही अभ्यास केला. सुमारे 2 हजार कुंडल्या जमवल्या. ज्योतिष पुस्तके, कुंडली विज्ञान यांचा अभ्यास केला. नाना प्रकारच्या कुंडल्यांची वर्गवारी करून त्यावर उेाोप षरलीेीं आडाखे बांधले. ते अचूक येऊ लागले. अभ्यासाची चटक लागली. तोंड पाहून कुंडली मांडण्याचा अभ्यास केला. त्यात यश आले.
पुण्यात स्वतंत्रपणे कंत्राटाची कामे घेऊ लागलो. यासाठी कामाची माहिती, मनुष्यबळ आणि द्रव्य या गोष्टी आवश्यक आहेत. सेवासदनचे मी सतरा वर्षे काम केले. तेथील सर्व इमारती माझ्याच देखरेखीखाली झाल्या आहेत. विठ्ठलदास ठाकरसीचे येरवड्याच्या तारकेश्वरी टेकडीवरील ‘पर्णकुटी’ या भव्य बंगल्याचे बांधकाम पार पाडले. मोठाच कॉम्प्लेक्स होता. वास्तुशांत समारंभ धुमधडाक्यात झाला. शेटजींनी आपल्या गळ्यातील सात तोळ्याची कंठी माझ्या गळ्यात घातली व एक उंची शालजोडी माझ्या अंगावर घातली.
इंडियन वुइमेन्स युनिव्हर्सिटी बिल्डिंग व रेसिडेन्सीचे काम केले. शेटने मुंबईहून पाटी तयार करवून आणली व हॉलमध्ये लावली. त्यात आगाशे इंजिनियर व मी कंत्राटदार म्हणून उल्लेख आहे.
आळंदी येथील श्रीज्ञानेश्वराच्या देऊळवाड्यातील विविध कामे (बिनखांबी मंडप) करून प्रेक्षणीय बनविला.
आण्णासाहेब पटवर्धन यांच्या समाधीचे काम ओंकारेश्वरास स्मशानभूमीच्या पूर्वेस पूर्ण केले.
त्रिंबकेश्वराच्या कोठीचे काम सेवा म्हणून पूर्ण केले. मला एक शालजोडी व अंगठी भेट मिळाली.
पुण्यात स्वत:च्या चार इमारती यशवंत धाम, भाव्याच्या शाळेसमोर, विद्याविलास नारायणाश्रम, विष्णुभुवन या तीन इमारती टिळकरोडवर. पैकी तीन इमारती विकल्या. फक्त विष्णुभुवन व नव्या विष्णूजवळील आम्ही रहात असलेली इमारत या दोहोंच्या भाड्यावर आमचा चरितार्थ चालू आहे.
राहत्या घरात दत्ताचे स्थान आहे. मूळचे हे घर तात्या टोपीचे. ते त्यांना मराठे यास दिले. मराठे हे वडिलांच्या मामाचे स्नेही. आजोबांना पुण्यास घर असण्याची आवश्यकता वाटली म्हणून मामांनी मराठ्यांकडून साडेचारशे रुपयास हे जुने घर घेऊन दिले. या आळीचे जुने नाव काळे वावर. आमच्या शेजारी ग. वा. उर्फ काका जोशी, पश्चिमेस वि. मो. भिडे व पलीकडे तात्यासाहेब रास्ते अशी मंडळी. पूर्वेस भिंतीत औदुंबराचा वृक्ष होता. तेथे वडिलांनी गुरुचरित्राची अनेक पारायणे केली. पण औदुंबरास प्रदक्षिणा घालण्यास वाव नव्हता. त्याखाली दत्ताच्या पादुका ठेवल्या. मारुतीची स्थापना उत्तराभिमुख केली.
‘‘उत्तराभिमुख मारुति जेथे। सर्वदा विजय मंगल तेथे।
जानकीसहित राघव येथे। नांदतो म्हणुनी सद्गती देते।
- मध्वमुनीश्वर
-हां आम्हास अलभ्य लाभ. या मारुतीबद्दल मला विशेष पूज्य भाव आहे. ही सर्व माझ्या वडिलांची पुण्याई.
सध्याचे ब्राह्मणत्व व सोवळे ओवळे याचा नायनाट झाल्यामुळे मला मुठीत नाक धरून कालक्रमणा करावी लागते. मर्जी ईश्वराची! कुटुंब मेल्याचा मला आनंद आहे. सध्याची राहणी तिला सहन झाली नसती. तिने कधी जोडा, छत्री वापरली नाही, माझ्या शेजारी टांग्यात बसली नाही. घराबाहेर डोक्यावर पदर घेतल्याशिवाय पडली नाही. अशी जुन्या पद्धतीची वडिलांच्या वेळची वागणूक असल्यामुळे या काळात जिवंत राहणे तिला फार कष्टाचे झाले असते. विशेष आश्चर्य की वडिलांचे व आईचे भाषण मी कधी ऐकले नाही. सर्व कारभार मुलांमार्फत चालावयाचा. आत्ताच्या बायका नवर्‍याच्या मांडीशी मांडी लावून खिदळत असतात. कालमहिमा आहे. कालाय तस्मै नम: म्हणून स्वस्थ असावे व आपले कर्तव्य परमेश्वर स्मरून करीत असावे व समाधान ठेवावे हाच मनाच्या शांततेचा मार्ग आहे.

*****
पुण्यातील आणखी इमारतींची कामे :-
1) श्री जगन्नाथ महाराजांच्या दोन चाळी, 2) साखरे बुवांचा मठ, 3) गोपुकाका रानडे यांच्या बंगल्यावरील चाळी, 4) नानासाहेब भागवत यांचे दत्तमंदिर, राहते घर व चाळ 5) गणपतराव वझे यांचे घर 6) परांजपे नारायण पेठ, 7) देशमुखवाडीत खळदकर यांचे घर, 8) देशमुखवाडीत पिलूताईचे घर, 9) हरिभाऊ रानडे यांचा पुढचा सोपा, 10) अंजनगावकर यांचे घर, 11) बापूसाहेब गोडबोले यांचे घर, 12) हरिभाऊ भट यांचे मोदीच्या गणपतीच्या मागचे घर, 13) सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटीची कामे, 14) सेवासदन पश्चिमेची तीन मजली इमारत, 15) अभ्यंकर शास्त्री यांचे घर लक्ष्मी रोड, 16) भट गुरु यांचे घर, 17) मोतीवाल्याची इमारत फुटक्या बुरुजाजवळ, 18) गोखले नारायण पेठ, 19) सुंदराबाईचे घर रास्ता पेठ, 20) के. ई. एम. हॉस्पिटल, 21) सदरची रेसिडन्सी, 22) गाणगापूर धर्मशाळा संगमावर, 23) मुरुडकरबुवांचे घर नारायण पेठ, 24) गोपाळ गायन समाज टिळक रोड, 25) ग. वि. केतकर यांचे घर टिळक रोड इत्यादी.
वृद्धांनी आरोग्य कसे राखावे :-
या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या निघाल्या. यात केसरीतील पंधरा लेख आहेत. विश्राम मंडळात व्यायाम वर्ग घेतले. वयाच्या 15व्या वर्षापासून तालमीचा नाद. मल्लखांब करण्यात पटाईत. आसने, व्यायाम यात रस. प्रचार केला. यात मनाचे समाधान हा स्वार्थ व परक्याचे आरोग्य हा परमार्थ. तात्यासाहेब करंदीकरांचे प्रोत्साहन. केसरीत 16 लेख लिहिले. तात्यासाहेब केळकरांची प्रस्तावना. अनुकूल अभिप्राय लिहिला. 1938 साली व्यायाम वर्ग सुरु केला. पण दुर्दैवाने तो फार काळ टिकला नाही. लोकांचा प्रतिसाद कमी होत गेला.

प्रत्यक्ष दर्शन झालेले संत :-
1) भटजी बापू दक्षिण हैदराबादचे, 2) केडगावचे महाराज दत्तभक्त, 3) दाजीमहाराज टाकळीकर, 4) शेगावचे गजानन महाराज, 5) शिरडीचे साईबाबा, 6) साकुरीचे सीताराम महाराज - हे साईबाबांचे शिष्य, 7) मंगळवेढ्याचे सीताराम महाराज, 8) सावंतवाडी संस्थानातील मिटक्याची वाडी येथील नारायण बाबाजी महाडेश्वर, 9) छोटे साईबाबा - बोवाजी, 10) पाटगावचे बाळकृष्णदादा, 11) आळंदीचे श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज, 12) टाकळीचे श्री दाजीमहाराज टाकळीकर, 13) पंढरपूरचे सिद्धेश्वर महाराज, 14) औरंगाबादजवळचे बनेमिया, 15) पंढरपुरचे तपकीर महाराज, 16) गाडगे महाराज, 17) मेहेरबाबा बाबाजान, 18) देव मामलेदार - सटाणा येथील संत.
अष्टविनायक, बारा ज्योर्तिलिंगे देवस्थानांचे दर्शन अनेकदा घेतले. त्यामुळे मानसिक समाधान लाभले.
शब्दांकन : क्रांतिसेन आठवले

रामचंद्र महादेव आठवले


तत्त्वनिष्ठलेखक, वक्ते, इतिहाससंशोधक आणि ज्वलंत हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते
जीवनकाल 1901 ते 1988
नाचणे 6

दिनांक 1 नोव्हेंबर 1901ला जन्मलेल्या आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या एका अत्यंत तत्त्वनिष्ठ प्रखर आयुष्य जगलेल्या रामचंद्र महादेव आठवले यांचे दिनांक 31 डिसेंबर 1988ला वयाच्या 88व्या वर्षी देहावसान झाले. त्यांच्या निधनाने जणू एक वृक्षच उन्मळून पडला ! ‘मोडेन पण वाकणार नाही’ हे लोकमान्य टिळकांचं ब्रीद आमरण आचरणात आणणारा अखेर परिस्थितीपुढे न वाकता वयाच्या 88व्या वर्षी ताठ मानेने मृत्यूला सामोरा गेला ! अनेक संकटे कोसळली तरी शेवटपर्यंत उराशी बाळगलेल्या तत्त्वांशी तडजोड न स्वीकारणारा खरा तत्त्वनिष्ठ या जगाचा निरोप घेता झाला ! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्ववादी राजकीय तत्त्वज्ञानाचा निष्ठावंत प्रचारक या जगातून कायमचा निघून गेला ! हिंदुहितासाठी झगडणारं आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तळमळणारं एक परखड व जहाल व्यक्तिमत्त्व आपल्यातून नाहीसं झालं ! जुन्या पिढीतील ज्येष्ठ साहित्यिक, पल्लेदार विद्वान, तत्त्वनिष्ठ इतिहास संशोधक, पत्रकार, प्रभावी वक्ते म्हणून सार्‍या महाराष्ट्रात विख्यात असलेले रामचंद्र महादेव आठवले यांचं वयाच्या 88व्या वर्षी दि. 31 डिसेंबर 1988ला अंधेरीतील (मुंबई) त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकालीन अल्प आजाराने निधन झालं. रा. म. आठवले यांचे व्यक्तिमत्त्व विविध पैलूंनी युक्त असलं तरी कट्टर राष्ट्रवाद - हिंदुराष्ट्रवाद हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव होता यात शंका नाही.

रामचंद्र  महादेव आठवले हे साहित्यिक वर्तुळात ‘रामभाऊ’ या नावाने ओळखले जात तर नातेवाईक व कुटुंबीय मंडळी त्यांना ‘बाबूराव’ या नावाने संबोधीत. आपण ह्या परिचयलेखात त्यांचा उल्लेख ‘रा. म.’ असा करू.
रा. म. यांचा जन्म दि. 1 नोव्हेंबर 1901ला मुंबईत फणसवाडी येथे झाला असला तरी त्यांचं शालेय शिक्षण रत्नागिरीच्या शासकीय प्रशालेत झालं तर महाविद्यालयीन शिक्षण मात्र मुंबईत झालं. शालेय जीवनापासूनच त्यांना लेखनाची व कविता करण्याची गोडी लागली. राष्ट्रीय भावनेचे संस्कारदेखील त्यांच्यावर त्याच वेळेपासून होऊ लागले. शाळेत शिकत असतानाच हिंदुस्थानातील क्रांतिकारकांच्या हालचालींची समग्र माहिती असलेला रौलॅट कमिशनचा अहवाल त्यांना वाचावयास मिळाला. अक्षरश: झपाटलेल्या अवस्थेत त्यांनी तो जाडजूड अहवाल संपूर्णपणे वाचून काढला. त्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांसंबंधीची रोमहर्षक माहिती त्यांनी वाचिली आणि त्या क्षणापासूनच ते स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे ओढले गेले. त्यांच्या मनावरील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेव्हा पडलेला प्रभाव उत्तरोत्तर वाढतच गेला. पुढे ते सावरकरांचे निष्ठावान अनुयायी बनले. निकटवर्ती बनले. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी वीर सावरकरांच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी अनेक दौरे काढले, असंख्य भाषणे दिली, लेख लिहिले. परिणामत: त्यांना राजकीय विजनवास व उपेक्षा या गोष्टी सहन कराव्या लागल्या, तरी त्यांनी त्याची यत्किंचितही क्षिती बाळगली नाही. अगदी लहान वयापासूनच रा. म. यांचं ‘केसरी’चं नियमीत वाचन चालू असल्याने त्यांच्यावर लोकमान्य टिळकांच्या जहाल राष्ट्रवादी विचारांचे संस्कार सातत्याने होत होते.

रामचंद्र  महादेव हे मॅट्रिकला असतानाच सन 1918 मध्ये त्यांना तो रौलॅट कमिशनचा अहवाल वाचावयास मिळाला. त्या वेळी स्वा. सावरकर अंदमानात जन्मठेपेची शिक्षा भोगीत होते. तेव्हाच रा. म. यांनी ‘सावरकर हेच माझे राजकीय गुरु व नेता’ असा मनोमन दृढ संकल्प सोडला. पुढे सहा वर्षांनी स्वा. सावरकरांची मुक्तता होताच त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा अपूर्व योग त्यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांच्या गिरगावातील तेव्हाच्या बिर्‍हाडी सन 1924 मध्ये आला. तो त्यांना जणू उत्तम प्रतिसादाचा शुभशकुनच वाटला.

इंटरच्या वर्गात असताना महात्मा गांधींनी असहकारितेचं आंदोलन छेडलं होतं. ‘एक वर्षात स्वराज्य’ही त्यावेळची त्यांची घोषणा होती. शाळा कॉलेजांवर बहिष्कार घालण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलं होतं. त्याला प्रतिसाद देत रा. म. यांनी इंटरमधूनच कॉलेज शिक्षणास रामराम ठोकला. अर्थात त्या आंदोलनास यश लाभलं नाही. स्वराज्याची लढाई पुढे चालूच राहिली. पण रा. म. पुन्हा कॉलेजात मात्र गेले नाहीत. त्यांनी आपला व्यासंग स्वतंत्रपणे चालू ठेवला आणि अभ्यास-वाचन-मनन-चिंतन याद्वारे त्यांनी शिक्षण क्षेत्रात किंवा ज्ञानाच्या क्षेत्रात फार मोठा अधिकार प्राप्त केला. ते केवळ पढीक विद्वान नव्हते तर सर्वकाळ संशोधक, चिकित्सक विद्वान होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी - विद्यार्थिनींनी उच्च गुणवत्तेसह पदव्या प्राप्त केल्या. रा. म. यांनी शिकवणीचे पैसे कोणाकडूनही घेतले नाहीत ही गोष्ट येथे विशेषत्वाने उल्लेखिली पाहिजे. कारण शिकवणीचे पैसे घेणे म्हणजे विद्या विकणे हे त्यांच्या तत्त्वात बसणारे नव्हते. विद्या ही पैसे घेऊन शिकवण्याची गोष्ट नव्हे असं त्यांचं ठाम मत होतं. त्यांनी खर्‍या अर्थाने आयुष्यभर काहीही हातचे न राखता ज्ञानदान केलं. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान असेल आणि ते पुण्यप्रद असेल तर ते पुण्य रा. म. यांनी आयुष्यभर केलं आहे. रा. म. हे चालता-बोलता ज्ञानकोश होते. त्यांचा अनेकांनी उपयोग करून घेतला. पण ते स्वत: मात्र या व्यावहारिक जगात अपेशी ठरले, निष्कांचन राहिले. परंतु त्यांनी या गोष्टीची मुळीच खंत केली नाही. सरस्वतीच्या या निस्सीम उपासकाने लक्ष्मी मिळविण्याचा ध्यास कधीच धरला नाही आणि त्यासाठी त्यांनी कुणाची लाचारी वा मिंधेपण यत्किंचितही पत्करले नाही.

रा. म. यांना स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकरांप्रमाणेच सामुदायिक शुद्धि चळवळीचे प्रणेते विनायक महाराज मसूरकर देखील गुरुस्थानी होते. हे दोन ‘विनायक’ त्यांचे गुरु. मसूरकर महाराजांनी गोव्यात सन 1928 मध्ये घडवून आणलेल्या दहा हजार गावड्यांच्या सामुदायिक शुद्धीकरणाचे रा. म. हे प्रत्यक्ष साक्षीदार होते. तसेच स्वा. सावरकरांच्या रत्नागिरीतील सुप्रसिद्ध पतितपावन मंदिराच्या स्थापना सोहळ्यातील ते एक साक्षीदार होते. या दोन महापुरुषातील, या दोन विनायकांतील रा. म. हे एक महत्त्वाचा दुवा होते. गोमंतकातील त्या ऐतिहासिक सामुदायिक शुद्धिसमारंभावरील सावरकरांचा ‘गोमंतकाला विसरू नका’ हा ‘श्रद्धानंद’मधील लेख रा. म. यांना सावरकरांनी स्वत: सांगून लिहून घेतला होता. (डिक्टेट केला होता) ती महत्त्वाची आठवण रा. म. आठवले लिखित ‘बॅरिस्टर सावरकर : शलाका परिचय’ या पुस्तकात सविस्तर आलेली आहे. ‘मसुराश्रमा’च्या वतीने निघणार्‍या ‘श्रीदासबोध’ मासिकाचे (पडद्याआडून) संपादन रा. म. यांचे होते. मसुराश्रमाचे त्यांनी सहा वर्षे पूर्ण वेळ काम केले आहे.

रा. म. हे अधिकारी संशोधक होते. मराठीचे भाषाशास्त्र, संतवाङ्मय, पंतवाङ्मय, इतिहास व संस्कृत साहित्य हे त्यांच्या व्यासंगाचे विषय होते. त्यावर त्यांचे शेकडो संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मोरोपंत, वामन पंडित किंवा कालिदास हे जसे त्यांचे संशोधनाचे, अभ्यासाचे अन् आवडीचे विषय तसेच ‘1857 चे क्रांतियुद्ध’ हा त्यांचा खास संशोधनाचा विषय. या विषयावरील शेकडो इंग्रजी ग्रंथ त्यांनी विकत घेऊन वाचले - अभ्यासिले होते. हे त्यांच्या ग्रंथ संग्रहावरून लक्षात येई. इतकंच नव्हे तर हिंदुस्थानभर स्वत: फिरून व संशोधन करून त्यांनी त्या विषयावर विपुल लेखन केलं आहे. 1857 च्या क्रांतियुद्धावरील एक अधिकारी संशोधक म्हणून त्यांची ख्याती होती. अगदी या युद्धापर्यंत मस्तानीपुत्र समशेर बहाद्दराचे वंशज पेशव्यांच्या मुख्य वंशजांशी एकनिष्ठ व बंधुवत् होते हे संशोधून ते अभिमानाने सांगत असत.

1857 च्या क्रांतियुद्धावर सविस्तर,साधार ग्रंथ लिहिण्याचा रा.म. यांचा मानस होता आणि त्या ग्रंथाची सिद्धता करण्यासाठी त्यांनी हिंदुस्थानभर प्रवास करून भरपूर दुर्मिळ माहिती, ऐतिहासिक संदर्भ, कागदपत्रे, चित्रे-रेखाचित्रे जमविलेली होती. प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील हा ग्रंथ प्रसिद्ध व्हावा असं मनापासून वाटत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्यांच्या ‘1857 चे स्वातंत्र्य समर’ या ग्रंथाची पहिली इंग्रजी आवृत्ती ‘केशव भिकाजी ढवळे’ प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध झाली. तिच्यामध्ये  रा.म. यांच्या संग्रहातील अनेक चित्रे प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याविषयी कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्या ग्रंथाच्या प्रास्ताविक निवेदनातही केलेला आहे. रा.म. यांच्या या ‘सत्तावनी क्रांतियुद्धा’च्या विषयावरील संशोधनाविषयी व अधिकाराविषयी स्वत: स्वातंत्र्यवीर सावरकरांना विश्वास होता म्हणून ते अधून मधून या आगामी नियोजीत ग्रंथाविषयी आस्थेने चौकशीही करीत. अर्थात् या विषयावरील रा.म. यांचे संशोधनपर अनेक लेख प्रसिद्ध झाले असले तरी हा स्वतंत्र ग्रंथ मात्र प्रसिद्ध होऊ शकले नाही.
रा. म. यांनी ‘श्रीज्ञानदेवी’ मासिकाप्रमाणेच ‘कौस्तुभ’ हे अर्धवार्षिक काही काळ चालवून आपल्या संपादन कौशल्याचा प्रत्यय आणून दिला. रा. म. यांचा ऐन उमेदीचा व लेखनकर्तृत्वाचा सुमारे 30-35 वर्षांचा काळ ठाणे शहरात गेल्यामुळे लोक त्यांना ‘ठाण्याचे रा. म. आठवले’ म्हणून ओळखत. त्यांनी आपल्या प्रभावी नि पल्लेदार वक्तृत्वाने अनेक सभा-संमेलने गाजविली. अनेक साहित्यिक वादात हिरिरीने भाग घेतला. मराठी भाषाशुद्धीचे ते कडवे प्रचारक होते. आज सर्रास रूढ असलेल्या ‘विक्रम’, ‘ध्वनिक्षेपक’ या शब्दांची निर्मिती त्यांचीच. इंग्रजीतील ‘रेकॉर्ड’ या शब्दाला ‘विक्रम’ हा प्रतिशब्द कसा समर्पक आहे त्यासंबंधी त्यांचा एक स्वतंत्र लेखच प्रसिद्ध झाला आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण त्याच वेळी देशविच्छेदनाचं - फाळणीचं संकट आपल्या देशबांधवांवर कोसळलं. या प्रसंगी पाकिस्तानात झालेल्या भीषण दंगलींची, हिंदूंच्या शिरकाणाची वर्णने वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्ध होऊ लागली, तशी येथील हिंदुत्वनिष्ठ जनतेतून संतापाची लाट उसळू लागली. स्वाभाविकपणेच रा. म. यांच्या जहाल व ज्वालाग्राही भाषणांना या काळात उधाण आलं. परिणामी त्यांच्यावर भाषण बंदी घालण्यात आली. कोणत्याही विषयावर व्याख्यानप्रवचनादी कोणत्याही माध्यमातून बोलण्यास त्यांना तत्कालीन शासनाकडून प्रतिबंध करण्यात आला. कारण रा. म. कोणत्याही विषयाचा वा माध्यमाचा आपले जहाल विचार व्यक्त करण्यासाठी वापर करतील याची पोलिसांना खात्री होती. देशाच्या दुर्दैवी फाळणीतून उद्भवलेल्या भीषण दंगलीत आपल्या प्राणास मुकलेल्या असंख्य हिंदू स्त्री-पुरुष बांधवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबई गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापाशी 15 ऑगस्ट 1947ला प्रगट समारंभ हिंदुत्वनिष्ठांनी आयोजित केला होता. त्यात रा. म. हे सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमावर पोलीसांनी बंदी घातली. बंदी मोडल्यामुळे रा. म. यांना अन्य कार्यकर्त्यांसह अटक झाली आणि कारागृहात डांबण्यात आलं. सारा देश स्वातंत्र्योत्सव साजरा करीत असता हे देशभक्त कार्यकर्ते आपल्याच पोलिसांकडून घडवलेला तुरुंगवास भोगत होते. हा विरोधाभास मनाला चटका लावल्यावाचून राहात नाही.

रा. म. यांनी विपुल लेखन केलं. श्रीमद् भगवद्गीतेचा पहिला मराठी अवतार असलेल्या श्रीनिवृत्तिनाथांच्या ‘निवृत्तेश्वरी’ या महान् संशोधनपर ग्रंथाचे लेखन त्यांनी पूर्ण केले होते. त्याचप्रमाणे विशदार्थ दासबोध, विशदार्थ ज्ञानेश्वरी व गुरुचरित्र या ग्रंथांचेही लेखन त्यांनी पूर्ण केले होते. परंतु या ग्रंथांना प्रसिद्धीचा प्रकाश त्यांच्या हयातीत मिळू शकला नाही. हे ग्रंथ छापून प्रसिद्ध करणे हे लक्षावधी रुपयांचं काम आहे. तरी देखील ते एक राष्ट्रीय व समाजहिताचं काम आहे याची जाणीव शासनाला व सूज्ञ - समर्थ व्यक्तींना होणं आवश्यक आहे. या महान ग्रंथांच्या कुशाग्रबुद्धी लेखकाची - निर्मात्याची आयुष्यभर उपेक्षा झाली, पण त्यांनी लिहिलेल्या या मौलिक ग्रंथांची, साहित्याची तरी उपेक्षा होऊ नये ही इच्छा आहे.

रा. म. यांनी महाकवी नारायण रामचंद्र मोरे लिखित ‘शिवायन महाकाव्या’ला ‘ललकार’ नावाची 128 पृष्ठांची लिहिलेली प्रदीर्घ, अभ्यासपूर्ण प्रस्तावना विद्वन्मान्य झालेली आहे. त्यांनी विविध विषयांवर मौलिक लेखन एवढ्या विपुल प्रमाणात केलं आहे की त्यांची 10-12 तरी पुस्तके छापता येतील. अर्थात ते शक्य होईल त्याप्रमाणे करणे हेच पुढील पिढ्यांचं कर्तव्य ठरतं कारण तीच त्यांना उचित श्रद्धांजली होईल.

रा. म. आठवले यांचं ज्या दिवशी देहावसान झालं त्याच दिवशी दि. 31 डिसेंबर 1988ला त्यांनी आयुष्यभर पुरस्कारलेल्या हिंदुत्वाचा उच्चरवाने उद्घोष शिवसेनेच्या पुण्यातील राज्यव्यापी अधिवेशनात होत होता. ही रा. म. यांना काळपुरुषाने दिलेली जणू अभिनव मानवंदनाच होती !

शब्दांकन : क्रांतिसेन आठवले

‘‘सन 1937 मधील एक दुर्मिळ छायाचित्र - स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत रा. म. आठवले’’

दिवाणबहाद्दुर रामचंद्र  सदाशिव आठवले


जीवनकाल: 1872 ते 1955
वंशावळ संदर्भ : गुहागर 1/8

माझे आजोबा दिवाणबहादुर रामचंद्र सदाशिव तथा भाऊसाहेब आठवले यांचा जन्म एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात 1872 साली एका वैदिक घराण्यात झाला. त्यांचे वडील वेदशास्त्रसंपन्न व वेदपठण करणारे होते. कुटुंब मोठे होते व त्यामानाने आर्थिक स्थिती कनिष्ठ, मध्यम वर्गातील होती. आमचे आजोबा, भाऊसाहेब लहानपणापासूनच फार हुशार होते. त्यांना संस्कृत बरोबर इंग्रजी बद्दल बरीच ओढ होती. त्यामुळे त्यांनी पारंपारिक वेदाध्ययनात फारशी रूची न दाखविता त्यावेळच्या इंग्रजी शिक्षणाबद्दल आग्रह धरून ते इंग्रजी शाळेत गेले. आपल्या हुशारीने व कष्टाने त्यावेळच्या इंग्रजी शिक्षणात चांगली प्रगती केली. मॅट्रिक व बी. ए. परीक्षेत ते उत्तम रीतीने मार्क मिळवून उत्तीर्ण झाले. डेक्कन कॉलेजातून ते बी. ए. झाले. शिक्षण काळात काही काळ त्यांना लोकमान्य टिळकांनी शिकविले, होते अशा ते आठवणी सांगत. संस्कृत हा आजोबांचा आवडीचा व व्यासंगाचा विषय होता. तरुणपणी त्यांना व्यायामाची आवड असल्याने त्यांनी चांगले शरीर कमाविले होते. त्यांना कुस्ती खेळण्याचीही आवड होती. व कांही चांगल्या कुस्त्या केल्याचे ते सांगत. त्यामुळे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी प्रकृती उत्तम राखली होती. त्यांना कधीही कोठला मोठा आजार झाला नाही.

बी. ए. ची परीक्षा चांगल्या रीतीने उत्तीर्ण झाल्याने त्यांना त्यावेळच्या मुंबई इलाख्याच्या महसूल खात्यात सहजगत्या नोकरी मिळाली. नोकरीच्या काळात अत्यंत तडफेने व आदर्श रीतीने काम करून त्यांनी खात्यात चांगला नाव लौकिक मिळविला. आपल्या गुणांनी खात्यात त्यांनी चांगली प्रगती करून शेवटी सातारा जिल्ह्यात डेप्युटी कलेक्टर पदावर ते पोचले. काही काळ त्यांनी त्याचे ‘‘प्रांत’’ म्हणूनही काम केले.

त्यांच्या एकूण कर्तृत्वाची व गुणांची प्रसिद्धी ऐकून सांगली संस्थानचे त्यावेळचे राजे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन बरेच प्रभावित झाले. त्यांनी भाऊसाहेबांना भेटून त्यांना सांगली संस्थानचे दिवाणपद स्वीकारण्यासंबंधी आग्रह धरला. आजोबांनी अनुकूलता दर्शविताच राजेसाहेबांनी मुंबई सरकारकडे आपले वजन खर्च करून भाऊसाहेबांची 1922 ते 1925 या तीन वर्षासाठी सांगली संस्थानचे दिवाणपदावर नियुक्ती करविली.

सांगलीस कामावर रूजू झाल्यानंतर भाऊसाहेबांनी तीन वर्षांच्या काळात संस्थानचे बरेच प्रश्न सोडवून संस्थानची चांगली प्रगती घडवून आणली व लौकिक वाढविला. त्यांचा संस्थानांत एकूण चांगला दरारा होता. राजेसाहेबसुद्धा त्यांच्याशी अगदी अदबीने वागत. त्यांचे कामाने प्रभावित होऊन राजेसाहेबांनी त्यांचा दिवाणपदाचा काळ दहा वर्षांपर्यंत वाढवीत नेला. म्हणजे एकूण 1922 ते 1932 भाऊसाहेब तेथे दिवाण होते. त्याच काळात माझा जन्म 1929 साली भाऊसाहेबांचे राहते घरात - श्री. करमरकर यांचे बंगल्यात झाला, हा एक योगायोग.

1932 साली भाऊसाहेबांचे वय 60 वर्षांचे झाले होते. तेव्हा वयपरत्वे व प्रकृतिखातर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली व ते नाशिकला रविवार पेठेतील कृष्णशास्त्री देवधर वैद्य यांचे गल्लीतील आपल्या वाड्यात स्थायिक झाले. भाऊसाहेबांचे वडिलांचे निधनानंतर म्हणजे नोकरीचे काळात आठवले कुटुंबाची सर्व जबाबदारी भाऊसाहेबांवरच पडली होती. कारण तेच एवढ्या मोठ्या कुटुंबाचे पोषणकर्ते होते. स्वत:चे तीन मुलगे व एक मुलगी व दोघा भावांचे मिळून चार मुलगे व एक मुलगी एवढ्या कुटुंबाची संगोपनाची जबाबदारी होती. या सर्वांचे पालनपोषण, शिक्षण, नोकरी, विवाहादी कार्ये त्यांनी आपला व भावाचा - असा भेदभाव न करता व्यवस्थित पार पाडली. अशीच भावना आमच्यासारख्या सर्व नातवंडांतही उतरली. त्यामुळे आजही आम्हा सर्वांमध्ये सख्खा चुलत असा भेदभाव जाणवत नाही. ही सर्व आम्हा सर्वांना भाऊसाहेबांचीच देणगी आहे. ते जणू आम्हा आठवले घराण्याचे कुलदैवतासमानच झाले.
आयुष्याचे अखेरीचे काळात ते आपले द्वितीय चिरंजीव गंगाधरपंत ऊर्फ बापूसाहेब आठवले यांच्या पुणे येथील वैदिकाश्रमातील विहिरी शेजारच्या बंगल्यात होते. 1955 सालातील ऑगस्ट महिन्याची 18 तारीख होती. वयाची 83 वर्षे पूर्ण करून 84वे वर्ष चालू होते. तिथीने तो दिवस म्हणजे भाद्रपद शु. प्रतिपदेचा दिवस होता. माझा वाढदिवस त्याच दिवशी असल्याने मी त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. परंतु काळाचे मनांत काही वेगळेच होते. सकाळी 9.30 चा सुमार; भाऊसाहेब स्नान करून शूचिर्भुत होऊन आपल्या खोलीत पलंगावर बसले होते. रोजच्या सवयीप्रमाणे ते तेथे बसून गायत्रीचा जप, प्राणायाम व ध्यान करीत असतानाच एकाएकी हृदयक्रिया बंद पडून त्यांची प्राणज्योत मालवली. अशा रीतीने एका कर्तृत्ववान व आदर्श जीवनाची सांगता इतक्या शांतपणे आपल्या स्वत:ला व इतर कोणालाही त्रास न देता झाली. आज या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस शतश: वंदन करतो.

शब्दांकन : केशव चिंतामणी आठवले

अरविंद नारायण आठवले


उद्योगपती
आधीच्या लेखातील नारायण महादेव तथा नानासाहेब आठवले यांचे अरविंदराव हे ज्येष्ठ चिरंजीव. आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर, अरविंदरावांना एक दुर्मिळ संधी मिळाली. त्या काळच्या ब्रिटिश सरकारने तरूण भारतीयांना औद्योगिक शिक्षण मिळावे म्हणून लॉर्ड बेव्हिन यांच्या नावाने उपक्रम चालू केला होता. त्यात तरूण व होतकरू भारतीय तरूणांना सरकारी खर्चाने इंग्लंडला पाठवून शिक्षण देण्यात येत असे. अरविंदराव या उपक्रमात निवडले गेले व उपकरण निर्मितीचे शिक्षण त्यांना इंग्लंडमध्ये जाऊन घेता आले. तेथे त्यांनी ‘फेरांटी लिमिटेड’ या उपकरणे बनविणार्‍या कारखान्यात प्रत्यक्ष कार्य केले. त्यांचे कार्य या कंपनीला एवढे पसंत पडले की 2/3 वर्षानंतर त्यांनी अरविंदरावांना परत इंग्लंडला बोलावून घेतले. इंग्लंडमधल्या त्या कार्यानुभवाचा अरविंदरावांना खूपच फायदा झाला. परत आल्यावर नानासाहेबांनी चालू केलेल्या उपकरणांच्या कारखान्यात नवीन उत्पादनांचे आरेखन व नमुने बनविणे हे काम त्यांनी हातात घेतले व नवीन उत्पादनांची मालिकाच विकसित केली.

मुळातच अरविंदराव अतिशय सृजनशील होते. लहानपणापासूनच त्यांना खेळणी किंवा घरगुती वस्तू यांची मॉडेल्स बनविण्याचा छंद होता. इंग्लंडमधून परत आल्यावर त्यांना इलेक्ट्रॉनिक्स या विषयात रस वाटू लागला. त्याच सुमारास रेडिओवरून जगभरच्या लोकांशी संपर्क साधण्याचा एक उपक्रम लोकप्रिय होऊ लागला होता. अरविंदराव पुण्यातले पहिले ‘अ‍ॅमेच्युअर रेडिओ ऑपरेटर (कअच)’ बनले. या साठी लागणारी सर्व उपकरणे अरविंदरावांनी मिलिटरी डिस्पोझल च्या मधून घरीच बनविली. 1960 च्या आसपास टेप रेकॉर्डर हे नवीन करमणुकीचे साधन म्हणून लोकप्रिय होऊ लागले होते. त्या वेळी हे उपकरण पूर्णपणे आयात करावे लागे. इलेक्ट्रॉनिक्सच्या छंदामुळे, अरविंदरावांचे लक्ष या उत्पादनाकडे गेले व संपूर्ण भारतीय बनावटीचा टेप रेकॉर्डर त्यांनी 1964 साली तयार केला व त्याचे उत्पादन व विक्री करण्याचा उद्योग त्यांनी सुरु केला. या उत्पादनाला ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज’ ने ‘पारखे पुरस्कार’ देऊन गौरविले होते.

अरविंदरावांचा विवाह दि. 26 जानेवारी 1942 ला सौ. कां. शांता विनायक करमरकर यांच्याशी झाला. शांताबाईंचं शिक्षण बी. ए. बी. टी. असून त्यांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. विशेषत: बालशिक्षण क्षेत्रात त्यांचं कार्य असून पुण्याच्या नूतन बालशिक्षण संघाच्या 5/6 बालवाड्या आणि प्राथमिक शाळा त्यांनी सुरु केल्या आहेत.

अरविंदरावांना क्रिकेट या खेळात खूप रस होता. शाळेच्या व नंतर डेक्कन जिमखान्याच्या क्रिकेट टीममधे ते खेळत असत. होम गार्डमधेही ते ऑफिसर होते.

नारायण महादेव उर्फ नानासाहेब आठवले


उद्योगपती (श्रीमती पार्वतीबाई यांचे पुत्र)
कोकणामधला रत्नागिरी जिल्हा हा त्या मातीतून निर्माण झालेल्या महामानवांसाठी प्रसिद्धच आहे. याच जिल्ह्यात असलेल्या देवरुख या तालुक्याच्या गावी नानासाहेबांचा जन्म 15 डिसेंबर 1890 नव्वद रोजी झाला. अतिशय सामान्य परिस्थितीतील आईबापांच्या पोटी जन्माला आलेल्या या मुलाचे दुर्दैव बहुधा पाचवीलाच पुजलेले होते. दीड वर्षाच्या वयातच पितृछत्र हरवल्याने, आईबरोबर या मुलाला आपल्या आजोळी आधार घ्यावा लागला होता. आजोळी सुद्धा परिस्थिती काही फारशी चांगली होती असे म्हणता येणार नाही. छोट्याश्या शेत जमिनीवर कुटुंबाची कशी बशी गुजराण होत होती. छोट्या नानाचे भविष्य पूर्णपणे अंधकारमयच होते असे म्हटले तरी फारसे वावगे ठरू नये.

नानाच्या आईबरोबर त्याची मावशी बाया ही सुद्धा अगदी लहान वयातच विधवा होऊन माहेरी परतली होती. तिचे आई वडील व थोरले बंधू यांनी दाखविलेल्या असामान्य दूरदृष्टीमुळे तिचा पुनर्विवाह, महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्याशी याच सुमारास झाला. ही घटना छोट्या नानाच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारी ठरली. बाया मावशी व अण्णा यांनी नानाची पूर्ण जबाबदारी घेतली व कोकणातील भविष्यविरहित परिस्थितीतून नाना पुण्याला शिक्षणासाठी आला.

अण्णा व बायाचे ऋण नानासाहेबांनी पूर्णपणे फेडले. शाळा कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या आवडीच्या भौतिकी (झकधडखउड) या विषयात त्यांनी पदवीत्युत्तर शिक्षण घेतले व एम. एससी. पदवी प्राप्त करून घेतली. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर, सहजा सहजी मिळू शकणारी सरकारी नोकरी व मानमरातब याचा मोह सोडून देऊन त्यांनी आपल्या आयुष्याची उमेदीची पंचवीस वर्षे, अण्णांच्या संस्थेत (हिंगणे स्त्री शिक्षण संस्था), संस्थेला शक्य असेल तेवढेच वेतन घेऊन, संस्थेच्या कार्यास हातभार लावण्यात घालवली. संस्थेने स्थापन केलेल्या महिला विद्यापीठात (सध्याचे एस. एन. डी. टी. विद्यापीठ) त्यांनी रजिस्ट्रार, प्राध्यापक व प्रिन्सिपॉल ही पदे सांभाळली. निवृत्त झाल्यावर नानासाहेब स्वस्थ बसले नाहीत. आपल्या आवडीच्या शास्त्रीय व विद्युत उपकरण निर्मितीच्या धंद्यात त्यांनी लक्ष घातले. कॉलेजांना लागणार्‍या शास्त्रीय उपकरणांच्या उत्पादनाला त्यांनी प्रथम सुरुवात केली. नंतर विद्युत व प्रकाशीय उपकरणांचेही उत्पादन त्यांनी सुरु केले. दुसर्‍या महायुद्धात भारतीय आरमारासाठी त्यांनी संपूर्ण स्वदेशी बनावटीचे, अल्डिस सिग्नलिंग दिवे, विकसित केले व आरमाराला पुरवले. धंदा आपल्या कुवतीप्रमाणे एका विवक्षित मर्यादेपर्यंत स्वतंत्रपणे वाढविला व पुढे आपली मर्यादा लक्षात घेऊन तो धंदा वाढावा या साठी तो विकण्याचा धाडसी निर्णयही घेतला. एक कल्पना मनात घेऊन त्यावर, (ज्याला अलीकडे ’डींरीीं णि’ असे म्हणतात), धंदा उभा करायचा व पुढे योग्य किंमत मिळाल्यास तो विकून टाकायचा ही नवीन युगातील एक संकल्पना आहे. इंटरनेटवरून मेल पाठविण्यासाठी जन्माला आलेली ‘केीांरळश्र’ ही या संकल्पनेचे एक उत्तम उदाहरण आहे. परंतु नानासाहेबांनी साठ वर्षापूर्वीच ही कल्पना राबविली व उपकरण निर्मितीचा धंदा आणि आपली परिस्थिती दोन्ही सुधारली. सांपत्तिक परिस्थिती सुखकर झाल्यावर अण्णांचे उरले सुरले ऋण फेडण्यासाठी नानासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या कमाईचा एक फार मोठा हिस्सा अण्णांच्या संस्थेला देणगी म्हणून दिला.

शास्त्रीय व विद्युत उपकरणांच्या भारतीय उत्पादकांच्या समित्यांवर तसेच भारत सरकारने नेमलेल्या या विषयांवरच्या अनेक समित्यांवर त्यांनी अनेक वर्षे काम केले. या विषयातले एक प्रमुख तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जात. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे ते बरीच वर्षे उपाध्यक्ष होते.

नानासाहेबांच्या आयुष्याची जडण घडण करण्यात त्यांची आई, श्री. पार्वतीबाई आठवले यांचाही मोठा वाटा आहे. त्यांच्या आयुष्याची कहाणी पुस्तक रूपाने उपलब्ध आहे. त्यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून एक वेब साईट ही उपलब्ध आहे. ज्या वाचकांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे अशा वाचकांनी पुढील वेबसाईटवर  पार्वतीबाईंची कहाणी पाहावी -  ुुु.रींहर्रींरश्रश.पशींषळीाी.लेा हातात भरपूर पैसे खेळू लागल्यावरही नानासाहेबांनी त्या पैशांवर कधी चैन, मौज मजा केली नाही. परंतु आपल्या ’ईीीेंपेाू’ या छंदावर पाहिजे तेवढा पैसा खर्च करण्यास मात्र त्यांनी कधी मागे पुढे पाहिले नाही. आपल्या राहत्या घरावर तिसरा मजला बांधून त्यात त्यांनी स्वत: बनविलेली एक टेलिस्कोप बसवून घेतली व वयपरत्वे तिचा वापर आपल्याला करता येणार नाही हे लक्षात आल्यावर ती टेलिस्कोप त्यांनी फर्ग्युसन कॉलेजला देणगी म्हणून दिली. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते मनाने व शरीराने कार्यरत होते. निरनिराळे नव नवीन प्रयोग करणे, वाचन करणे हे त्यांनी कधी सोडले नाही.

थोर समाजसेविका श्रीमती पार्वतीबाई महादेव आठवले


महर्षी कर्वे यांच्या सहकारी आणि अनाथ बालिकाश्रमाच्या प्रमुख आधारस्तंभ
जन्म: 1870
वंशावळ संदर्भ: सोमेश्र्वर 21

अत्यंत करारी स्वभावाच्या, स्वाभिमानी वृत्तीच्या, लहान वयातच वैधव्य वाट्याला आलेल्या, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या निकटच्या सहकारी, त्यांनीच हिंगणे येथे स्थापन केलेल्या अनाथ बालिकाश्रमाच्या प्रमुख आधारस्तंभ, त्या संस्थेला देशातून नि परदेशातून सहस्त्रावधी रुपयांच्या देणग्या मिळविणार्‍या, त्यासाठी वर्षानुवर्षे अहोरात्र भ्रमंती करणार्‍या, अनेक संकटांवर यशस्वीपणे मात करून स्वत:च्या कार्याचा डोंगर उभा करणार्‍या आणि समाजसुधारकांना देखील दीपस्तंभ ठराव्यात अश्या श्रीमती पार्वतीबाई आठवले यांचा आठवले कुलातील प्रत्येकालाच अभिमान वाटेल. आठवले कुलाच्या त्या खर्‍या अर्थाने भूषण आहेत. श्रीमती पार्वतीबाईंनी सुमारे शंभर पृष्ठांचं ‘माझी कहाणी’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहून फार मोठं काम केलेलं आहे. कारण त्यामुळेच त्यांच्या बहुमोल समाजकार्याचा महत्त्वाचा दस्तावेज आज आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्या आधारानेच आम्ही त्यांच्या जीवनकार्याचं थोडक्यात दर्शन या ठिकाणी आमच्या कुल बांधवांना घडवीत आहोत.

पार्वतीबाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख गावी सन 1870 मध्ये झाला. त्यांचे वडील बाळकृष्ण केशव जोशी. त्यांची देवरुखात स्वत:चं घर, शेतीवाडी होती. पार्वतीबाईंना एकूण अकरा भावंड. पण त्यातली चौघंच (तीन बहिणी व एक भाऊ) पुढे जगली व वाढली. त्यांची एक बहीण म्हणजे धोंडो केशव कर्वे यांची पत्नी आनंदीबाई. त्यांची दुसरी बहीण म्हणजे नाशिक हायस्कूलचे हेडमास्तर रामचंद्र काशिनाथ भिडे यांची पत्नी यशोदाबाई भिडे. मोठे बंधू नरहर बाळकृष्ण जोशी भावनगर येथे मुलाकडे जाऊन राहिलेले. ते वयाच्या 78व्या वर्षी निवर्तले. आई 75व्या वर्षी तर वडील 92व्या वर्षी दिवंगत झालेले. त्या काळी म्हणजे पार्वतीबाईंच्या लहान वयात देवरूखमध्ये मुलांचीसुध्दा शाळा नव्हती तर मुलींची कुठून असणार? त्या वेळी बायकांनी शिकावे की नाही याविषयी घरी चर्चाही होत नसे. त्यामुळे स्त्रीशिक्षणाचा तेव्हा प्रश्नही निर्माण झाला नव्हता. लहान मुलींना पूजेची तयारी करीता आली, तांदूळ कांडता येऊ लागले, उष्टे-खरकटे काढता येऊ लागले, लहान मुलांना आंघोळ घालून त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करता येऊ लागली की स्त्रीचे शिक्षण पूर्ण झाले असा त्या वेळी समज असे. त्यावेळची मुलींची मॅट्रिक परीक्षा म्हणजे भात-पिठले करता येणे व दोघांचा स्वयंपाक करता येणे. पार्वतीबाईंना या गोष्टी वयाच्या अकराव्या वर्षीच येऊ लागल्या होत्या.
पार्वतीबाईंची आई अत्यंत कामसू. घरी सात-आठ मुले, दोन तीन गाई, तीन चार म्हशी असा सर्व व्याप होता. तो सर्व एकटी आई समर्थपणे सांभाळी. तर वडील बाहेरचा व्यवहार व शेतीवाडी सांभाळीत. ते नेहमी नामस्मरणात दंग असत. त्यांचे विचार व आचार सुधारकाला साजेसे असत. त्या काळी ते महार मांगांना प्यायला घरातलं माठातलं पाणी अगदी सोवळ्यात असले तरी अगत्यपूर्वक स्वत: नेऊन देत. महार मांगांसह आपण सर्वच जण रामाची लेकरं आहोत. त्यांचा आत्मा पाणी पिऊन थंड झाला की आमचं समाधान होईल ही त्यांची सुधारकी विचारसरणी आणि त्यानुसार आचरण. हेच संस्कार पार्वतीबाईंवर लहानपणीच झालेले होते.

त्या काळी मुलींची लग्नं पाचव्या वर्षापासूनच होत असत. पार्वतीबाई अकरा वर्षांच्या झाल्या तेव्हा आजूबाजूच्या बायका “किती मोठी झाली आहे लग्नाला !” असं म्हणू लागल्या. पार्वतीबाईंच्या भावाचे लग्न झाल्यावर वडील आजारी होते म्हणून त्यांना पार्वतीबाईंसाठी स्थळ पाहणे जमले नाही. पण तो योग पार्वतीबाईंच्या वयाच्या अकराव्या वर्षी आला. रत्नागिरीतील प्रसिद्ध ‘नऊ पटवर्धनां’पैकी एक भिकाजीपंत पटवर्धन हे त्यांच्या शेजारीच राहात होते. ते मामलेदार होते. त्यांच्या पत्नीच्या मध्यस्थीने त्यांच्याच आश्रयाला असलेल्या, गोव्याला कस्टम खात्यात नोकरी करणार्‍या, 15 रुपये पगार असलेल्या, एका पायाने अधू (लंगडा) असलेल्या मुलाबरोबर पार्वतीबाईंचं लग्न ठरलं. रामानेच (परमेश्वराने) धाडलेलं हे स्थळ अशी वडिलांची प्रतिक्रिया. अखेर सहा दिवसातच हे लग्न (पार्वतीबाईंना पसंत नसतानाही) पार पडलं आणि पार्वतीबाई गोव्याला पणजीजवळ वेरे गावी नवर्‍याच्या घरी (बिर्‍हाडी) रवाना झाल्या. पार्वतीबाई जोशी आता पार्वतीबाई आठवले झाल्या. पंधराव्या वर्षी त्यांना मुलगा झाला. पण तो अपुर्‍या दिवसांचा होऊन वारला. लहान वयातच बाळंतपण ओढवल्याने पार्वतीबाईंचे हाल झाले. नंतर त्यांना 18व्या वर्षी दुसरा मुलगा झाला, जो पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या अनाथ बालिकाश्रम संस्थेचा आजन्म सेवक होऊन भारतवर्षीय महिलाविद्यापीठाचा रजिस्ट्रार व महिला पाठशाळेचा प्रिन्सिपॉल झाला. तो पदार्थविज्ञान शास्त्राचा प्रोफेसरही होता. त्याचं सर्व शिक्षण पार्वतीबाईंनी आपल्या हिंमतीवर पूर्ण केलं. कारण त्यांचे पती सन 1890 मध्ये उदर रोगाने वारले. आणि पार्वतीबाईंच्या नशिबी वयाच्या विसाव्या वर्षीच वैधव्य आलं. त्यांना माहेरीच वास्तव्य करावं लागलं. पार्वतीबाईंची मोठी बहीण ही रँग्लर परांजपे यांची सासू. सहा वर्षांपूर्वीच विधवा होऊन ती देखील माहेरीच आली होती. तर धाकटी बहीण नवव्या वर्षीच विधवा झाली होती. पुढे तिच्याशी महर्षी कर्वे यांनी पुनर्विवाह केला तीच बाया कर्वे. या विवाहानंतर पार्वतीबाईंच्याही आयुष्याला नवीन वळण लागले. या वेळी पार्वतीबाई पंचवीस वर्षांच्या होत्या. बायाच्या पुनर्विवाहाचा एक परिणाम म्हणजे देवरूखच्या माहेरच्या घरावर तत्कालीन समाजाने बहिष्कार टाकला. शेवटी गावच्या तीन देवळांच्या जीर्णोद्धाराकरिता वडिलांनी 100 रुपये दिल्यावर व ग्रामस्थांची क्षमा मागितल्यावर एक वर्षानंतर हा बहिष्कार उठला.

महर्षी कर्वे यांच्या मार्गदर्शनामुळे, मदतीमुळे व प्रोत्साहनाने पार्वतीबाईंच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. त्यांच्यात सामाजिक जाणीव उत्पन्न होऊन अनाथ-विधवा स्त्रियांसाठी काम करण्याची अनावर ओढ निर्माण झाली आणि त्यांनी स्वत:चं ध्येय निश्चित करून पुढील संपूर्ण आयुष्यच त्यासाठी सर्वाथाने समर्पित केले. त्या अनाथ बालिकाश्रमाच्या आजन्म सेविका बनल्या.
धाकटी बहीण बाया हिच्या पुनर्विवाहामुळे पार्वतीबाईंना देवरूख सोडून पुण्याला येण्याची संधी मिळाली. त्यांनी तेथे शिक्षण प्राप्त केल्यामुळे नवीन विचारांची ओळख होऊन त्या भारून गेल्या. त्यांचा जणू पुनर्जन्म झाला. हिंदुस्थान देश म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय व आपण राष्ट्रोद्धार करण्याकरिता काय केले पाहिजे, याविषयीच्या त्यांच्या कल्पना स्पष्ट होत गेल्या. विधवांच्या प्रश्नांसंबंधी, त्यांची स्थिती सुधारण्यासाठी तसंच केशवपनादी अनिष्ट रूढी घालविण्यासाठी, त्यासाठी होणारी सक्ती झुगारून देण्यासाठी कशा प्रकारे लढा दिला पाहिजे, कोणते प्रयत्न करावयास हवेत याविषयी त्यांनी मनाशी निश्चित आराखडे तयार केले. अनाथ बालिकाश्रमासाठी गावोगावी फिरून त्यांनी त्या काळी शेकडो रुपयांच्या देणग्या मिळविल्या. त्या काळात त्यांना वेगवेगळे अनुभव आले. अंतरीच्या उत्कट तळमळीमुळे त्यांचं वक्तृत्व प्रभावी व परिणामकारक होई. त्या श्रोत्यांची मने जिंकून घेत. अनेक सामाजिक परिषदांमधून त्यांनी भाग घेतला. प्रत्यक्ष कामाचा अनुभव देखील त्यांच्या गाठीशी भरपूर होता. विधवांची स्थिती समाजापुढे मांडून त्यांची उन्नती घडवून आणण्यासाठी त्या अक्षरश: झिजल्या. विधवांच्या वाट्याला येणार्‍या दयनीय अवस्थेचा त्यांना स्वत:लाच अनुभव असल्यामुळे त्यांच्या स्थितीविषयी बोलण्याचा त्यांनाच खरा अधिकार नव्हता का ? त्यांनी भारतातील विविध राज्यांतून केलेल्या भ्रमणाद्वारे त्यांचा अनेक विधवा व अनाथ स्त्रियांशी संपर्क आला, त्यांच्या अडचणी समजून घेता आल्या आणि त्या निवारण्यासाठी विविध उपायही त्यांनी योजिले. केशवपनाच्या अनिष्ट रूढीच्या स्वत: पार्वतीबाईदेखील एक बळी होत्या. त्यांनी स्वत: केस वाढवून या चालीला आळा घातला. त्यासाठी त्यांनी त्या वेळच्या रूढीप्रिय समाजाकडून कुचेष्टा, तर्कवितर्क व निंदा यांना तोंड दिलं. त्या स्वत:च्या विचारांवर व आचरणावर ठाम राहिल्या.

पार्वतीबाईंनी पुढाकार घेऊन त्यांच्या मुलाचा - नानाचा विवाह सन 1915 मध्ये त्याच्या वयाच्या 27 व्या वर्षी त्यांच्या परिचयातल्याच श्री. जोशी यांच्या 21 वर्षीय सई नावाच्या मुलीबरोबर लावून दिला. माहेरची सई जोशी आता लग्नानंतर सुशीला आठवले बनली. एका मोठ्या जबाबदारीतून त्या मोकळ्या झाल्या व पुन्हा आश्रमाच्याच कार्याला स्वत:स पूर्णपणे जुंपून घेतलं. 42व्या वर्षी त्या वांदर्‍याच्या कॉन्व्हेंट शाळेत जाऊन इंग्रजी शिकल्या. इतकंच नव्हे तर वयाच्या 45व्या वर्षी त्या अण्णासाहेब कर्वे यांच्या आग्रहामुळे व प्रोत्साहनामुळे अमेरिकेला रवाना झाल्या. हा खरं तर फार मोठा चमत्कारच होता. (तिकडे धर्मानंद कोसंबी यांची त्यांना खूप मदत झाली.) पी. अ‍ॅन्ड ओ. कंपनीच्या बोटीने त्या मुंबईहून हाँगकाँग व तेथून पुढे सॅन्फ्रान्सिस्को येथे अनेक दिवसांचा प्रवास करीत पोचल्या. अमेरिकेसारख्या परकी देशात गावोगावी त्यांना आलेले विलक्षण अनुभव आणि त्यांनी मोठ्या चिकाटीने तेथे केलेलं कार्य त्यांच्या ‘माझी कहाणी’या आत्मचरित्रात्मक मूळ पुस्तकातून वाचणे उद्बोधक व मनोरंजक ठरेल. तिकडे त्यांनी वेगवेगळ्या कुटुंबातून स्वयंपाकिणीचे काम केले, ते सांभाळून अनेक व्यक्ती, संस्था यांना भेटून आपलं हिंदुस्थानातील ‘अनाथ बालिकाश्रमा’चं कार्य समजावून देत. त्याकरिता देणग्या गोळा केल्या. वॉशिंग्टनमध्ये सन 1919 मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेत त्यांनी हिंदी स्त्री मजुरांच्या प्रतिनिधी म्हणून भाग घेतला, इतर समारंभातून वेळोवेळी विविध संस्था-क्लब यांच्या शेकडो सभासदांपुढे भाषणे करून महर्षी कर्वे यांच्या स्त्रीशिक्षण प्रसाराच्या व हिंगण्याच्या संस्थेची माहिती देऊन त्यासाठी त्यांनी अनेक देणग्या गोळा केल्या. पाच वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यात पार्वतीबाईंनी आश्रमासाठी हजारो रुपयांच्या देणग्या मिळविल्या आणि 20 एप्रिल 1920ला फाईव्हस्टार लाईनच्या ‘ऑलिंपिक’ बोटीने अमेरिकेहून स्वदेशी परतण्यासाठी निघाल्या व 15 जुलैला मुंबईस पोहोचल्या. पार्वतीबाईंना पॅरिस येथे डॉ. रवींद्रनाथ टागोर यांच्या भारत वासियांनी केलेल्या समारंभास उपस्थित राहण्याचं व त्यांचं भाषण ऐकण्याचं भाग्य लाभलं. इतकंच नव्हे तर त्यांना डॉ. रवींद्रनाथ टागोर व त्यांची सून यांच्याबरोबर मार्सेलिस ते मुंबईपर्यंत एकाच बोटीने 2 ते 15 जुलै प्रवास करण्याचा सुयोग प्राप्त झाला. त्यांच्याबरोबर काव्य-शास्त्र-विनोदांत तासन्तास वेळ आनंदात गेल्याचं त्यांनी लिहिलं आहे.

पार्वतीबाईंचे येथील समाज परिस्थितीसंबंधी विवाहपद्धतीविषयी, कुटुंब व्यवस्थेविषयी व एकूण समाजोन्नती विषयी विशेषत: अबलोन्नती विषयी स्वत:चे स्वतंत्र व सडेतोड विचार होते. ते त्या प्रसंगानुसार स्पष्टपणे व निर्भीडपणे मांडीत. हिंदुस्थानातील स्त्रीशिक्षणाला राष्ट्रीय वळण देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ‘केसरी’कारांनी देखील त्यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांच्याविषयी अत्यंत गौरवाने लिहिले आहे. सामाजिक परिषदेतील पार्वतीबाई आठवले यांच्या स्पष्ट व सडेतोड भाषणाविषयी ‘केसरी’कारांनी म्हटले आहे की, “सुधारणा ही इंग्रजी पेहरावात किंवा इंग्रजी थाटात नाही तर ती कृतीमध्ये आहे व अभागी स्त्रियांनी होता होईल तो संन्यासवृत्ती स्वीकारूनच आपल्या जीविताचे सार्थक करावे. असा जो श्रीमती पार्वतीबाईंनी आपल्या भगिनींस उपदेश केला तो जरी काही सुधारकांस पसंत पडला नाही. तरी सर्व समंजस आणि विचारी गृहस्थांना त्यातील सत्य व रहस्य ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ मान्य झालेच पाहिजे.” पार्वतीबाईंचा ‘केसरी’कारांनी केलेला हा गौरव योग्यच असून त्याद्वारे पार्वतीबाईंच मोठेपण व असामान्यत्व सिद्ध होत आहे.

पार्वतीबाईंनी आपलं आत्मचरित्रात्मक ‘माझी कहाणी’ हे पुस्तक स्त्रियांच्या व विशेषत: विधवांच्या उन्नतीसाठी खटपट करणार्‍या सर्व बंधु-भगिनींस अर्पण करून त्यांच्याविषयी आदर व प्रेम व्यक्त केले आहे. पार्वतीबाई आठवले यांच्यासारखी असामान्य धडाडीची बावन्नकशी अस्सल समाजसेविका पुढील पिढ्यांना सदैव आदरणीयच राहील.

शब्दांकन : क्रांतिसेन आठवले

प्राचार्य सदाशिव नथू आठवले


जीवनकाल 1923 ते 2001
वंशावळ संदर्भ : नागाव 1/7

अलिबागजवळील सातघर या खेड्यात दि. 3 मार्च 1923ला जन्मलेल्या सदाशिव नथू आठवले यांना 79 वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं. पुण्यात वृद्धापकाळाने दि. 8 डिसेंबर 2001ला बेशुद्धावस्थेत त्यांचं निधन झालं. मुंबई विद्यापीठातून एम. ए. पदवी संपादन केल्यावर त्यांनी 1946 मध्ये पुण्याच्या स. प. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कामास प्रारंभ केला. कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातही त्यांनी इतिहास व राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. सोळा वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्यावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या आग्रहावरून एल्फिन्स्टन कॉलेजमधील नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला आणि सन 1963 मध्ये वाईच्या ‘मराठी विश्वकोश निर्मिती’ कार्यात ते सहभागी झाले. येथे त्यांनी प्रभारी विभाग संपादक म्हणून आठ वर्षे काम केले. तेथे मतभेद झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व सन 1971 मध्ये ते पुन्हा अध्यापनाकडे वळले. कुर्डुवाडी व अहमदनगर येथील महाविद्यालयात त्यांनी प्राचार्यपद भूषविले. अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयातून सन 1982 मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी पूर्णत: इतिहास संशोधनाच्या कार्याला स्वत:स वाहून घेतले. त्यानंतर अखेरपर्यंत ते पुण्यातच वास्तव्यास होते.

विपुल लेखन व ग्रंथनिर्मिती :-
प्रा. सदाशिव आठवले यांनी राज्यशास्त्र व इतिहास या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांनी मराठी व इंग्रजीतून अनेक ग्रंथ लिहिले. ‘लोकशाहीचा कारभार’ आणि ‘लोकमत’ ही त्यांची राज्यशास्त्रावरील पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे चार्वाक, इतिहासाचे तत्त्वज्ञान, शिवाजी आणि शिवयुग, मराठी सत्तेचा विकास आणि र्‍हास, नाना फडणीस आणि इंग्रज, रामशास्त्री प्रभुणे, सरदार बापू गोखले, उमाजी राजे - मुक्काम डोंगर, दारा शुकोव्ह, केमाल पाशा, आधुनिक जग, अर्वाचीन युरोप, हिंगणे दप्तर, शिंदेशाही इतिहासाची साधने, जॉर्ज वॉशिंग्टन, जगद्गुरु इब्राहिम आदिलशहा, रामायण, महाभारत, ऐका भाऊबंदांनो तुमची कहाणी, तुळशीबागवाले दप्तर, विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय, कृष्ण, बुंदेलखंडाचा महाराज छत्रसाल अशी इतिहासावरील तेवीस पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेल्या चार्वाक, इतिहासाचे तत्त्वज्ञान आणि सरदार बापू गोखले या तीन पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. सरदार गोखले यांच्यावरील त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला केसरी-मराठा संस्थेनेही पुरस्कार देऊन गौरविले आहे. प्रा. सदाशिव आठवले यांनी इंग्रजीतूनही सुमारे 25 शोध निबंध लिहिले आहेत. त्यांची ललित लेखनही भरपूर केले असून त्यांचे बारा कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

प्रा. सदाशिव आठवले यांची इतिहास लेखनविषयक अत्यंत वस्तुनिष्ठ अशी चिकित्सक दृष्टी होती. संस्कृत साहित्यकार कल्हण याच्या ‘ना मूलं लिख्यते किंचित्’ (पुराव्याशिवाय काहीही लिहिणार नाही) उक्तीप्रमाणे ते लेखन करीत. त्यामुळे स्पष्टवक्तेपणा नि परखडपणा हे त्यांच्या स्वभावाचे नि लेखनाचे विशेष पैलू होते. म्हणूनच नाना फडणीसांवर त्यांनी संशोधनपूर्वक लिहिलेल्या प्रबंधासंबंधात त्यांनी काढलेल्या अनुमानविषयक मतांमध्ये तत्कालीन परीक्षकांनी बदल करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी त्यास स्पष्टपणे नकार दिला व पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी नाकारली. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात साप्ताहिक - मासिक चर्चासत्रातून भाग घेऊन त्यांनी अनेक शोध निबंध वाचले. प्रा. ग. ह. खरे यांच्या निधनानंतर (1985) काही वर्षे त्यांनी मंडळाचे कार्याध्यक्षपद भूषविले.

प्रा. आठवले यांना 1986 मध्ये हृदयविकाराचा त्रास सुरु झाला. पुढे त्यांची दृष्टी अधू झाली. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. तरीही जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांचे संशोधन - लेखनाचे कार्य धीमेपणाने का होईना पण अखंडपणे चालू होते.
आठवले कुलाला भूषण ठरावे असं प्रा. सदाशिव नथू आठवले यांचं व्यक्तिमत्त्व नि कार्य कर्तृत्व होतं.

शांताराम गोविंद आठवले


सिनेश्रेष्ठ व कवी
जीवनकाल: 1910 ते 1975
वंशावळ संदर्भ : सोमेश्वर 16

शान्ताराम आठवले यांचा जन्म 21 जानेवारी 1910 ला पुण्याला - कसबा गणपतीजवळच्या सरदार शितोळे यांच्या वाड्यात झाला.
शान्तारामांचे वडील गोविंद हे ग्वाल्हेरच्या सरदार शितोळ्यांचे पुण्यातले कारभारी होते. त्यांचा आवाज सुरेल होता आणि संगीताची त्यांना विलक्षण ओढ होती. त्यांनी लळितं केली आणि लावणी गाण्यांत प्रावीण्य मिळवलं. त्यांचं वाचन दांडगं होतं. एखाद्या कसलेल्या नटाप्रमाणे स्वच्छ, रसानुकूल आणि नादमय अशी त्यांची वाचनशैली होती.

शान्तारामांची आई गंगा ही साक्षर नव्हती पण सुसंस्कृत होती. तिला लिहिता वाचता येत नव्हते पण तिच्या जिभेवर साक्षात सरस्वती होती. जुन्या ओव्या, घरगुती पारमार्थिक गाणी यांचा न संपणारा साठाच तिच्याजवळ होता. शब्द आणि भाव यांचं नातं इथेच केव्हातरी त्यांच्या मनात रूजलं असावं.

शान्तारामांचे शालेय शिक्षण पुण्याच्या भावे स्कूलमधे झाले. शाळेत असताना कला आणि साहित्य ही दोन्ही क्षेत्रं त्यांनी गाजवली. शाळेत असतानाच त्यांच्या कविता नियतकालिकांमधून प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. वाचन व लिखाणाबरोबरच अभिनय आणि दिग्दर्शनाची क्षेत्रंही यशस्वितेनं पादाक्रान्त करण्याचं भाग्य शान्तारामांना लाभलं. हस्तलिखितं, मासिकं, वक्तृत्त्वसभा जशा त्यांनी गाजविल्या तशी शाळेच्या संमेलनांत बेबंदशाही, शिवसंभव यासारखी सरस नाटकंही त्यांनी रंगभूमीवर आणली, दिग्दर्शित केली, त्यांत भूमिकाही केल्या.

1929 साली वडिलांना पक्षाघात झाला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. 1930 साली शान्ताराम मॅट्रिक झाले. 1931 साली आठवले कुटुंब पुण्याहून थेऊर जवळच्या कोलवडीला आलं.

सुप्रसिद्ध कादंबरीकार ना. ह. आपटे यांची आणि शान्तारामांची पत्रमैत्री होती. आपट्यांच्याच विनंतीवरुन त्यांच्या मधुकर मासिकाचं काम आणि मुद्रणालयाची व्यवस्था पहाण्यासाठी त्यांचा सहाय्यक म्हणून शान्तारामांनी काम स्वीकारलं आणि कोलवडीला राम राम ठोकून कोरेगांव गाठलं.

प्रभात फिल्म कंपनीने चित्रपटाच्या कथेसाठी ना. ह. आपटे यांना पाचारण केलं. त्यांच्या ‘भाग्यश्री’ या कादंबरीवर आधारित ‘अमृतमंथन’ या चित्रपटाचं काम सुरु झालं. शान्तारामांची साधी सोपी काव्यरचना आपट्यांना प्रभावित करून गेली होतीच. त्यामुळे अमृतमंथनच्या पद्य लेखनासाठी त्यांनी साहजिकच शान्तारामांचं नांव सुचवलं आणि 1 जानेवारी 1935 रोजी शान्ताराम आठवले प्रभात फिल्म कंपनीत रूजू झाले.

1939 साली शान्तारामांचा विवाह रामदुर्गच्या लीला सहस्त्रबुद्धे यांच्याशी झाला. दोन मुली - मंगला, अभया आणि मुलगा - सुदर्शन ह्या चिमण्यांनी घरटं गजबजून गेलं. शान्तारामांच्या पत्नी लीलाबाई उर्फ ‘सुमती’ खरोखरीच ‘सु मती’ होत्या. आपल्या पतीच्या कर्तबगारीचा त्यांना सार्थ अभिमान होता. बर्‍या वाईट परिस्थितीत सुमतीबाईंनी अतिशय समर्थपणे घर सांभाळले. सुमतीबाई हे त्यांच्या प्रतिभेच्या पंखातलं बळ होतं.

प्रभात फिल्म कंपनीच्या अमृतमंथन, संत तुकाराम, कुंकू, गोपाळकृष्ण, माझा मुलगा, संत ज्ञानेश्वर, शेजारी, दहा वाजता, संत सखू आणि रामशास्त्री यासारख्या नितांतसुंदर चित्रपटांनी रसिकांना नेहमीच मोहित केले आहे. या चित्रपटांचे एक शक्तिस्थान होते - शान्ताराम आठवले यांची सहज, सोपी, अर्थवाही गीते ! रंगभूमीच्या वर्चस्वाखाली असलेले चित्रपट जसे हळूहळू प्रभातच्या संस्थापकांनी समाजाभिमुख केले तसेच संस्कृतप्रचुर क्लिष्ट गीतांनाही साध्या सोप्या भावगीतांचे रूप मिळाले. आधी बीज एकले, लखलख चंदेरी, भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, मन सुद्ध तुझं, दोन घडीचा डाव यासारखी गीते घराघरांचे दरवाजे उघडून अंगणा - परसातून, माजघरांत, शेजघरांत एवढेच नव्हे तर देवघरांतही पोचली. स्त्री-पुरुष, आबाल-वृद्ध सर्वांच्या ओठांवरून हृदयांत जाऊन बसली.

ग. दि. माडगूळकर चित्रपटक्षेत्रांत आले त्यावेळी त्यांच्यासमोर असलेला आदर्श होता तो शान्ताराम आठवल्यांचा !
‘प्रभात चित्रांचा गीतकार’ ही शान्ताराम आठवल्यांची महत्त्वाची पण अपूर्ण ओळख आहे. प्रभात सोडल्यानंतर त्यांनी स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांखेरीज ‘श्रीगुरुदेव दत्त’, ‘झंझावात’, ‘संत भानुदास’, ‘मर्द मराठा’, ‘बेलभंडार’, ‘गोकुळचा राजा’, ‘विठ्ठलपायी’, ‘सुभद्राहरण’ अशा अनेक चित्रपटांसाठी तीनशेहून अधिक चित्रपटगीते लिहिली. त्यांच्या गीतांना सुधीर फडके, राम कदम, दत्ता डावजेकर, स्नेहल भाटकर, वसंत पवार, पु. ल. देशपांडे अशा अनेक संगीतकारांनी संगीत दिलं.
चित्रपटगीतांव्यतिरिक्तही त्यांनी अनेक भावगीते, कविता लिहिल्या. त्यांचे ‘एकले बीज’, ‘बीजांकुर’ हे कवितासंग्रहही प्रसिद्ध झाले. सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनांतील ‘साध्या विषयांत मोठा आशय’ शोधणार्‍या, वर्मावर बोट ठेवून, गुदगुल्या करणार्‍या नर्म, विनोदी कविता हे त्यांचे खास वैशिष्ट्य. त्यांच्या अशा अनेक कविता त्या काळांत नियतकालिकातून, मासिकांमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत.

कवी - गीतकार हा त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू आहे. चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक, नट, अध्यात्म, ज्योतिष, ज्ञानेश्वरी, शास्त्रीय दृष्टिकोनातून भारतीय संस्कृती, यासारख्या विषयांचा गाढा अभ्यासक, प्रवचनकार आणि एक सज्जन, सहृदय सुहृद - असे त्यांचे इतर पैलू तितकेच तेजस्वी - लखलखीत आहेत. निवडलेल्या प्रत्येक कार्यक्षेत्रांत त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. प्रभातमध्ये गीतलेखन करीत असताना चित्रपटकथेची निवड, तिचं वाचन, पटकथा लेखन, संवाद, प्रत्यक्ष चित्रीकरण, दिग्दर्शन, संकलन, इतकंच नव्हे तर वितरण, जाहिरात या सर्व प्रांतात त्यांना काम करायला मिळालं. नवनव्या संधी मिळवता आल्या. त्यातून त्यांचा अनुभव समृद्ध होत गेला.

प्रभात सोडल्यानंतर, 1942 च्या भूमिगत क्रान्तिकारकांच्या चळवळीवर आधारित, त्यांनी ‘भाग्यरेखा’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. पु. ल. देशपांडे नायक आणि शान्ता आपटे नायिका असलेल्या या चित्रपटाचे पद्यलेखन आणि दिग्दर्शनही शान्ताराम आठवल्यांचेच होते. ना. ह. आपटे यांच्या कथे वरील या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य असे होते की याच्या निर्मिती साठी त्यांनी ‘भारत चित्र दर्शन’ नांवाची सहकारी संस्था स्थापन केली होती आणि सुप्रसिद्ध साहित्यिक तात्यासाहेब केळकर हे त्या संस्थेचे एक ठेवीदार होते. (1947-1948)

‘वहिनींच्या बांगड्या’ या पंचवीस चित्रगृहांत रौप्यमहोत्सव साजरा केलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि पद्यलेखन त्यांनी केले. हा चित्रपट मुहुर्तापासून सेन्सॉर सर्टिफिकिटापर्यंत केवळ पस्तीस दिवसांत पूर्ण केला होता. या चित्रपटाद्वारे त्यांनी सुलोचना या अभिनेत्रीला तमाशाच्या फडातून गृहस्थाच्या घरांत आणले. त्यातील ‘तू नसतीस तर’ यासारखी सुधीर फडके यांनी संगीत दिलेली गीते अजूनही रसिकांच्या स्मरणांत आहेत. या चित्रपटांत त्यांनी स्वत: अभिनयही केला होता. (1952)


ना. ह. आपटे यांच्या ‘कलंकशोभा’ या कादंबरीवर आधारित ‘संसार करायचाय मला’ या चित्रपटाची ‘चित्रगंगा’ या स्वत:च्या संस्थेतर्फे त्यांनी निर्मिती, दिग्दर्शन व पद्यलेखन केले. राम कदम यांचे संगीत असलेल्या या चित्रपटांत वेश्याविवाह हा सामाजिक प्रश्न हाताळला होता. बेबी शकुंतला या चित्रपटाची नायिका होती. (1953)
‘शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या चित्रपटाला जर्मनीतील कान्स चित्रपट महोत्सवांत ‘क्रिटिक अ‍ॅवॉर्ड’ने गौरविले गेले होते. मराठी चित्रपटाला हा आंतरराष्ट्रीय बहुमान बहुदा पहिल्यांदाच मिळाला होता. यातील ‘सुख देवासी मागावे’ ही प्रार्थना शांताराम आठवले यांचे परिणामकारक शब्द आणि सुधीर फडके यांच्या संगीताने संस्मरणीय ठरली. (1954)

‘फिल्मिस्तान’ या हिंदी चित्रपट निर्माण करणार्‍या प्रसिद्ध संस्थेतर्फे बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्या संयुक्त मानापमानाच्या पार्श्वभूमीवरील, नाट्यसृष्टीचे वैभव पडद्यावर आणणारा ‘पडदा’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. बाळ कोल्हटकरांची पटकथा असलेली गायक अभिनेता आणि अभिनेत्री यांची ही एक अनोखी प्रेमकहाणी होती. (1956)
‘फिल्म डिव्हिजन’ मध्ये काम करताना त्यांनी राजस्थानातील पाणीप्रश्नावर आणि आसामच्या लोकगीतांवर अप्रतिम अशा डॉक्युमेन्टरीज् बनवल्या. (1960 - 1964)

शंकर पाटील यांच्या कथेवर आधारित ‘वावटळ’ या त्यांच्या ग्रामीण पण तमाशा नसलेल्या चित्रपटाला पु. ल. देशपांडे, विश्राम बेडेकर आणि गजानन जहागिरदार यासारख्या परीक्षक मंडळाने महाराष्ट्र सरकारची दहा अ‍ॅवॉर्डस् देऊन गौरविले. (1965)
चित्रपटक्षेत्रांत असतानाही साहित्याशी त्यांची जवळीक तर होतीच पण शब्दांशी क्रीडा करताना ‘शब्दांच्या पलिकडले’ असे काही त्यांना आकर्षित करीत होते. सन्त वाङ्मयाचा अभ्यास आणि हे कुतूहल यातून अध्यात्माकडे ते आकर्षित झाले. ज्ञानेश्वरीची पारायणे हा त्यांचा पहाटेचा आवडता उद्योग होता. आयुष्यातील चढउताराकडे तटस्थपणे पाहातानाही या मागच्या शक्तीची त्यांना जाणीव होती. त्यातून त्यांनी ज्योतिष्याचाही अभ्यास केला. या सर्वांचा परिपाक म्हणजे त्या त्या क्षेत्रातील संदर्भग्रंथ ठरावेत अशा पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. ‘शांताचिया घरा’, ‘साधा विषय मोठा आशय’, ‘सुखाची लिपी’, ‘बकुळफुले’, ‘ओंकार रहस्य’, ‘कुंडलिनी जगदंबा’, ‘नाडीग्रंथ एक अभ्यास’, ‘ज्ञानदेवीची आराधना’ या सारखी दहाहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली.
प्रभात फिल्म कंपनीबद्दल अनेक पुस्तके, डॉक्युमेंटरीज आणि इतर माध्यमातून माहिती उपलब्ध आहे. पण त्या सगळ्यापेक्षा स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेल्या घडामोडी प्रांजळपणे, स्पष्टवक्तेपणाने आणि सत्य न लपवता लिहिलेले शान्ताराम आठवले यांचे ‘प्रभातकाल’ हे पुस्तक वेगळे आणि महत्त्वपूर्ण ठरले आहे.

हे पुस्तकातील ज्ञानभांडार लोकांना खुले व्हावे यासाठी त्यांनी संपूर्ण देशभर प्रवचने दिली. पुण्यातील कबीरबागेसारख्या संस्थांनी त्यांची व्याख्याने आयोजित करून अभ्यासूंना मोलाचे मार्गदर्शन केले.

लहान मुलार्ंवर नितांत प्रेम करणारे शान्ताराम आठवले त्यांच्यासाठी ‘तात्या’ होते. त्यांची बालगीते आणि छोट्यांसाठीच्या गोष्टी पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाल्या आहेत. धोतराचा सोगा खांद्यावर टाकून शेजारपाजारच्या एखाद्या मुलाला स्वरचित बालगीत म्हणून खेळवणारे, आपले हजारो चहाते, हितचिंतक, मित्र यांना प्रत्येक दीपावलीला काव्यभेट पाठवणारे शान्ताराम आठवले - हा सहृदय, भावूक माणूसही कित्येकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा हिस्सा बनले आहेत.

या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाने मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी माणसांना जे काही अलौकिक दिले त्याची थोडीशी उतराई व्हावे अशा उद्देशाने  त्यांच्या कुटुंबियांनी ‘याला जीवन ऐसे नांव’ या नांवाचा एक कार्यक्रम नुकताच सादर केला. या कार्यक्रमाच्या पुन:प्रत्ययाचा आनंद रसिकांना मिळत राहावा, नवीन पिढीलाही मागील संचिताचा लाभ होत रहावा यासाठी या कार्यक्रमाची व्हीसीडी ही तयार केली गेली आहे. फाउंटन म्युझिक कंपनीने वितरित केलेली ही व्हीसीडी सर्वत्र उपलब्ध आहे.

उत्तुंग कल्पनाशक्ती, ज्ञानाची खोली, आणि चौफेर अनुभव यामुळे शान्तारामांचे संवेदनाक्षम व्यक्तिमत्त्व प्रत्येकाला आकर्षित करीत असे. त्यांच्या सहवासांत समई सारखा शांत प्रकाश, चंदनासारखा मंद, मोहक सुगंध आणि निरलस आनंद मिळत असे. किती तरी लोकांची आयुष्यं त्यांच्या संपर्कात येऊन उजळली, उमलली, दरवळली.

कालपटावर स्वत:च्या कर्तृत्त्वाचा स्वतंत्र ठसा उमटवून शांताराम आठवले दि. 2 मे 1975 ला इहलोकींची यात्रा संपवून वयाच्या 66 व्या वर्षी शांत मनाने नि कृतार्थतेच्या समाधानात पंचत्त्वात विलीन झाले !

शब्दांकन: सुदर्शन शांताराम आठवले

नारायण विष्णु आठवले


स्वातंत्र्यप्रेमी बंडखोर व्यक्तिमत्त्व
जीवनकाल: 1909 ते 2006
वंशावळ संदर्भ: सोमेश्वर 22

प्रखर देशभक्ती आणि निरपेक्ष सेवावृत्ती यांचा मनोज्ञ संगम झालेले बंडखोर व्यक्तिमत्त्व म्हणून नारायण विष्णु आठवले यांचा अभिमानपूर्वक उल्लेख करावा लागेल. रायगड जिल्ह्यातील (पूर्वीचा कुलाबा जिल्हा) खालापूर तालुक्यातील ‘आतकर गाव’ या छोट्याशा खेडेगावात दिनांक 7 मार्च 1909 ला श्री. ना. वि. यांचा जन्म झाला. वास्तविक ना. वि. यांचं कुटुंब सधन होतं. परंतु लहान वयातच आईवडिलांचं छत्र हरपल्यामुळे ते पोरके झाले. ते अवघे पाच वर्षांचे असतानाच सन 1913 मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीने त्यांच्या आई वडिलांचा बळी घेतला. तर काकांच्या स्वार्थी कारवायांमुळे ना. वि. यांना घरून कोणताच आधार मिळाला नाही. त्यामुळे त्यांना सन 1923 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी स्वत:चे वडिलोपार्जित उत्तम स्थितीतले घर सोडावे लागले. घर सोडून ते आपल्या आजोळी सांगलीला आले. तेथे त्यांचे मामा एक बडे आसामी होते. ना. वि. यांना मामाचा आधार लाभला. वास्तविक ना. वि. यांचे वडील विष्णुपंत हे सुधारक वृत्तीचे. स्पृश्य-अस्पृश्य हा भेद न पाळणारे. महार-चांभार यांना अनेक परींनी सतत मदत करणारे. त्यामुळे ना. वि. यांचे मामा म्हणजेच वडिलांचे मेहुणे यांचे त्यांच्याशी पटत नसे. त्यांना वाळीत टाकण्याची धमकी मिळत असे. अखेर वडिलांनी सांगली सोडण्याचा निर्णय घेऊन ते आपल्या कुटुंबियांसह रायगड जिल्ह्यात आतकर गावी येऊन राहिले. पण दैवाचा फेरा असा की पुढे त्यांच्या मुलावरच (ना. वि. यांच्यावर) आतगाव सोडून सांगलीला मामांच्या आश्रयास येण्याची वेळ आली.

नारायणरावांनी शालेय शिक्षण सांगलीला पूर्ण केले. तेथे तेव्हा कॉलेज नसल्याने कोल्हापूरातील राजाराम कॉलेजात दाखल होऊन तेथून ते सन 1935 मध्ये बी. एस्सी. ही पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलास त्या काळी चांगल्या पगाराची खासगी किंवा सरकारी नोकरी मिळणे सहज शक्य होते. परंतु नारायणरावांची वृत्ती नोकरी करण्याची नव्हती तर स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय करावा याकडे त्यांचा ओढा होता. त्यांचे एक मेहुणे सांगलीला होते. त्यांच्याकडून त्यांना तेव्हा साठ रुपयांची मदत मिळाली. त्या पैशात त्यांनी परदेशात प्रसिद्ध होणारी पुस्तके-मासिके विकण्याचा उद्योग पुण्याच्या प्रसिद्ध लक्ष्मी रोडवर प्रथम रस्त्याच्या कडेलाच सुरु केला. काही दिवसांनी त्यांचे एक सुहृद श्री. आगाशे यांनी आपल्या घराची पडवी नारायणरावांना पुस्तके विकण्यासाठी काहीही भाडे न आकारता उपलब्ध करून दिली. पुढे या पुस्तक विक्रीच्या धंद्याला - व्यवसायाला नारायणरावांनी त्याचा अधिक मोठ्या जागेत विस्तार करीत समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. श्री. आगाशे यांच्या पुढील पिढ्यांशीदेखील नारायणरावांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते.

दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर त्याचा नारायणरावांच्या पुस्तक विक्रीच्या या धंद्यावर विपरीत परिणाम होऊ लागला. परदेशातून येणारी मासिके-पुस्तके बंद झाली. धंद्यामध्ये तोटा येऊ लागला. अखेर नाइलाजाने हा व्यवसाय त्यांना बंद करावा लागला.
पण या महायुद्धाच्या धामधुमीच्या काळात नारायणरावांपुढे नोकरीची एक चांगली संधी चालून आली. पुण्याजवळील देहू रोड येथील दारू-गोळ्याच्या कोठारात त्यांना नोकरी मिळाली.

दरम्यान नारायणरावांची मामेबहीण कु. इंदुमती गोखले हिच्याशी जून 1939 मध्ये त्यांचा विवाह झाला. पदवीधर असलेला मुलगा नोकरी न करिता पुस्तक-विक्रीचा व्यवसाय रस्त्याच्या कडेला सुरू करून बेभरवंशी जीवनक्रम अनुसरतो पण तरीही त्या मुलाशी विवाह करण्याचा निश्चय करून त्याच्यामागे ठाम उभं राहण्याचा कु. इंदुमतीचा निर्णय खरोखरच धाडसाचा व कौतुकास्पद म्हणावयास हवा. परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेली इंदुमती नारायणरावांशी विवाहबद्ध झाली आणि पुण्याच्या ससून रुग्णालयात 34 वर्षे परिचारिकेची नोकरी करून नारायणरावांच्या संसाराला तिने भक्कम आर्थिक पाठबळ दिले आणि त्यांचा संसार यशस्वी केला. कर्तृत्ववान, बुद्धिमान आणि पराक्रमी पुरुषाच्या यशस्वी जीवनाची प्रमुख भागीदार त्याच्यामागे समर्थपणे साथ देणारी त्याची सहधर्मचारिणी - पत्नी असते ही गोष्ट नारायणरावांच्या पत्नीने - इंदुमती - हिने आपल्या उदात्त वर्तनाने सिद्ध केली.

नारायणरावांना देहू रोड येथील लष्कराच्या दारू गोळा गोदामात नोकरी मिळाली खरी. पण पुढे तीच त्यांच्यावर कोसळलेल्या संकटांना कारणीभूत ठरली. कारण ब्रिटिश राज्यकर्ते त्यांच्या येथील रयतेवर अविश्वास दाखवितात ही गोष्ट नारायणरावांच्या त्या नोकरीच्या ठिकाणीच प्रत्ययास आली. सैनिकांना दिलेली बंदूक व काडतुसे एकमेकांना जुळत नाहीत ही गोष्ट नारायणरावांच्या ते शास्त्र शाखेचे पदवीधर असल्याने लक्षात आली. सरकारने केवळ दाखविण्याकरिता सशस्त्र असल्याची सैनिकांची समजूत करून दिली, पण प्रत्यक्षात त्या शस्त्राचा कोणताही उपयोग करिता येऊ नये अशी प्रत्यक्ष योजना होती. नारायणरावांनी ही गोष्ट - सरकारचा हा कुटिल डाव - संबंधित कर्मचार्‍यांच्या व सैनिकांच्या समर्थपणे पटवून लक्षात आणून दिला. नारायणरावांचा मूळ पिंड देशभक्ताचा. त्यामुळे परकी ब्रिटिश सरकारविरुद्ध त्यांच्या मनात असंतोष होताच. पण ते सारासार विचार करणारे असल्यामुळे पाच-पन्नास ब्रिटिश अधिकारी मारून ब्रिटिश सरकार येथून जाणार नाही. उलट त्यांचे येथील अत्याचार वाढतील, त्याऐवजी आपल्या ताब्यात असलेले स्फोटक साहित्य कुणाच्याही हाती न लागू देता आपण स्फोट करून ते नष्ट केल्यास त्यायोगे सरकारचे नुकसान करणे अधिक योग्य होईल हा विचार नारायणरावांनी मनाशी पक्का केला. त्यानुसार नारायणरावांनी हाताखालच्या काही कर्मचार्‍यांना व सैनिकांना फितवून त्यांचे सहकार्याने त्या काळी गोदामातील सुमारे एक कोटी रुपये किंमतीचा दारूगोळा स्फोट करून निकामी केला. यामध्ये नारायणरावांची दूरदृष्टी दिसून येते. परंतु दुर्दैवाने त्याच सुमारास पुण्यातील सुप्रसिद्ध कॅपिटॉल थिएटरमध्ये स्फोट घडवून आणून ब्रिटिशांचे पाच-पंचवीस अधिकारी मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्या स्फोटासाठीचे साहित्य दारुगोळ्याच्या गोदामातून नारायणरावांच्या हाताखालच्या लोकांच्या अनवधानाने पुरविले गेले होते. अर्थात् त्यामुळे ब्रिटिश सरकारला त्याचा धक्का न बसता ते आणखी अत्याचारास प्रवृत्त होईल ही नारायणरावांना खात्री असल्याने त्यांनी एका जबाबदार व्यक्तीकडे त्या प्रकाराविषयी आपली नापसंती व्यक्त केली होती.

याच सुमारास महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ची हाक देशाला देऊन स्वातंत्र्यलढ्याला नवीन वळण लावले होते. त्यांनी बारा कलमी कार्यक्रम देशबांधवांपुढे ठेवला. त्यात एक कलम असं होतं की ब्रिटिश सरकारच्या नोकरीतील लोकांनी आपली नोकरी न सोडता नोकरीच्या ठिकाणीच राहून शक्य त्या सर्व जागी घोटाळे निर्माण करून ब्रिटिश सरकारच्या युद्धप्रयत्नांना खीळ घालावी व अडथळे निर्माण करावेत. या कलमामुळे श्री. नारायणराव आठवले यांचा हुरूप वाढला. त्यांना देशकार्याची एक नवी दिशा मिळाली. त्यामुळे त्यांनी शक्य तितके नामानिराळे राहून त्या गोदामातून ब्रिटिश व दोस्त राष्ट्रांच्या युद्ध भूमीवर जाणार्‍या दारूगोळ्याच्या सामानात जितका गोंधळ निर्माण करता येईल तितका प्रयत्नपूर्वक केला. या प्रयत्नांमध्ये नारायणरावांना त्यांच्यासमवेत व हाताखाली काम करणार्‍या लोकांनी स्वेच्छेने दिलेलं सहकार्य नि साथ खूपच मोलाची होती.

अर्थातच ब्रिटिश सरकार काही झोपलेले नव्हते. कॅपिटल थिएटर मधील सुप्रसिद्ध बॉम्ब स्फोट खटल्यात नारायणराव एक आरोपी म्हणून पकडले गेले. इतकंच नव्हे तर त्या खटल्यात त्यांना गुन्हेगार ठरवून देहान्ताची शिक्षा पुकारली गेली. त्यांना फाशी दिलं जाणार हे नक्की झालं. परंतु इथेही त्यांच्या पूर्वजांची नि पत्नीची पुण्याई त्यांच्या कामी आली. शिक्षा देण्याच्या पद्धतीतील काही तांत्रिक दोषामुळे त्यांची फाशी अंमलात येऊ शकली नाही. फाशी टळली तरी 1939 ते 1943 असा साडेचार वर्षांचा कारावास मात्र त्यांना भोगावा लागला. नारायणराव आठवले यांचा ब्रिटिश अधिकार्‍यांनी एवढा धसका घेतला होता की त्यांना कोणत्याही एका तुरुंगात तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवायचे नाही अशी सक्त ताकीद तुरुंगाधिकार्‍यांना दिली होती.
नारायणरावांच्या तुरुंगातील विधायक कार्याद्वारे त्यांच्या विधायक दृष्टिकोनाचे दर्शन तुरुंगाधिकार्‍यांना सतत घडत असे. त्यांनी त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. तुरुंगातील विविध कैद्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची गार्‍हाणी - तक्रारी नारायणरावांनी तुरुंगाधिकार्‍यांसमोर लिखित स्वरूपात मांडल्या व त्यांचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी योगदान दिले.

नारायणरावांची कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर ते स्वस्थ बसले नाहीत. ते शास्त्राचे पदवीधर होतेच. त्या काळात भारतात कपडे रंगविण्याचे पक्के सिंथेटिक कलर्स बनविण्याचे ज्ञान फारच थोड्या लोकांना होते. नारायणरावांना ते ज्ञान असल्यामुळे त्यांनी ती संधी साधली. ते मुंबईस गेले. तेथे त्यांनी राहत्या घरातच एक प्रयोगशाळा सुरु करून असा रंग भारतात प्रथमच तयार केला. प्रसिद्ध उद्योगपती श्री. अरविंद मफतलाल यांना हे संशोधन आवडल्याने त्यांनी नारायणरावांना भरपूर आर्थिक मदत केली. इतकंच नव्हे तर रंग तयार करण्याचा कारखाना सुरु करून त्याच्या प्रमुखपदी नारायणरावांची नेमणूक केली. काही काळ त्यांनी तेथे काम केल्यावर आपल्या निरीच्छ स्वभावामुळे आणि तरुणांना संधी देण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांनी ते भरपूर उत्पन्नाचे पदही सोडले. इतकेच नव्हे तर त्यांनी थोडा वेळ सल्लागार म्हणून काम करून भल्या मोठ्या रकमेचे मानधनही घेण्याचे नम्रपणे नाकारले.

नारायणरावांची ही असामान्य जीवनगाथा चालूच आहेत. आज ते शंभरीच्या जवळ आले आहेत. वयोमानानुसार गात्रे थकली आहेत. त्यांच्या मनात स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे प्रायोपवेशनाचे विचार अधून मधून येतात. या विषयावर त्यांची स्वातंत्र्यवीरांबरोबर चर्चाही झाल्याचं ते सांगतात. पण सुदृढ शरीर व मन प्रायोपवेशनास साथ देईल की नाही याची शंका वाटल्याने त्यांनी तो विचार सोडून दिला. भारताला स्वातंत्र्यप्राप्ती झाली. त्या चळवळीत आपलं अल्प योगदान देता आलं याचं नारायणरावांना समाधान आहे. त्यातच आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं ते मानतात.

देशभक्त नारायण विष्णु आठवले यांना त्यांच्या असामान्य कार्यासाठी विनम्र अभिवादन !
शब्दांकन : क्रांतिसेन आठवले

प्राचार्य अंनत दामोदर आठवले तथा स्वामी वरदानंद भारती


जीवनकाल 1920 ते 2002
वंशावळ संदर्भ : गुहागर 1/7

प्राचार्य अनंतराव आठवले यांचे घराणे गुहागरचे. वडील दामोदर पंत. श्री. वामनरावांना दोन मुले एक दामोदर व दुसरा रामचंद्र. वामनरावांचे मुलांच्या बालपणीच निधन झाल्याने व दारिद्रयामुळे मुले पुण्यात येऊन रोजगार बघू लागली. थोरला राम भावाकडे फार लक्ष देत नसे. दामोदर वेदपाठशाळेत शिके, पूजाअर्चा करून माधुकरी मागत असे. एकदा एका टांगेवाल्याचा विटाळ झाल्याने एका वाड्यापाशी स्वारी रडत बसली. त्या वाड्यात काही कामानिमित्त महाराष्ट्रातील विख्यात संतचरित्रकार श्री दासगणू महाराज येत. त्यांनी ते पाहिले. चौकशीत कळलेल्या माहीतीने व्यथित झालेल्या त्यांनी या संस्कारक्षम लेकराला आपल्याबरोबर पंढरीस नेले. पुत्रवत् त्याचे पालन केले.

दामोदर सुरेख दिसे, बुद्धिमान होता, आवाजही गोड होता. पाठांतर शक्ती जबर होती. वेदविद्येसह दासगणूंच्या कीर्तन विद्येचाही त्याने व्यासंग केला. परिवारात तो लोकप्रिय झाला. ‘दामूने मला पुढे आणले’ असे दासगणू महाराज म्हणत असत. ‘समर्थ गणुदास तो गुरुपिताच मी वंदितो’ असे स्तोत्रही त्याने केले होते. 1914 साली सांगोल्याचे देवी डॉक्टर श्रीपादराव महाबळ यांची कन्या कमळा हिच्याशी त्यांचा विवाह झाला. नववधूचे नाव ‘राधा’ ठेविले गेले.

सौ. राधा दामोदर यांचा पाच अपत्ये झाली. तीन अल्पवयातच गेली. दोन राहिली. पैकी एक अनंता व दुसरी मुलगी गंगू ! दामोदर पंतांना पुढे क्षयबाधा झाली व 1925 च्या पौष महिन्यात ते निधन पावले. दासगणूंचे प्रवास कीर्तने व लेखन नेहमीप्रमाणे होत राहिले तरी आपल्या या सुनेचा संसार त्यांनी सांभाळला.

लहानगा अनंत चाणाक्ष नि बुद्धिमान होता. पण फार अशक्त. लहानपणीच विषमज्वर झाल्यामुळे त्याच्या शिक्षणाचा प्रारंभ मुंज झाल्यावर 9 व्या वर्षी झाला. बालपणापासून वाचनाचे वेड. रामायण - महाभारत - भागवतांतील कथा तोंडपाठ असत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण - पंढरपुरातच टिळक विद्यालयात झाले. 1939-40 मध्ये अनंता मॅट्रिकच्या वर्गात होता. दासगणूंच्याकडे अनेक वेळा आलेल्या पुण्याच्या वैद्य पुरुषोत्तमशास्त्री नानलांनाही अनंताची हुशारी ज्ञात होती. त्यांनी श्री महाराजांना त्याला वैद्यकाकडे पाठवावे असे सुचविले. मॅट्रिकचा निर्णय जाहीर होताच श्री नानलांनी वैद्यकी प्रवेशाचे काम पूर्ण केले. बालपणापासून महाराजांनाच सारसर्वस्व मानलेल्या अनंताने ते मान्य केले. पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयामध्ये अनंतरावांचे शिक्षण सुरु झाले (1940) तत्त्वज्ञान घेऊन एम्. ए. करण्याचा त्यांचा विचार मागे पडला. 1944 मध्ये अनंतराव वैद्यकाचे पदवीधर झाले.

श्री महाराज या वेळी 75 वर्षांचे होते. प्रकृतीही फार चांगली नसे म्हणून अनंतराव त्यांच्या सह असत कारण कीर्तने प्रवास चालूच होते. 1948 ते 50 या काळात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ‘आयुर्विद्या पारंगत’ ही एम्. डी. च्या समकक्ष परीक्षा ते प्रावीण्यांकाने उत्तीर्ण झाले. त्यावेळच्या प्राचार्य श्री मामा गोखले यांनी त्याच महाविद्यालयात त्यांना प्राध्यापक म्हणून नेमले. 1950 ते 1967 या काळात ते प्राध्यापक, प्राचार्य, राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे कार्यकारिणी सदस्य इ. सर्व जबाबदार्‍या पार पाडीत होते. अत्यंत निरपेक्ष भावनेने संस्थेची सेवा त्यांनी केली. पुढे मंडळाच्या कार्यकारिणीत अ‍ॅलोपॅथी व आयुर्वेद असा काहीसा वाद-विवादाचा प्रसंग आला. शेवटी आयुर्वेदाशी प्रतारणा नको म्हणून त्यांनी संस्थेला आपले त्यागपत्र दिले व सेवेतून मुक्त झाले.

या मधल्या काळात 1950 मध्ये त्यांनी गुर्वाज्ञेने श्रीकृष्णकथामृत या नवरसमंडित महाकाव्याची निर्मिती केली. आपले गुरु श्री दासगणूमहाराज यांच्या समोर त्यांचे समग ्रवाङ्मय प्रकाशित करायला प्रारंभ केला. 1955 मध्ये त्यांचे चरित्रही निर्माण केले. 1962 मध्ये श्री महाराज गेले पण त्यांच्या समोर त्यांच्या वाङ्मयाचे प्रथम दोन खंड प्रकाशित केले. पुढे 1967 पर्यंत दशखंडात्मक सवालक्ष वाङ्मय प्रकाशित झाले. दासगणूंचा भक्तपरिवार मोठा होता. त्यांच्या आग्रहाने अनंतरावांनी गोरटे येथे (नांदेड) त्यांची समाधी बांधली, भव्य ध्यानमंदिर निर्माण केले. आज त्याला एक सर्वोत्तम साधना केंद्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

अनंतरावांनी कीर्तने-व्याख्याने याच माध्यमातून समाजजागृती केली. हजारोंच्या संख्येने ते कार्यक्रम मोजावे लागतील. आधुनिक साहित्यिकांनी लेखनाद्वारे महाभारत रामायणातील व्यक्तिरेखांचे केलेले अवमूल्यन त्यांना सहन झाले नाही त्या सर्वांचे खंडन करणारी महाभारतातील व्यासंगी व्याख्याने दिली. ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ हा त्यांचा ह्या संदर्भातला महत्त्वाचा ग्रंथ. अनेकांचे अनेक प्रश्‍न - समस्या असत. त्या सर्वांना उत्तम उत्तरे देणारा ‘वाटा आपल्या हिताच्या’ हा ग्रंथ लोकप्रिय झाला. याशिवाय ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनी, उपनिषदार्थ कौमुदी (पंचखंडात्मक 11 उपनिषदांवरील गद्य-पद्य विवरण) मनोबोध, गीतेच्या प्रत्येक अध्यायावर विवेचन असे सुमारे 50-55 ग्रंथ निर्माण केले. यासाठी त्यांच्या चाहत्यांनी ‘श्रीराधादामोदर प्रतिष्ठान’ व ‘संतविद्या प्रबोधिनी’ या संस्थाही निर्माण केल्या. (वाङ्मय सूची सोबत आहे) त्यांची ईश्वरभक्ती, संस्कृतीचा प्रगाढ अभ्यास आणि राष्ट्रप्रेम या सर्वांनी त्यांचे वाङ्मय ओतप्रोत भरलेले आहे.

1964 पासून 2002 पर्यंत त्यांनी प्रतिवर्षी हिमालयाची वारी केली. मानस यात्राही केली. 1991 मध्ये त्यांनी उत्तर काशी येथे विधिवत संन्यास ‘श्री विद्यानंद गिरी महाराज (प्रमुख कैलासाश्रम) यांचे कडून घेतला. आता त्यांचे नाव स्वामी वरदानंद भारती झाले.

1999 ते 2002 या अडीच तीन वर्षे चिंतनात राहिलेला एक ग्रंथ त्यांनी पूर्ण केला. ‘मनुस्मृती - सार्थसाम्राज्य’ ! 1000 पृष्ठांचा हा ग्रंथ आजच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देणारा मनोज्ञ ग्रंथ आहे. याचे स्वरूप खंडण - मंडण या स्वरूपाचे आहे. पौष शु. 11 शके 1923 मध्ये प्रकाशित झाला. जणू ते एवढ्याचसाठी थांबले होते.

श्रावण व. 11 शके 1924 या दिवशी त्यांनी गंगास्नानोत्तर समाधी घेतली. त्यावेळी समस्त भक्त परिवाराकरिता आदेशात्मक कविता लिहून ठेवली. ‘गंगामातेने माझा निरोप श्री नारायणाला दिला त्याप्रमाणे - ‘साक्ष ठेवुनी तुम्हां संता - देह सोडितो हा आता’ आणि पुढे ‘ मी म्हणजे ना शरीर - मी मद्ग्रंथांचा संभार। त्यांचे वाचनचिंतन - यथा शक्ती आचरण।’ हीच गुरुपूजा खरी असा तो संदेश होता.

समाधीत बसले 3/09/2002 सकाळी 9वाजता आणि त्यांचे प्राणोत्क्रमण झाले 5/09/2002 ला पहाटे 5 वाजता अर्थात ही संजीवन समाधी होती. आजच्या विज्ञानयुगातही संजीवन समाधी साधता येते हे त्यांनी कृतीने दाखविले. ‘कश्चिन्माम् वेत्ति तत्त्वत:’ या कोटीतले ते दिव्य पुरुष होते.

दि. 6/09/2002 या दिवशी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवाचे विसर्जन गंगेवर (उत्तरकाशी) मोक्ष घाटावर करण्यात आले. त्या दिव्य जीवनाला प्रणाम !

अन्य लौकिक माहिती
अनंतरावांचा विवाह 1941 मध्ये माघ महिन्यात झाला. पंढरपूरच्या रेल्वे स्टेशन मास्तरांची कन्या विमल लिमये हिच्याशी. पत्नीचे नांव सौ. इंदिरा. अनंतरावांचा पहिला मुलगा शंकर 13 वर्षांचा होऊन गेला. नंतर क्रमाने तीन मुली मीरा, मुक्ता, अहिल्या. आणि नंतर दोन मुलगे चंद्रशेखर व महेश. तिन्ही मुलींचे विवाह होऊन त्या सुस्थळी पडल्या आहेत. दोघे मुलगे आपापल्या व्यवसायात असून दासगणूंची परंपरा उत्तम प्रकारे चालवीत आहेत.

श्री संत दासगणू महाराज ह्यांना पुत्र प्राप्तीसाठी त्यांनी श्री साईबाबा ह्यांना विचारले तेव्हा त्यांनी श्री दासगणूस्वामींना सांगितले की पुण्याला गेला होतास तेव्हा शनिवार पेठेत, जो मुलगा श्री दत्तो वामन पोतदार ह्यांचेकडे माधुकरीसाठी आला होता त्यास घरी आणून तो तुझा मुलगा असे समजून त्यांचा संभाळ कर. त्यानुसार श्री दासगणू महाराज पुण्यात श्री दत्तो वामन पोतदार ह्यांचेकडे येऊन श्री दामोदर पंत आठवले ह्यांना शोधून काढून पंढरपूर येथे घेऊन गेले.

शब्दांकन : महेश अनंत आठवले